बनावट ई-मेल आलाय?
बनावट ई-मेल आलाय?
डिग्री हातात आल्या आल्या आपल्याकडे नोकरी हवी अशी प्रत्येक विद्यार्थ्यांची अपेक्षा असते. त्यातच आजकाल नोकरी शोधणा-यांसाठीही खास वेबसाईट्स उपलब्ध आहेत.
काही बनावट कंपन्या आपला ई-मेल आयडी घेऊन आपल्याला मेल करतात की, ‘तुम्हाला अमुक अमुक एका कंपनीत मोठया पदावर नोकरी लागली असून त्यासाठी तुम्हाला तुमची कागदपत्रं खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावी लागतील. त्याचसोबत आम्ही दिलेल्या अकाऊंट नंबरवर काही रक्कम भरावी लागेल.
तुमची कागदपत्रं चेक केल्यावर आम्ही तुम्हाला इंटरव्ह्यूकरता बोलवू’ अशा आशयाचे ई-मेल मिळाल्यावर सुशिक्षित बेरोजगार संबंधित माहिती पुरवतात आणि पैसेही भरतात. मात्र त्यानंतर त्यांच्याकडून काहीच उत्तर न मिळाल्याने आपण फसवले गेलो याची कल्पना येते. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक संबंधित तपासणी करूनच आलेल्या मेलवर रिप्लाय द्यावा.
तुम्ही तुमचा रिझ्यूम जर विविध नोकरी देणा-या वेबसाईट्सवर टाकत असाल किंवा इतर माहितीही अपलोड करत असाल तर सावधान. कारण अशा वेबसाईट्सवर आपली माहिती संरक्षित असण्याची काहीच गॅरन्टी नसते. त्यामुळे खासगी कंपन्यांसोबतच इतर बनावट कंपन्याही तुमची वैयक्तिक माहिती चोरून तुमच्याशी संपर्क साधू शकते.
पदव्युत्तर तरुण-तरुणी या ऑनलाईन वेबसाईट्सचा जास्त उपयोग करताना दिसतात. अनेक खासगी कंपन्या या नोकरी देणा-या वेबसाईट्सशी संबंधित असल्याने अनेक जण आपले रिझ्यूम अशा वेबसाईट्सवर अपलोड करत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून अनेकांना असे बनावट ई-मेल आल्याचे लक्षात आले आहे. नुकताच असा प्रकार पुण्यातील एका तरुणासोबत घडला आहे.
एवढेच नव्हे तर बनावट बँकांचे लोगो तयार करून त्यांच्याकडून असे मेल केले जातात. ‘संबंधित बँक तुम्हाला बक्षीस म्हणून काही रक्कम देत आहे. त्यासाठी काही रक्कम अनामत म्हणून भरावी लागेल’ अशा आशयाचेही मेल सध्या फिरत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी, तरुणांनी, बेरोजगारांनी नोकरीसंदर्भात कोणताही ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घ्या. तुमच्यासोबत असा प्रकार घडला असेल तर त्वरित सायबर क्राईमशी संपर्क साधा. जेणेकरून अशा गोष्टींना आळा घालता येईल.
फसवणुकीपासून वाचण्याकरता..
» शक्यतो आपली वैयक्तिक माहिती कोणत्याही वेबसाईटवर उपलब्ध करू नये.
» नोकरी देणा-या वेबसाईट्सवर कोणतीही माहिती अपलोड करताना त्या वेबसाईटची पार्श्वभूमी तपासून घ्यावी.
» नोकरी किंवा तत्सम स्वरूपात तुम्हाला कोणताही मेल आल्यास काळजीपूर्वक पावलं उचला.
» कोणतीही कंपनी इंटरव्ह्यू, सीलेक्शन झाल्याशिवाय आगाऊ रक्कम मागत नाही, त्यामुळे इंटरव्ह्यूसाठी पैसे मागण्याच्या आशयाचा मेल किंवा कॉल आल्यास त्याला उत्तर देऊ नका.
» तरीही तुम्ही अशा प्रकरणात फसवले गेला असाल तर त्वरित सायबर क्राईमशी संपर्क साधा.
Comments
Post a Comment