इको बडीज्

इको बडीज्

गेल्या महिन्यात ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं. मात्र वृक्षारोपणानंतर त्यांचं संवर्धन होणंही तितकंच गरजेचं आहे. त्यासाठी सोशल मीडियावरील काही तरुण एकत्र आले आणि त्यांनी वृक्ष संवर्धनाची मोहीम हाती घेतली. हे ‘इको बडीज’ आता दर रविवारी थोडा वेळ काढून वृक्षांची काळजी घेतात.
RE Cameraनुकताच केंद्र सरकारतर्फे वृक्षरोपण दिन साजरा करण्यात आला. वृक्षारोपणादिवशी अनेक राज्यात, जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आलं. मात्र वृक्षारोपण केल्याने प्रश्न सुटत नाही! त्या वृक्षांचं संगोपनही होणं तितकंच गरजेचं असतं. नेमकं हेच लक्षात घेऊन काही ‘इको बडीज’ सोशल मीडियावर एकत्र आले आहेत.
केवळ झाडं लावून उपयोगाचं नसतं, तर त्यांची निगा राखणंही तेवढंच महत्त्वाचं असतं. एका विशिष्ट कालावधीपर्यंत झाडांची योग्य काळजी घेतली तर नंतर त्याचा आपल्यालाच चांगला फायदा होतो. त्याचबरोबर आजच्या काळात वृक्षसंवर्धनाची नितांत गरज आहे, शिवाय वृक्षांच्या कमतरतेमुळे आपल्या वातावरणातही अनेक वाईट परिणाम होत आहेत, या सा-या गोष्टींचा विचार करून सोशल मीडियावरील काही तरुण एकत्र आले.
प्रत्येक रविवारी सकाळी ७.३० ते ९ वाजेपर्यंत ही तरुण मित्र मंडळी माहीममधील महाराष्ट्र नेचर पार्क येथे एकत्र येतात आणि वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन, वृक्षांची निगा अशी मोहीम हाती घेतात. वृक्षारोपणादिवशी लावलेली झाडे मुळातच ७ ते ८ फूट एवढी होती. त्यामुळे त्यांची योग्य ती काळजी घेणे गरजेचं आहे.
झाडांचं योग्यरीत्या संगोपन कसं करावं याविषयी त्यांना महाराष्ट्र नेचर पार्कचे संचालक अविनाश कुबल सर मार्गदर्शन करतात. त्याचबरोबर तेथील इतर कर्मचाऱ्यांचीही त्यांना मदत होते.
या संकल्पनेविषयी सांगताना अभिषेक साटम म्हणतो की, ‘माहीम येथील महाराष्ट्र नेचर पार्क येथे वृक्षारोपण दिन साजरा करण्यात येणार असल्याचं मला फेसबुकवर समजलं. त्यादिवशी तिथे अनेक तरुण जमले होते. कार्यक्रम झाल्यावर आम्ही साऱ्यांनी एकमेकांची ओळख करून घेतली. त्यानंतर आम्ही महाराष्ट्र नेचर पार्कचे संचालक अविनाश कुबलसरांची परवानगी घेऊन दर रविवारी येथे येण्याचं ठरवलं.’
तेव्हापासून ही तरुण मंडळी दर रविवारी भेटतात. मुंबई आणि विविध उपनगरातही त्यांनी वृक्षारोपण करण्यास सुरुवात केली आहे. इको बडीज ग्रुपतर्फे आजपर्यंत आंबा, वड, पिंपळ, कदंब, कारंज अशी औषधी झाडे लावण्यात आली आहेत.
अभिषेक साटम, प्रसाद खेडेकर यांनी फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवरही‘इको बडीज’ नावाची संकल्पना सुरू केली. जर तुम्हालाही त्यांच्या उपक्रमात सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी एकदा त्यांच्या फेसबुक पेजवर नक्की भेट द्या.
या इको बडीज ग्रुपमध्ये प्रत्येक जण नवीन आहेत. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून हे तरुण भविष्याची तजवीज करत आहेत. वृक्ष आपली सोयरे आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी आठवडय़ातून किमान आपण दीड ते दोन तास तरी काढू शकतोच. मात्र प्रत्येक रविवारी यायला हवंच अशी सक्ती नाही. मात्र महिन्यातील किमान दोन रविवार तरी येणं गरजेचं आहे.
किंबहुना हा वेळ प्रत्येकाने काढायला हवा. या तरुणांनी समाजात अप्रत्यक्षपणे दिलेला सामाजिक संदेश प्रत्येकाने आत्मसात करायला हवा. आपल्या घराजवळच झाडे लावली, त्यांची काळजी घेतली किंवा वृक्षतोड होऊ नये म्हणून आपण जनजागृती केली तर वाढत चाललेलं हे जागतिक तापमानवाढ थोडय़ाफार प्रमाणात नक्कीच कमी होईल.
सध्या वातावरणात क्षणाक्षणाला फरक झालेला पाहायला मिळतोय. त्याचा वाईट परिणाम प्रत्येक सजीव सृष्टीला होतो. या सगळ्या गोष्टींचं कारण म्हणजे वृक्षतोड. ‘इको बडीज्’च्या तरुणांनी उभारलेली मोहीम जर प्रत्येकाने उभारली किंवा इको बडीजच्या संकल्पनेलाच आपण थोडाफार हात लावला तरी पुढच्या भविष्यात येणारं जागतिक तापमानवाढीचं संकट किंचित प्रमाणात तरी टळेल.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी संपर्क : अभिषेक साटम – ९८७०७४२५९८.

Comments