१५ वर्ष हंडीचा मानकरी
१५ वर्ष हंडीचा मानकरी
लहान मुलांपासून ते थोरामोठयांपर्यंत साऱ्यांची उपस्थिती या दहीहंडी उत्सवाला असते. अगदी लहानपणी वरच्या थराला असणारी मुलं आता कुठेतरी मधल्या थराला किंवा अगदी शिडीलाही उभी राहिलेली आपण पाहतो. मात्र भायखळा पूर्व येथील श्रीकृष्ण गोंविदा पथकातील एक तरुण गेले १५ वर्ष वरच्या थरावर चढून लोणी खाण्याचा मान मिळवतोय.
वरच्या थरावर असणारी मुलं हळूहळू दरवर्षी एक-एक थर अशा क्रमाने खाली येतात मात्र शैलेश अजूनही वरच्या थरावर चढून लोणी खाण्याचा मान मिळवतोय. सुरक्षेच्या दृष्टीने त्याला विचारले असता तो म्हणतो की, ‘आमच्या मंडळात गोपाळांची संख्या जास्त असल्याने खाली पडलो तरी झेलायला बरीच माणसं असतात, शिवाय आजकाल संरक्षणासाठी हेल्मेट, रोप अशा साधनांचा वापर होतोय त्यामुळे भीती वाटत नाही.
शिवाय मित्र नेहमी प्रोत्साहन देतात आणि घरच्यांचा पाठिंबा असल्याने मी एकदम बिनधास्त आहे.’ शैलेश केवळ गोविंदा पथकात नसून तो एक उत्तम वादक देखील आहे. खासगी कंपनीत नोकरीला असणारा शैलेश म्हणतो की, दहीहंडी हा आपला पारंपरिक उत्सव असल्याने प्रत्येकाने त्यात सहभागी व्हायला पाहिजे.
उत्सवाची स्पर्धा होता कामा नये, शिवाय हा खेळ साहसी असल्याने खेळाचे नियम पाळणेही आवश्यक आहे. त्यामुळे नियम आणि शिस्तबद्ध पद्धतीने खेळ खेळल्यास अपघातही टळतात आणि सण साजरा केल्याचा आनंदही वाटतो.
सुप्रिम कोर्टाने दिलेल्या निर्णयाविषयी सांगताना तो सांगतो की, जर शिस्तबद्ध पद्धतीने थर रचले तर अपघात टाळता येतात, शिवाय आजकाल संरक्षणासाठी अनेक उपाययोजना आखल्या गेल्या आहेत, त्यामुळे कोर्टाने त्यांचे नियम शिथिल करायला हवेत.
Comments
Post a Comment