ठाण्याचा मानबिंदू-तलावपाळी




ठाण्याला ‘तलावांचे शहर’ या नावाने ओळखलं जातं. तलावांची राजधानी म्हणूनही ठाण्याची ओळख आहे. पूर्वी ठाण्यात जवळपास 60 तलाव होते. आता 30 ते 35 तलाव उरलेत. मात्र एवढ्या तलावांच्या राज्यातही मासुंदा तलावाने आपली वेगळी ओळख निर्माण करून ठेवली आहे, ठाण्यातील हा मासुंद तलाव तलावपाळी या नावानेही अधिक ओळखला जातो. ठाण्याची चौपाटी म्हणून तलावपाळीकडे पाहिलं जातं. सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी ठाणेकरांची गर्दी होते. आबालवृद्धांचा राबता येथे सुरूच असतो.
सायंकाळी हा परिसर गर्दीने फुलून निघालेला असतो. सणवार, उत्सवात हा परिसर दिव्यांनी उजळलेला असतो. तलावाची चौफेर जागा कोणत्या ना कोणत्या गोष्टींमुळे प्रसिद्ध आहे. तलावाच्या पूर्वेला श्रीकौपिनेश्वर मंदिर आहे, तर पश्चिमेला गडकरी रंगायतन, दक्षिणेला लालबागची वस्ती तर, उत्तरेला सेंट जॉन बाप्टिस्ट चर्च आहे. या सार्या वास्तुंच्या मधोमध तलावपाळी असल्याने ठाणेकरांमध्ये हा तलाव विशेष प्रिय आहे.
वर म्हटल्याप्रमाणे पूर्वी ठाण्यात 60 तलाव आहेत, तसंच ठाण्यात 60 मंदिरेही होती. असं म्हणतात की शिलाहार राजांच्या कारकिर्दीत हा तलाव बांधला गेला असावा. शिलाहार राजा इ.स.997 आणि 1018 च्या आसपास ठाण्यास वास्तव्यास होते. मुळात त्यांचासाठी ठाणे हे राजधानीसमान होते. शिलाहार राजांमुळे ठाण्याला राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिकदृष्ट्या संपन्नता मिळाली. श्रीकौपिनेश्वर मंदिर आणि मासुंदा तलाव त्यांच्याच काळातील निर्मिती आहे. त्यामुळे मासुंदा तलावाला 1 हजार वर्षांचा इतिहास आहे असं म्हणायला हरकत नाही. पूर्वी मासुंदा तलावाला मासवदा तलाव म्हटलं जायचं. मात्र  कालांतराने मासवद्याचे मासुंदा झाले. आताही तेथील स्थानिक रहिवासी सोडता या तलावाला मासुंदा तलाव म्हणतात हे फार कमी लोकांना माहिती आहे. हा तलाव फार प्राचीन असल्यामुळे एकोणिसशेच्या काळात केलेल्या साफसफाईत या तलावात कोरीव काम केलेले दगड आणि भग्नमूर्ती सापडल्या होत्या. तसंच, काही पेशवेकालीन वस्तू आणि नाणीही सापडल्या होत्या. त्यामुळे या परिसरात पेशव्यांचं राज्य होतं हे स्पष्ट होतं.
पूर्वी तलावपाळीचा परिसर अवाढव्य होता. श्री कौपिनेश्वर मंदिराला लागूनच तलावाचे विस्तिर्ण पात्र होते. तलावाकाठी हात-पाय धुतल्यावरच भाविक श्रीकौपिनेश्वर मंदिरात प्रवेश करित असे. मात्र गेल्या काही वर्षात बरेच बदल झाले. तलावाची भौगोलिक रचना कमी होत गेली त्यामुळे तलावाचा आकार कमी होत गेला. 1882 च्या ठाणे गॅझेटमध्ये या तलावाचे क्षेत्रफळ 12 लाख 19 हजार 200 चौ.फुट होते. तसेच त्याची लांबी 1200 फूट, रुंदी 1016 फूट होती. तलावपाळीच्या चहूबाजूंनी हिरवाई पसरलेली होती. फुलझाडे, फळझाडांनी हा परिसर वेढलेला होता. आंबा, नारळ, पेरू, आवळा, फणस, मोगरा, जास्वंद, पारिजातक चाफा या झाडांमुळे तलावपाळी आकर्षक वाटत असे. या झाडांवर असलेल्या विविध पक्षांच्या किलबिलाटाने सायंकाळ सुरेल वाटत असे. आंब्याच्या झाडावर पावसाळा सोडला तर कोकिळांची कुहूकुहू चालूच असे. या ठिकाणी दोन आवळ्याची झाडं होती. या आवळ्याच्या झाडाभोवती महिलावर्ग येथे आवळी भोजनाचा बेत आखत असत. झाडांची मनोभावे पूजा झाल्यावर आवळी भोजन करण्यात येत असे. 1938 पर्यंत आवळी भोजनाचा बेत चालू होता. मात्र कालांतराने आवळी भोजन विस्मृतीत गेले. मगाशी म्हटल्याप्रमाणे सुरुवातीला या तलावाला मासवदा तलाव म्हणत असे. 1880 मध्ये या तलावाला महादेवाचा तलाव असं नाव होतं, अशी नोंद पालिकेच्या कागदपत्रात आहे. तर, 1912 च्या नगरपालिकेच्या शहर विकास आराखड्यात कौपिनेश्वर तलाव असा उल्लेख आहे. तसंच, या तलावाला शंकराचे तळे असे म्हणत होते. पण या एवढ्या नावांच्या गलबल्यातही तलावपाळी हेच नाव ठाणेकरांना विशेष प्रिय आहे. तलाव संपूर्णपणे कठड्याने वेढलेला असल्याने नागरिक कठड्यावर बसून तलावाच्या सौंदर्यतेचा आस्वाद घेऊ शकतात. तसेच, ठिकठिकाणी विश्रांतीसाठी शेड्स उभारल्या असल्याने थकल्या-भागल्या वृद्धांना या शेड्सचा आधार वाटतो. गेल्या काही वर्षात तलावपाळीत बरेच बदल झाले. शहरीकरण वाढल्याने त्याचा परिणाम तलावावरही झाला. मात्र आजही या तलावाने लोकांची पसंती कायम ठेवली आहे. सायंकाळी फेरफटका मारायला आबालवृद्धांची गर्दी असतेच. पोटपूजा करायलाही येथे भरपूर स्टॉल्स पाहायला मिळतात. खवय्यांसाठी चायनीज भेळापासून ते झुणका-भाकरपर्यंत सारंकाही येथे दररोज उपलब्ध असतं.
एकंदरीत, गेल्या हजारएक वर्षात तलावपाळीच्या आणि ठाण्याच्याही इतिहासात आणि भूगोलात बरेच बदल झाले असले तरीही या तलावाने ठाण्याचा मानबिंदू ही ओळख काही बदललेली नाही.

Comments