शिक्षक दिन आणि फजिती

शाळेत असताना शिक्षक दिन का साजरा करतात हे माहित नसायचं, पण साडी नेसून शाळेत मिरवायला मिळतं म्हणून मी शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचे. दहावीत असेन तेव्हा. शाळेत शिक्षक दिनानिमित्त साडी नेसून यायला सांगितलं होतं. म्हणजे ज्यांना इतर वर्गात जाऊन शिकवायचं आहे अशा विद्यार्थ्यांनीच छान नटून थटून यायचं असं सांगण्यात आलं होतं. ठरल्याप्रमाणे मी शिक्षक दिनादिवशी छान नटापटा करून शाळेत गेले. शाळेत गेल्यावर मला कळलं की मला आमच्याच वर्गात (दहावी क) शिकवायला जायचं आहे. झाली की नाही मोठी पंचाईत! आमच्या वर्गातील माझे मित्र-मैत्रीणी मला चांगलेच ठाऊक होते. चेष्टा-मस्करी करणार याची कल्पना होती. म्हणून मी आमच्या मॅडमकडून दुसरा वर्ग देण्याचीही विनंती केली. पण मॅडम ठाम. तू तुझ्या वर्गात शांतपणे शिकवू शकलीस तर मी तुला हवं ते गिफ्ट देईन असं त्या म्हणाल्या. त्यांचं हे चॅलेंज मी स्विकारलं. ठरल्याप्रमाणे मी माझ्या वर्गात गेले. वर्गात पाऊल ठेवताच सगळ्यांनी हास्याची एकच लकेर सोडली. मी थोडंसं गडबडले. आजवर सुविचार लिहिण्याव्यतिरिक्त कधीच फळ्याजवळ उभं राहण्याची संधी मिळाली नव्हती. आज तर या 56 विद्यार्थ्यांना शिकवायचं होतं. माझ्या इवल्याश्या डोळ्यात मी अख्खा वर्ग सामावून घेण्याचा प्रयत्न करत होते. कोणी शेवटच्या बँचवरून आवाज काढतंय तर कोणी उगीच मला त्रास म्हणून एकमेंकाशी गप्पा मारताहेत. हा सारा डाव जाणूनबुजून होता हे मला माहित होतं. पण त्या दिवसाचा नियम असा होता की कोणालाही न ओरडता, डाफरता विद्यार्थ्यांना शांततेत शिकवायचं. म्हणून मी जरा शांततेतच बोलले, ‘जरा शांत रहा’. माझ्या आज्ञेचा मान ठेवत सगळेच एकदम चिडीचूप. मला नवलच वाटलं. शांतता पसरली म्हणून मी शिकवायला सुरुवात केली. माझा आवडता विषय गणित. त्यामुळे गणित विषय शिकवायचं ठरलं. बीजगणिताला सुरुवात केली तोवर पाठून आवाज आला. आम्हाला भूमिती शिकायचंय मॅडम. ज्यांनं आवाज काढला तो अवली माझा चांगलाच मित्र होता. म्हणूनच त्यानं मॅडम या शब्दात चेष्टेचा सूर आळवला. त्याच्या मागणीला प्रतिसाद देत इतर मुलांनीही भूमिती शिकवण्याचा आग्रह धरला. आता झाली ना पंचाइत. बीजगणितात मी थोडेफार पक्की होते. म्हणून तो विषय हट्टाने मागून घेतला तर माझ्याच मित्रांनीच माझी अशी मस्करी करावी? पण मागे हटेल ती स्नेहा कसली? मी म्हटलं ठिकेय, चला भूमितीची पुस्तकं काढा. भूमितीतील प्रमेय शिकवायला घेतली. आणि माझ्या प्रत्येक शब्दामागे हे विद्यार्थी सुरात सूर मिसळावे तसे वरचढ बोलू लागले. विनाकारण प्रश्नांची सरबत्ती त्यांनी सुरू केली. वर्षभर ज्यांनी कधी पुस्तकातील आतील पान उलटली नसतील अशा विद्यार्थ्यांनीही भूमितीतील प्रश्नांचा भडीमार केली. मला माहिज होती तेवढ्या प्रश्नांची उत्तर दिली मी. पण ज्या प्रश्नांची उत्तर ठाऊक नव्हती त्या प्रश्नांनी मात्र माझी चांगलीच लाज काढली. अखेर माझा राग आता अनावर झाला होता. शेवटी मी एकाला जोरात ओरडलेच. आणि तिथेच मी फेल झाले. कारण मी शिकवत असताना फळ्याकडे जेव्हा वळले तेव्हा आमचे एक सर वर्गात हळूच येऊन बसले होते. आणि वर्गात कोणालाही ओरडायचं नाही असा नियम असताना मी तो नियम मोडला आणि मी स्पर्धेतून बाद झाले. खरंतर अर्ध्या तासाचं ते लेक्चर होतं. पण तो अर्धा तासही मला एका तपापेक्षा कमी वाटला नाही. त्यादिवशी मला कळलं शिक्षकी पेशा काही सोपा नाही. समोर बाकावर बसलेल्या 50 ते 60 विद्यार्थ्यांना शिकवायचं, त्यांना शिस्त लावायची, त्यांच्या मस्तीला आवर घालत मिळालेल्या अर्ध्या तासात त्यांच्यावर संस्कार करायचं म्हणजे गाढवाला गीता शिकवण्यासारखंच नाही का?
खरंतर पहिल्या बाकावर बसून मस्ती करण्यातल्या विद्यार्थ्यांपैकी मी एक. कोणत्याच लेक्चरला मी कधीच शांत राहिलेले मला आठवत नाही. दहावीत असताना नागरिकशास्त्र शिकवायला आम्हाला आमचे मुख्यध्यापक राजपेठे सर यायचे. मला फक्त त्यांचीच धास्ती होती. त्यामुळे नागरिकशास्त्राच्या तासाला मी गप्प राहायचे. गप्प कसले झोपाच काढायचे म्हणा. पण या सरांच्या तासाव्यतिरिक्त मी कधीच शांत बसले नाही. पण त्या दिवशी शिक्षक दिनाला माझ्याच मित्र-मैत्रीणींनी जाणून-बुजून केलेल्या फजितीनं माझ्या डोळ्यात चांगलंच अंजन घातलं. आपण चेष्टा म्हणून आपल्या गुरुजनांची मस्करी करतो, वर्गात मस्ती करतो. पण याची परतफेड आपल्यालाही कुठेतरी मिळतच असते. त्यामुळे माझ्यासारख्या वरताण विद्यार्थ्यांना सांभाळून आमच्यावर संस्कार करणार्‍या, आम्हाला घडवणार्‍या माझ्या सर्व शिक्षकांना मनापासून धन्यवाद.

Comments