गोकुळ निवास
वळणवाटा तुडवत, घाटमाथे चढत हिरव्या वनराईतून एसटी डौलाने
गावाच्या दिशेने जात होती. ते दिवस होते श्रावणातले. सुजलाम सुफलाम असलेली ही भूमी
श्रावणात एक अद्भूतच रुप धारण करते. कोकणातील ही अद्भूतता डोळ्यात साठवत आईला
भेटण्याच्या ओढीने सावंत आप्पा प्रवासातील क्षणन् क्षण वाट पाहत होते. अखेर एसटी
गावात शिरली. सावंत आप्पांनी आपलं बोचकं पाठीवर घेतलं आणि त्या लाल डब्ब्यातून
खाली उतरले. तिथून पाचच मिनिटांवर त्यांचं घर होतं. तालुक्याहून 30 ते 40 किमी आत
सावंत आप्पांचं गाव असलं तरी या गावाला निसर्गानं भरभरुन दिलेलं होतं.
झाडांझुडपांमधून वाट मिळेल तशी खळाखळत वाहणारे ओढे, चहू बाजूंनी पसरलेले अवाढव्य डोंगर, डोंगरांवर पसरलेली गर्द वनराई, वनराईतून विविध प्राणी-पक्षांचा आवाज म्हणजे
कोकणाचं वैभवच.
सावंत आप्पा दर
दोन-तीन महिन्यातून एकदा गावाला भेट देतातच. मात्र यावेळेसची खेप लांबणारी होती.
सावंत आप्पांची आई निर्मलाताईंची तब्येत दिवसेंदिवस खालवत होती. सावंत आप्पा, त्यांचे भाऊ, बहिण सारेच मुंबईत स्थायिक. त्यांनी
निर्मलाताईंनाही मुंबईत बोलावून घेतलं होतं. मात्र तिथलं वातावरण, राहणीमान निर्मलाताईंना काही पचलं नाही. शेवटी
त्यांनी पुन्हा आपल्या गावचा रस्ता धरला. गेल्या कित्येक वर्षांपासून निर्मलाताई
एकट्याच गावी राहताहेत.
सावंत आप्पा एसटी
स्थानकातून आपल्या घरी जायाला निघाले. वाटेत लागणारी घरं पाहून ते नेहमीसारखेच
हळहळले. कारण गावचं गावपणही शहरीकरणाच्या किडीनं पोखरलं जात होतं. शेणा-मातीची, कौलांची घरं जाऊन आता दोन-चार माड्यांचे बंगले उभे
राहिले होते. ना चुलीचा धूर आणि ना घराबाहेर रांगोळी. सावंत आप्पांनी मात्र
त्यांचं पूर्वी बांधलेलं घर तसंच जपून ठेवलंय. त्यांनी एकदा विचार केलाही की हे घर
पाडून आपणही मोठालं घर बांधावं. पण या घराला गावपण येणार नाही म्हणून त्यांनी तो
विचार तिथंच थांबवला.
![]() |
खोर्णिंको धरण, लांजा |
निर्मलाताई गोकुळ
निवासच्या दारातच उभ्या होत्या. आपला लेक आपल्याला भेटायला आलाय हे कोणत्याही
माऊलीसाठी सुखावहच असतं. जेमतेम 4 फुटांची ती माऊली काठी टेकून खळ्यात उभी राहून
आपल्या लेकाची वाट पाहात होती. हिरव्यागार शेतातील चिंचोळ्या पायवाटेवरून आप्पा
गोकुळ निवासच्या दिशेने चालत येत होते. जुनं, साधं, शेणामातीचं
घर पाहून सावंत आप्पांनी नेहमीप्रमाणे समाधान व्यक्त केलं. खरंतर संपूर्ण गाव
विविध रंगांनी,
आकर्षक सजावटीनं सजवलेलं आहे. त्यात सावंत
आप्पांचं घर म्हणजे अगदीच आऊटडेटेड वाटायचं. पण हेच आऊटडेटेड घर पाहण्यासाठी अनेक
मंडळी मुद्दाम येत. शेणानं सारवलेलं खळं, मिणमिणत्या
दिव्यातील पडवी,
चुलीच्या धुरामुळे काळंकुट्ट झालेलं पण तरीही
आकर्षक वाटणारं स्वयंपाकघर, वासाच्या माड्या, पुरातन लोखंडी पेट्या, दोन फळ्यांची असलेली दारं हा सारा वारसा आजही
सावंत आप्पांच्या घरी कायम होता.
बर्याच दिवसांनी
आलेल्या लेकासाठी निर्मलाताईंनी खास घावणे बनवले होते. घावणे म्हणजे सावंत
आप्पांचा विक पॉइंट. त्यातही आईच्या हातचं घावणं आणि चहा म्हणजे लाजवाब. पण सावंत
आप्पा निर्मलाताईंना ओरडले. ‘आजारी असताना एवढा
घाट का घालायचा?
डॉक्टरांनी आधीच सक्त विश्रांती सांगितलीय’. ‘यापुढे तू काहीही करायचं नाही. मीच तुझी सेवा
करणार.’ निर्मलाताईंनीही आप्पांच्या गालावरून हात फिरवत
त्यांना होकार दर्शवला. तेवढ्यात मिनाक्षी वहिनींना सावंत आप्पा आल्याची चाहूल
लागली. मिनाक्षी वहिनी म्हणजे एक नंबरच्या ऐतखाऊ. निर्मलाताईंना त्यांनी कधी साधं
पाणीही विचारलं नाही. पण सावंत आप्पा किंवा साक्षी काकू गावी आल्या आहेत असं
कानावर आलं तरी त्या लागलीच त्यांच्या घरी धाव घेत. मग मुंबईहून काय आणलंय, काय नाही, मग त्यातल्या कोणत्या गोष्टी गोड बोलून ढापता
येतील याचा विचार त्यांच्या डोक्यात सुरू होई. म्हणून सावंत आप्पांना त्यांचा
प्रचंड राग. मिनाक्षी वहिनी आल्या की सावंत आप्पांच्या कपाळाला आठ्या पडल्याच
म्हणून समजा. त्यांच्या कपाळावरच्या आठ्या पाहूनच मिनाक्षी वहिनी आल्या पावली मागे
फिरल्या. कारण त्यांना माहित होतं की यावेळेस आपल्याला काही मिळणार नाही.
एव्हाना दुपार झाली
होती. जिभेवर अजूनही घावण्याची चव रेंगाळत होती, पण चुलीवरच्या वरण भाताला कोणीही केव्हाही तयार
असतं. आईच्या मदतीने सावंत आप्पांनी वरण भात बनवला. वरण भात, आईनं गेल्या मे महिन्यात बनवलेलं लोणचं आणि तूप.
आहाहाह. क्या बात!
कोणताही खास दिवस
नसताना त्यादिवशी सावंत आप्पा केळीच्या पानावर जेवले. शेणानं सारवलेली पडवी आणि
केळीच्या पानावर साधं सुधं पण चवदार जेवण म्हणजे आजच्या लोकांच्या कल्पना आणि
दृष्टीपलीकडची गोष्ट.
![]() |
अणुस्कूर घाट, कोल्हापूर-राजापूर घाट |
दिवस असेच भरभर
निघून जात होते. सावंत आप्पांना अधूमधून मुंबईची आठवण येत होती, मात्र तरीही गाव सोडवेना. त्यातही आई आजारी
असल्याने तिची सेवा करण्यातच त्यांचा अख्खा दिवस जात होता. या मधल्या काळात
त्यांनी घराची छान साफसफाई करून घेतली.
बरेच दिवस बोलणं
झालं नाही म्हणून त्यांचे मित्र म्हणजे राणे अण्णा हे सावंत आप्पांना खास भेटायला
आले. वामकुक्षीत सावंत आप्पा असताना राणे अण्णांनी त्यांना हाक मारली,
‘काय रे तीनसांच्याला झोपतोस कसला?’
राणे अण्णांची हाक
ऐकताच आप्पा डोळे चोळत उठले.
‘अरे दुपारी कधी झोप लागली कळलंच नाही. हल्ली गावी
आल्यापासून छान शांत झोप लागते. बरं वाटतं जरा.. तू केव्हा आलास? बैस ना.’
सावंत आप्पांनी
त्यांना बसण्याचा आग्रह केला. आत जावून सावंत आप्पांनी चुलीवर चहा ठेवला.
‘कोरा चहा चालेल ना रे?’ सावंत आप्पांनी आतूनच हाक मारत विचारलं. ‘तुझ्याकडे कसला दुधाचा चहा मिळणार मला? शहरात राहिलास तरी कोरा चहा काही सोडला नाहीस’, राणे आण्णा म्हणाले. राणे अण्णा आणि सावंत आप्पा
म्हणजे बालपणीचे दोस्त. सावंत आप्पा मॅट्रिक झाल्यावर मुंबईला नोकरीच्या शोधात
गेले आणि राणे अण्णांनी मॅट्रिकनंतर आपली शेतीच स्विकारली. त्यामुळे आप्पा गावी
आले की यांची मैफल जमलीच म्हणून समजा.
‘तुझ्या सुनेला पाहतो आम्ही नेहमी बातम्यांमध्ये.
बरं वाटतं आपल्या गावातलं असं कोणी टिव्हीवर दिसलं की’, अण्णा म्हणत होते.
‘हो रे, बिचारी
फार मेहनत घेतेय. ना धड जेवायला मिळत नाही धड मुलाकडे लक्ष द्यायाला वेळ. तरीही
वेळात वेळ काढून सारी हौसमौज करते. म्हणून आमच्या हिला म्हटलं मुलांचा संसार
मार्गी लागेस्तोवर रहा त्यांच्यासोबत. तेवढीच त्यांनाही मदत.’ आप्पांनी अण्णांना सांगितलं. आप्पांची सून एका
प्रसिद्ध चॅनेलवर अँकर होती. त्यामुळे गावातील लोकांना तिचं फार कौतुक. आप्पांनी
आपल्या मुलांनाही उच्च शिक्षण दिलं होतं. लेकही एका डिजिटल मार्केटिंगच्या मोठ्या
कंपनीत कामाला होती. मुलानंही तसंच काहीसं शिक्षण घेऊन आपला स्वतःचा व्यवसाय सुरू
केला होता. एकंदरीत आप्पांच्या घरात सुबत्ता होती, पैशा-अडक्याची कमतरता नव्हती. म्हणून त्यांनीही
गावात छान टुमदार घर बांधावं अशी सार्यांची इच्छा. पण आप्पांना गावातील घराचं
घरपण घालवायचं नव्हतं. कित्येक पिढी या घरात नांदल्या, कितीतरी थोरा-मोठ्यांचे पाय या घराला लागलेत. ते
सारं पुसून, खोडून काढून आपण तिथं मोठाली माडी बांधायची हे
काही आप्पांना पटत नव्हतं. नाही म्हटलं तरी थोडीफार डागडुजी करून आप्पांनी घर
मजबूत ठेवलं होतं, पण हल्ली गावात
सगळेच मोठाले बंगले बांधत असल्याने त्यांनी असंच काहीसं बांधावं असं आण्णांना
वाटे.
‘आई आहे तोवर तिलाही बघू दे लेकाचा बंगला’, राणे आण्णा सावंत आप्पांना सांगत होते. ‘लेकाचा बंगलाच बघायचाय ना, मग मुंबईत घेऊन जाईन आईला. पण गावचं घर नाही
मोडणार. गावचं गावपण असतं इथल्या मातीतल्या घरात. ही घरंच जर तोडून आपण बंगले
बांधले तर शहरात आणि मुंबईत फरक तो काय?’ सावंत
आप्पा राणे आण्णांना समजावत होते.
बाजूला पडून
राहिलेल्या निर्मलाताई हे सारं ऐकत होत्या. निर्मलाताईंचं लग्न झालं तेव्हा हे घर
म्हणजे एक खोपा होता नुसता. शेतीवाडीही फारशी नव्हती. मात्र सावंत आप्पांच्या
वडिलांनी थोडा-थोडा पैसा अडका साठवून सारं काही व्यवस्थित केलं. मुलांना शिक्षण
दिलं, त्यांना मुंबईत स्थिरस्थावर होण्यासाठी मदत केली
आणि आपल्या वाटेवरून पुन्हा निघून गेले. हे घर असंच अबाधित राहावं असं
निर्मलाताईंनाही मनापासून वाटत होतं. ‘निदान
मी जिवंत असेपर्यंत तरी हे घर तोडू नका’ असं
त्यांनी आप्पांना सांगून ठेवलं होतं. निर्मलाताईंनाही याच जुन्या घराच्या कुशीत
आपलं उरलेलं आयुष्य घालवायचं होतं. बोलता बोलता बराच वेळ निघून गेला. राणे आण्णा
निघून गेले. पण सावंत आप्पांच्या डोक्यात एक वेगळीच पाल चुकचुकायला लागली.
आपण आहोत तोवर हे घर
असंच राहिल, पण आपल्यानंतर या घराचं काय होईल? वडिलोपार्जित घर पाहण्यासाठी तरी मुलं गावाकडे
परततील का? त्यांना तशीही गावची ओढ कधीच नव्हती. आजी, बाबा गावी असतात म्हणून पोरं गावची चौकशी तरी
करतात. पण आपल्यानंतर काय?
या मुलांच्या मनात
गावची ओढ लागावी याकरता काय करता येईल याचा विचार आप्पा करत होते. आता
निर्मलाताईंची प्रकृती थोडीफार सुधारत होती. आणि आप्पांच्या हिनेही आता मुंबईत
येण्याचा धोशा लावला. पण आप्पांना गाव काही सोडवेना. मुंबईच्या नेहमीच्या
रहाटगाड्याची त्यांना आता भितीच वाटत होती. गावी कसं शांत, निर्मळ सगळं. कसली कटकट नाही की कसला त्रास नाही.
गावची थोडीफार कामं केलं की शरीरही दणकट बनतं. पण मुंबईला मुलं, नातवंडं असल्याने त्यांनाही भेटण्याची ओढ त्यांना
लागलेली. एव्हाना डिसेंबर महिना सुरू झाला होता. ख्रिसमसची सुट्टी नातवाला लागणार
होती. त्यामुळे आजोबांनी आतातरी मुंबईला यावं म्हणून त्यानेही हट्ट धरला. आजोबांना
नातवांना नाराज करता येईना. अखेर त्यांनी पुन्हा मुंबईला जाण्याचं ठरवलं. मिनाक्षी
वहिनींना आईची जबाबदारी घेण्यास सांगितलं, आणि मुद्दामच त्यांच्या हाती थोडेफार पैसे
टेकवले. जेणेकरून त्या खरंच आईची काळजी घेतील.
समृद्ध, सुंदर गाव सोडून आप्पा मुंबईला रवाना झाले. मुंबईच्या
गर्दीत जणू हरवले. नातू दृष्यमला ख्रिसमसची सुट्टीही लागली. आता कुठेतरी विंटर
वेकेशनला जाण्याचे प्लॅन्स ठरत होते. कोणी दिल्ली म्हणत होतं, कोणी उत्तर प्रदेश म्हणत होतं. पण कोणालाच गावची
ओढ लागली नाही. नातवाने तर कधी गावचं तोंडही पाहिलं नसेल. त्यामुळे आप्पांनी
ठरवलंच की यंदा याला गाव फिरवायचंच. आप्पांनी प्रस्ताव मांडला, ‘आपण गावी जाऊ.’ गाव काय असतं, तिकडे लोक कसे राहतात हे एवढुश्या जिवाला काहीच
माहित नसणार. त्यामुळे त्याला गावची ओढ लागावी, गावची माती त्याच्या पायांना लागावी याकरता
आप्पांनी गावी जायचा हट्ट धरला. आधी नानाचा पाढा सुरू झाला, पण कालांतराने सगळ्यांनी गावी जायचं ठरवलं.
मुलाच्या चारचाकीनं
सारेच गावी रवाना झाले. मुळात कोकणातील प्रवास म्हणजे एक प्रकारचं स्वर्गसुखच
असतं. इवल्याश्या वाटेतून वाट काढत जाणारी गाडी नागमोडी वाट काढत जेव्हा पुढे
सरकते तेव्हा तिथून एखादा वेगळाच रस्ता आपोआप निर्माण होतोय की असंच वाटतं. हे
सारं पाहताना द़ृष्यमलाही नवल वाटलं. ‘डॅडा हा
रस्ता कुठून आला आता? डॅडा हा रस्ता आता
संपला होता ना,
मग आता कसा आला?’ असे अनेक गंमतीशीर प्रश्न विचारून त्यानं भंडावून
सोडलं. सहसा प्रवासात मुलं झोपी जातात, पण
द़ृष्यम झोपला नव्हता. त्याला हे काहीतरी अजब रसायन आहे असं वाटू लागलं.
आजोबांच्या मांडीवर बसून दर्याखोर्यातून जाणारी वाट त्यानं पाहिली. ‘आज्जोबा तुम्हीपन या रोडने गावी जाता? मग तुम्हाला माहित असेल ना या रस्त्याला पोथहोल
कसा पडला?’ आप्पांना आधी कळलंच नाही की हा पोथहोल नेमकं
कशाला म्हणतोय?
नंतर दृष्यंत म्हणाला की ‘हा रोडच्या बाजूला पोथहोल आहे ना, ते बघ तिकडे स्मॉल स्मॉल मॅन पण दिसताहेत.
आज्जोबा या पोथहोलमध्ये हे मॅन कसे गेले?
आजोबांना त्याच्या
या प्रश्नाचं कुतूहल वाटलं. ‘बाळा हे पोथहोल नाही, याला दरी म्हणतात. आणि त्या दरीच्या पायथ्याशी
आता गावं वसली आहेत. आपण लांबून पाहतोय ना म्हणून ते मॅन आपल्याला स्मॉल स्मॉल
दिसताहेत.’ आप्पा दृष्यंतला सांगत होते.
जसंजसं दूर जावं
तसतसं आता धुकं वाढत होतं. धुक्यामुळे रस्ताही अस्पष्ट झाला होता. कोकणातील
रस्त्यांवर गाडी चालवायची म्हणजे गाडी चालक तसा तरबेजच हवा. निशांत मात्र
पहिल्यांदाच गाडी घेऊन गावी आलेला. त्यामुळे या रस्त्यांवरून गाडी चालवताना त्याची
चांगलीच बोलती बंद झाली होती. त्यानं शेवटी गाडी बाजूला लावली. वातावरण पूर्वपदावर
येण्याची वाट पाहिली. बराचवेळ थांबल्यावर धुकं कमी झालं. मग निशांतने गाडी हळूहळू
अंदाज घेत पुढे काढली.
इकडे निर्मलाताईंना
काहीच माहित नव्हतं. मिनाक्षी वहिनी अधीमधी येऊन निर्मलाताईंची चौकशी करून जात
असत. पैसे मिळाल्यामुळे त्यांना तसं करणं भाग होतं. अखेर गाडी गावात आली. निशांतने
मुद्दाम गाडीचा हॉर्न वाजवला. आपल्या मळ्यापर्यंत कोणाची बरं गाडी आली हे
पाहण्याकरता मिनाक्षी वहिनी बाहेर आल्या. गाडीतून उतरताना त्यांनी सावंत आप्पांना
पाहिलं आणि त्यांनी लागलीच ही गोष्ट निर्मलाताईंच्या कानावर घातली. निर्मलाताईंना
विश्वासच बसेना. त्याही हळूहळू काठी टेकत टेकत बाहेर आल्या. दृष्यमने कित्येक दिवसांनी
आपल्या पणजीला पाहिलं होतं. नातवंडं-पोतवंडं बघता येणंही एक वेगळाच आनंद असतो.
सावंत आप्पांनी
निशांतला आणि निशाला आजीच्या पाया पडण्याची खूण केली. आपल्या खांद्यावरची ओढणी
डोक्यावर ठेवत निशा आणि निशांत आजीच्या पाया पडले. त्यांचं अनुकरण करत दृष्यमही
पणजीच्या पाया पडला. मुलं मोठ्यांचं अनुकरण करतात हेच यातून कळलं. आप्पांनाही आनंद
झाला. काहीही न सांगता दृष्यम पणजीच्या पाया पडला म्हणजे त्यालाही आपल्या
संस्कृतीची जाणीव करून दिली तर तो आपली संस्कृती नक्कीच पुढे घेऊन जाईल याची
त्यांना खात्री झाली.
7 मजल्यांच्या इमारतीत
राहिलेल्या द़ृष्यमने असं कौलारू घर केव्हाच पाहिलं नव्हतं. त्यामुळे आपण एखाद्या गुफेतच
गेल्यासारखं त्याला वाटलं. हे घर, इथलं वातावरण सारंच
त्याच्यासाठी नवीन होतं. पण कुतुहलाने तो सारंकाही न्याहाळत होता. आजूबाजुची घरं
शहरातल्या बंगल्यासारखी होती, मग आपणच अशा घरात का
राहतो असंही त्यानं आप्पांना विचारलं. तेव्हा आप्पा हसूनच त्याला म्हणाले, ‘बाळा आपलं हे घर माझ्या आजोबांनी बांधलंय. म्हणून
मी ते असंच ठेवलंय. तुही असंच ठेवशील ना रे तुझ्या आजोबांनी बांधलेलं हे घर.’ खरंतर हे सारं कळण्यासाठी दृष्यमचं वय खूपच कमी
होतं. पण आप्पा आतापासूनच त्याच्या मनात जुन्याघराविषयी प्रेम निर्माण करत होते.
पाच सहा दिवस मस्त
वेकेशन एन्जॉय केल्यावर निशांत, निशा आणि दृष्यम
मुंबईला परत निघाले. निर्मलाताईंच्या आग्रहाखातर साक्षीताईंनीही अजून काही दिवस
गावी राहण्याचा निर्णय घेतला.
असेच भरभर दिवस
निघून जात होते. निर्मलाताईंची तब्येतही सारखी खालीवर होत होती. त्यांच्या
तब्येतीची काळजी घ्यायला त्यांची सून असल्याने सावंत आप्पा निश्चिंत होते. या
काळात त्यांनी गावातील अनेक कामंही स्वखर्चाने मार्गी लावली. शाळेच्या
डागडुजीपासून ते मंदिरापर्यंत सगळीकडे त्यांनी स्वतः राबून कामं करून घेतली. गावात
आता आनंदीआनंद होता. सावंत आप्पाही आपल्या छोट्याशा कुटुंबासोबत आनंदी होते. कधीतरी
नातू, सून गावी येऊन भेट देऊन जात असत. त्यामुळे दृष्यमला
आता गावची चांगलीच ओढ लागली होती. आपल्या पश्चात आपला नातू आपलं घर सांभाळेल याची
त्यांना खात्री वाटली.
त्यामुळे त्यांनी
छान फळबाग, फुलबाग फुलवली. काजू, नारळ, फणस अशा
झाडांचीही लागवड केली. आपणच आपल्या पुढच्या पिढीसाठी अशी वनराई मागे सोडून द्यायची
असते, मगच ती वर्षानुवर्षे टिकते. दृष्यमलाही
झाडा-झुडुपांची आवड होती. त्यानं मुंबईला मम्माच्या मदतीने बाल्कनीतही छान फुलबाग
तयार केली होती. त्यामुळे गावात अवाढव्य परिसरातील बाग त्याला जाम आवडत होती.
दोन-एक दिवसांनी तरी त्याचा फोन यायचाच आणि झाडांचीही तो विचारपूस करायचा.
गाव झाडा-झुडपांनी, नदीनाल्यांनी समृद्ध होतं. नद्यांना बारमाही पाणी, त्यामुळे या गावामुळे अनेकांची तहान भागेल असं एक
धरण बांधाण्याची योजना गावात आली होती. त्यासाठी आजूबाजूची गावं विस्थापित होणार
होती. या प्रकल्पात बाधित होणार्या कुटुंबांना बक्कळ पैसाही मिळणार होता.
त्यामुळे गावातील बहुतेक कुटुंबांनी या प्रकल्पाला पसंती दिली. वडिलोपार्जित घर
मोडून मोठाले बंगले बांधणार्यांना लाखो रुपये मिळणार होते. त्यामुळे या
प्रकल्पाला कोणीच विरोध केला नाही. पण या प्रकल्पाबाबत जेव्हा सावंत आप्पांना
माहिती मिळाली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. आपल्या पोटचं पोरगं
गेल्यावर बापाचं काळीज जसं भग्न व्हावं अगदी तसंच सावंत आप्पांना दुःख झालं. या
सुजलाम सुफलाम असणार्या गावात धरण बांधल्यावर गावाची पार रयाच जाईल. सगळेजण
कुठच्या कुठे फेकले जातील. पैशांच्या आमिषाने हे लोक एकप्रकारे आपल्याला विकतच घेत
आहेत. शिवाय गावातील सुपिक जमिनही पाण्याखाली जाईल. असे एक ना अनेक आरोप सावंत
आप्पांनी केले. पण अख्ख्या गावासमोर सावंत आप्पाचं काही चालेना..
‘आप्पा, तुम्ही
शिकून मुंबईत गेलात. तिथं बक्कळ पैसा कमवलात. आता तुमची मुलंही पैशात लोळताहेत.
आम्हाला आताकुठे थोडाफार पैसा दिसायला लागलाय. त्यामुळे प्रकल्पाला उगाच नाट लावू
नका. शिवाय आपलं उद्ध्वस्त झालेलं गाव एकाच ठिकाणी वसवण्याची शाश्वती दिलीय. तसंच, प्रत्येक कुटुंबातील एकाला या प्रकल्पात नोकरीही
मिळणार आहे. अजून काय हवंय आम्हाला?’ असं प्रत्युत्तर राणे अण्णांनी सावंत आप्पांना
दिलं. सावंत आप्पा आता हतबल झाले. त्यांना काय करावं काहीच कळेना.
धरण बांधल्यावर आपलं
गाव देशाच्या नकाशात झळकेल. पर्यटनस्थळाचाही दर्जा मिळेल. अनेकांचे पाय या गावाला
लागतील, असंही आप्पांना सांगण्यात आलं. पण सावंत आप्पांना
काही केल्या या गोष्टी मान्य होईनात. ज्या घराची डोळ्यात तेल टाकून सुरक्षा केली
तेच घर आता कायमचं मोडणार होतं. थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद लाभलेलं घर एका क्षणात
उद्ध्वस्त होणार होतं. त्यामुळे सावंत आप्पांना या सार्या गोष्टींचं फार दुःख
झालं. शिवाय बक्कळ पैसे मिळणार असल्याने मुंबईहून मुलांनीही या प्रकल्पाला मंजुरी
दिली. ‘आप्पा उगाच गावच्या विकासात खोड घालू नका’, असं निशांतने आप्पांना निक्षून सांगितलं. आपली
मुलंच आपल्या बाजूने नाहीत म्हटल्यावर आपण कोणासाठी लढायचं? ज्या पोरांसाठी झाडं जगवली, घर टिकवलं त्यांनाही आता पैसा दिसू लागल्याने
आप्पांनाही या प्रकल्पाला मूक संमती दिली.
धरण प्रकल्पाचे सारे
सोपस्कार पार पडले. लोकांच्या खात्यात अॅडव्हान्स जमा झाला. उरलेले पैसे गाव
जमिनदोस्त झाल्यावर जमा होणार होते. गावच्या बाजूलाच असलेल्या एका मोकळ्या जागेत
या गावाचं पुनर्वसन करण्यात आलं. आप्पानाही तिथंच घर मिळालं. पण आप्पांना ना
पैशांचा हव्यास होता आणि ना नव्या घराचा. गाव रिकामे झाल्यावर प्रकल्प अधिकार्यांनी
गावातील प्रत्येक घरावर जेसीबी लावण्यास सुरूवात केली. गेली कित्येक दशकं डौलानं
उभं असणारं गोकूळ निवास अखेर एका प्रकल्पामुळे मोडीस निघालं. तिथं घरावर जेसीबी
चालला आणि इथं आप्पांनी गावाचा निरोप घेतला, पुन्हा कधीच न परतण्यासाठी.
निर्मलाताईंना घेऊन आप्पा कायमचे मुंबईला स्थायिक झाले. मरणाअगोदर काही काळ आपल्या
मातीत घालवायला मिळाला याचंच त्यांना समाधान वाटलं. मुंबईत राहायला आल्यावर दोनच
वर्षात निर्मलाताईंचं निधन झालं. त्यांचा अंत्यविधीही मुंबईतच करण्यात आला. गोकुळ
निवास मोडलं तेव्हाच आप्पांसाठी गावही मोडलं होतं. कायमचं.
(ही कथा दैनिक महाराष्ट्र दिनमान २०१८ या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली आहे.)
Comments
Post a Comment