Film Review : आनंदी गोपाळ
समाजातील अनिष्ट बंधने झुगारून परदेशी शिक्षण घेणार्या आनंदीबाई जोशी या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर. 19 व्या शतकात त्यांनी वैद्यकीय पदवी मिळवली. परदेशात शिक्षण घेणार्या आनंदीबाईंविषयी भारतात प्रचंड कुतूहल आहे. पण त्यांना परदेशात जावूनच शिक्षण का घ्यावं लागलं याचा सखोल विचार आपण कोणीच केलेला नाही. नेमक्या याच प्रश्नाची उकल आनंदी गोपाळ या चित्रपटातून करण्यात आली आहे. त्यामुळे हा चित्रपट पाहताना आनंदीबाई जोशी यांचा चरित्रपट तर उलगडतोच शिवाय तत्कालिन परिस्थितीचीही ओळख होत जाते.
चरित्रपट कसा उलगडत जातो यावर त्या चित्रपटाचं यश अवलंबून असतं. त्यामुळे केवळ चरित्रपटांच्या साच्यातून चित्रपट तयार करण्यापेक्षा सृजनात्मक दिग्दर्शन केल्यास तो चित्रपट अधिक खुलेल या हेतूने दिग्दर्शक समीर विद्ंवस यांनी आनंदी गोपाळमध्ये दिग्दर्शनाचा एक उत्तम आणि वेगळा प्रयोग सादर केला आहे. आनंदीबाईंचा शैक्षणिक प्रवास या चित्रपटातून उलगडत जातो. यमुना जोशी ते डॉ. आनंदी गोपाळ जोशीचा प्रवास रुपेरी पडद्यावर सादर झाल्याने आजच्या महिलांना त्यांचा जीवनपट खरोखरीच प्रेरणादायी ठरेल याची पुरेपूर काळजी लेखक, दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी घेलेली आहे. तत्कालिन परिस्थितीशी झगडा करत, अनिष्ट सामाजिक बंधने झुगारून आनंदीबाईंनी स्त्री शिक्षणाची वीट रचली. त्यांच्या नावापुढे डॉक्टर ही पदवी लागण्यात जितका आनंदीबाईंची सचोटी, प्रयत्न महत्त्वाचे आहेत तितकेच गोपाळरावांनी दिलेला पाठिंबाही महत्त्वाचा आहे. कारण आपल्या बायकोने कोणत्याही बंधनात न राहता तिने माणूस म्हणून जगावं असा अट्टहास गोपाळरावांचा होता. स्त्री शिक्षणासाठी झटणार्या गोपाळरावांची भूमिका ललित प्रभाकरने उत्तम साकारली आहे. धीट, तर्हेवाईक वागणारे गोपाळराव हळवे झालेले पाहताना प्रेक्षकांच्या डोळ्यातही पाणी आणतात. तर, आनंदीबाई साकारण्यासाठी अंकिता गोस्वामी, भाग्यश्री मिलिंदने घेतलेली प्रचंड मेहनत त्यांच्या अभिनयातून दिसून आली. हुशार असलेल्या आनंदीबाई गोपालरावांच्या अनुपस्थित किती हळव्या होत याचंही दर्शन चित्रपटातून होतं. तत्कालीन समाजजीवनावर असलेली ब्रिटिशांची राजवट, संस्कृती-परंपरांच्या नावाखाली चाललेला बाजार पाहून आपल्याला आता मिळालेल्या स्वातंत्र्याचा हेवा वाटेल. या चित्रपटातून केवळ आनंदीबाईंचा शैक्षणिक प्रवासच दाखवण्यात आला. त्यांचा मृत्यूही एकप्रकारे समाजातील अनास्थेचाच बळी होता. मात्र त्याविषयी चित्रपटात फारसा उल्लेख नाही.
चित्रपटातील पाश्वसंगीत चित्रपट पुढे नेण्यास मदत करतात. गाणी श्रवणीय आहेत. गाण्यांना वैभव जोशीचे शब्द असून ऋषीकेश दातार, सौरभ भालेराव, जसरास जोशी यांनी गाणी गायिली आहेत. योगेश सोमन, क्षिती जोग यांनीदेखील आपल्या वाट्याला आलेल्या व्यक्तिरेखा उत्तम साकारल्या आहेत. एकूणच काय तर, डॉ.आनंदीबाई जोशी यांचा संघर्ष अनुभवायचा असेल तर चित्रपट नक्की पाहायला हवा.
![]() |
दैनिक महाराष्ट्र दिनमान |
Tags- Film Review : आनंदी गोपाळ, mararthi film, marathi film review, anandi gopal, anandi bai joshi, first doctor lady
Comments
Post a Comment