मुंबईचे सर्वोत्कृष्ट विक्रमवीर
आपल्या एखाद्या कलाकृतीला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सचा किताब मिळणं म्हणजे त्या कलाकारासाठी तो सर्वोत्तम पुरस्कार असतो. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या सर्वोत्कृष्ट 100 विक्रमवीरांच्या यादीत मान मिळणं हा त्यातून सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. मुंबईतील चार तरुणांना हाच सर्वोत्तम पुरस्कार मिळाला आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने नुकतीच सर्वोत्कृष्ट 100 विक्रमवीरांची घोषणा केली, त्यापैकी 4 विक्रमवीर हे मुंबईतील असून अभिषेक साटम, चेतन राऊत, आबासाहेब शेवाळे, मुकेश साळुंके अशी या तरुणांची नावे आहेत.
इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्ससाठी दरवर्षी हजारो विक्रमवीरांची नोंद होत असते. देशभरातून अनेक सृजन कलाकार या पुरस्कारासाठी नोंदणी करतात. यंदाच्या 2018-19 सालात तब्बल 1300 लोकांना इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सचा किताब मिळाला आहे. दरवर्षी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे सर्वोत्तम 100 विक्रमवीरांची यादी जाहीर केले जाते. यंदाही ही यादी जाहीर करण्यात आली. भारत, इंडोनेशिया, व्हिएतनाम, नेपाळ, बांगलादेश बुक ऑफ रेकॉर्ड व एशिया बुक ऑफ रेकॉर्डच्या मुख्य संपादकांनी 1300 विक्रमवीरांच्या यादीतून सर्वोत्कृष्ट 100 विक्रमवीरांची यादी तयार केली. या सर्वोत्कृष्ट 100 विक्रमवीरांच्या यादीत आपल्या मुंबईतील 4 तरुणांचाही समावेश आहे. या पुरस्काराचा वितरण सोहळा 15 मार्च रोजी भोपाळच्या संत हरिद्राम मेडिकल कॉलेज येथे पार पडला.
मुकेश साळुंके या तरुणाने हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जगातील सर्वांत मोठे थर्माकॉल बॉल मोझेक पोर्ट्रेट तयार केले होते. यासाठी 45 हजार थर्माकोल बॉलचा वापर करून 8 फूट लांब व 7 फूट रुंद पोट्रेट तयार केले होते. 19 मार्च 2018 रोजी ठाण्यात या मोझेक प्रदर्शन भरवले होते.
सचिन तेंडूलकरचा मोठा चाहता असलेल्या अभिषेक साटम या तरुणाने त्याच्या रंगरेषा रांगोळी ग्रूपसोबत सचिन तेंडूलकरच्या वाढदिवसाला गेल्यावर्षी सर्वात मोठे पेपर पोर्ट्रेट साकारले होते. 450 डझन पतंगाचे कागद वापरून 50 फुट लांब व 30 फुट रुंद 24 एप्रिल 2018 रोजी आर.एम.भट्ट हायस्कूलमध्ये या पेपर पोर्ट्रेटचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते.
2018-19 या एका वर्षांत तब्बल 6 विक्रम करणार्या चेतन राऊत या तरुणाने छत्रपती शिवाजी महाराजांचे पोर्ट्रेट साकारले होते. तब्बल 75 हजार सीडी वापरून 110 फुट लांब व 90 फुट रुंद आकाराचे हे पोट्रेट होते. 3 मे 2018 रोजी विक्रोळी येथे त्याच्या कलाकृतीचे प्रदर्शन भरले होते.
तर, आबासाहेब शेवाळे या तरुणाने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याचे जगातील सर्वांत मोठे मातीच्या दिव्यांनी मोझेक तयार केले होते. मोझेकसाठी तब्बल 4482 मातीच्या पणत्यांचा वापर करण्यात आला होता. 14 फुट लांब व 9.5 फुट रुंद असलेले हे पोर्ट्रेट 28 ऑक्टोबर 2018 रोजी सी वुड्स ग्रॅण्ड सेंट्रल मॉल, नवी मुंबई येथे प्रदर्शनासाठी ठेवले होते.
![]() |
दैनिक महाराष्ट्र दिनमान |
Comments
Post a Comment