अबकी बार.. जागरूक मतदार!

political slogan, loksabha election, indira gandhi, soniya gandhi, bjp, congress, yuti, aghadi, abki bar modi sarkar

आपला मुद्दा रेटण्यासाठी, आपले प्रॉडक्ट खपवण्यासाठी जाहिरात हा सर्वात महत्त्वाचा फंडा असतो. आपण जाहिरातीतून ग्राहकांना गळ घालण्यात यशस्वी ठरलो तरच आपले प्रॉडक्ट विकले जाणार. या जाहिरातीत सर्वांत महत्त्वाची भूमिका बजावते ती टॅगलाईन अर्थात शीर्षवाक्य. आकर्षक टॅगलाईनच्या बळावर अनेकदा कामचलाऊ मालही ग्राहकाच्या गळ्यात मारला जातो. जो जाहिरातबाजीचे विक्रीतंत्र अवलंबतो, घसा फुटेपर्यंत ओरडतो, मालाची जाहिरात करतो त्याच्याकडील मातीही विकली जाईल पण, सोने विकणारा जर गप्प राहिला तर त्याचे सोनेही विकले जाणार नाही असे म्हणतात ते याचसाठी. जाहिरातीची हीच चाल राजकारणातही वापरण्यात येते. निवडणुका जवळ आल्या की जाहिराती आणि त्यासोबतच पक्षाचं धोरण सांगणारी घोषवाक्ये कानावर यायला लागतात. आता आचारसंहिता लागल्याने जाहिराती नसल्या तरीही कार्यकर्त्यांच्या तोंडून, सोशल मीडियाच्या माध्यमांतून चमकदार, लक्षवेधी घोषवाक्य सहज ऐकायला-वाचायला मिळतात. स्वातंत्र्योत्तर काळात ‘नया भारत बनाऐंगे’ असा नारा देत पंडित नेहरू पंतप्रधान बनले. पूर्वी निवडणुका लागल्या की रिक्षात भोंगा लावून ताई माई अक्का...चा गजर करत रिक्षा गल्लीबोळातून फिरवली जायची. आता प्रचारांचे माध्यम बदलले असल्याने रिक्षा बेदखल झाल्या. मात्र आकर्षक घोषवाक्य आजही मतदारांना पक्षाकडे आकृष्ट करण्यासाठी मदत करतात. 
political slogan, loksabha election, indira gandhi, soniya gandhi, bjp, congress, yuti, aghadi, abki bar modi sarkar
1971 च्या निवडणुकीत इंदिरा गांधीजीनी ‘गरिबी हटाव’चा नारा दिला होता. स्वांतत्र्योत्तर काळातही भारत गरिबीने पोखरला होता. म्हणूनच इंदिराजीनी मतदारांना भावनिक साद घातली. इंदिराजीच्या भावनिक आवाहनानंतर जनतेला आणीबाणीचा सामना करावा लागला. म्हणूनच आणीबाणीच्या काळात ‘इंदिरा हटाव देश बचाव’चा नारा जनसंघाकडून देण्यात आला. मात्र जनसंघाचे मोट बांधलेले सरकार अल्पावधीतच कोसळले. ‘सरकार वो चुने जो चल सके’ असा पलटवार करीत इंदिरा गांधी पुन्हा गरजल्या. मात्र गेल्या सत्तर वर्षांत ना गरिबी हटली आणि ना योग्य क्षमतेच्या हातात सत्ता गेली. असं असतानाही आपण किती सक्षम आहोत, आमची धोरणं किती लोकहिताची आहेत हे पटवून सांगण्यासाठी, आपलेच काय ते खरे हे लोकांच्या गळी उतरवण्यासाठी आकर्षक घोषवाक्य तयार करण्यासाठी प्रत्येक पक्षाकडे एक सक्षम टीम आहे. म्हणूनच ‘अबकी बार मोदी सरकार’ला प्रतिसाद देत जनतेने भाजपवर विश्वास ठेवला आणि 2014 साली नरेंद्र मोदी सरकारला सत्तेत बसवलं. स्वातंत्र्यप्राप्तीपासून सत्तेत असलेल्या काँग्रेसला जनता वैतागली होती, म्हणूनच भाजपाकडून ‘अबकी बार...’चे घोषवाक्य देण्यात आले. या घोषवाक्यातच सत्तापालटाचा संदेश होता. लोकांनीही या घोषावाक्यावर विश्वास ठेवला आणि मोदी सरकारला सत्तेत बसवलं. मोदी सरकारकडून जनतेच्या प्रचंड अपेक्षा होत्या. शिवाय भाजपाने मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, उज्ज्वला, मुद्रा योजनेसारखी चमकदार स्वप्नेही दाखवली. पण गेल्या 5 वर्षांत भाजपने समाजमनात हवी तशी हवा भरली नाही. शिवाय काही चुकीच्या धोरणांमुळे भाजपाला येणारी निवडणूक अवघड झाली आहे. याची पुरती जाणीव भाजपला झाल्यामुळे त्यांनी पुन्हा ‘अबकी बार फिरसे मोदी सरकार’चा नारा दिला आहे. 1996 च्या निवडणुकीत अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात ‘अबकी बारी अटल बिहारी‘ असं घोषवाक्य प्रचारसभेत फिरत होतं. त्यातच बदल करून ‘अबकी बार मोदी सरकार’चा जन्म झाला असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. घोषवाक्य हे एक असे हत्यार आहे, जे अगदी अल्पकाळात सर्वसामान्यांवर प्रभाव पाडू शकते. त्यामुळे या आयुधाचा वापर राजकारण्यांनी केला नसेल, तर नवलच! ‘अच्छे दिन आयेंगे,’ ‘सबका साथ सबका विकास’चा नाराही यंदाच्या निवडणूक प्रचारात आहे. तर ‘मोदी है तो मुमकीन है’, ‘फिर एक बार मोदी सरकार’चा नव्याने समावेश झाला आहे. स्थानिक कार्यकर्त्यांकडून रोज नवनव्या क्लृप्त्या वापरून आकर्षक टॅगलाईन तयार होताहेत. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तर म्हणे तब्बल 15 लाख टॅगलाईन तयार करून ठेवल्या आहेत. सृजनशील डोक्यातून तयार होणारी ही घोषवाक्ये जनमाणसांत लगेच रुळतात. पक्षाची, उमेदवाराची धोरणं या एका घोषवाक्यातून समजतात. सध्या सोशल मीडिया हे प्रचाराचे हुक्कमी माध्यम आहे. भाजपाने 2014 च्या निवडणुकीत सोशल मीडियाचा केलेला प्रभावी वापर पाहता सर्वच पक्षांनी सोशल मीडियाची टीम तगडी ठेवली आहे. त्यातूनच छुप्या पद्धतीने या घोषवाक्यांचा प्रचार होताना दिसतो. तसेच, विविध पक्षांतील स्वयंघोषित कार्यकर्त्यांनीही आपल्या उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी चंग बांधला आहे. मात्र मतदारराजा आता बर्‍यापैकी सजग झाला आहे. घोषवाक्य, जाहिरातींना भुलून मतदान करणाऱ्यांचे दिवस इतिहासजमा झाले. आता उमेदवाराला पारखून, त्याच्या पक्षाच्या कामगिरीची तपासणी करून डोळसपणे मतदान करणारे नवे मतदार वाढत आहेत. आपल्या विभागातला उमेदवार आणि त्याचा पक्ष विभागाचं भलं, विकास करण्यास खरेच सक्षम आहे की नाही हे तपासूनच मतदार मतदान करतात. शिवाय यंदा राज्यात नवमतदारांची संख्याही वाढली आहे.  ही नवी पिढी अशा घोषवाक्यांना भुलते की सक्षम उमेदवाराच्या पारड्यात भरभरून मते टाकते हे निकालातून समोर येईलच.

political slogan, loksabha election, indira gandhi, soniya gandhi, bjp, congress, yuti, aghadi, abki bar modi sarkar
दैनिक महाराष्ट्र दिनमान 
Tags- political slogan, loksabha election, indira gandhi, soniya gandhi, bjp, congress, yuti, aghadi, abki bar modi sarkar

Comments