#HappyToBleed: मासिक पाळी, पवित्र की अपवित्र?


समजायला लागल्यापासून मासिक पाळीविषयीचे कोणतेच धार्मिक शिष्टाचार मी पाळलेले नाहीत. सुरुवातीला शाळेत वगैरे असताना प्रश्न पडायचे, पाळी मला आलीय, मग मी देवाला का शिवायचं नाही? अर्थात या प्रश्नाचं उत्तर तेव्हा कोणीच दिलं नाही. मग वय वाढत गेलं तशा अनेक गोष्टी वाचनात आल्या. माध्यमात आल्यावर या विषयाशी अनेकांशी चर्चा झाली. तेव्हा शिक्कामोर्तब झालं. पाळीचा आणि देवाचा तसाही काही संबंध नाही. पाळी हा एक शरीरधर्म आहे, त्याला श्रद्धेशी जोडण्यात काहीही अर्थ नाही. 

मी पूर्णत: आस्तिक आहे. रस्त्याने चालताना एखादं मंदिर दिसलं की आपोआप हात जोडले जातात. पण हे हात जोडताना माझ्या मनात कोणत्याही प्रकारची अढी नसते. अगदी सणावाराच्या दिवशी माझी मासिक पाळी सुरू असली तरीही त्याच श्रद्धेने मी मंदिरात पाया पडायला जाते. सणवार असो, कार्यक्रम असो, जत्रा-यात्रा असो मी कधीही पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेतल्या नाहीत. मी आहे त्याच परिस्थितीत प्रत्येक सणवार साजरा करत आलेय, या पुढेही करत राहीन. कारण मी आहे तशी मला माझा देव मान्य करत नसेल तर मग त्याला पुजण्यात काय अर्थ आहे? आणि मुळात हे धार्मिक शिष्टाचार आले कुठून? कोणी हे नियम लादले? कोणत्या काळापासून मासिक पाळी अपवित्र ठरली गेली? या कोणत्याच प्रश्नांची उत्तर कोणाकडेच नाहीत(जाणकारांनी मार्गदर्शन करावं).  प्रत्येक परंपरा- प्रथांमागे तत्कालीन कारणं असतात. ही कारणंच जर समजून घेतली नाहीत तर त्या प्रथा-परंपरांचं रुपांतर अंधश्रद्धेत होतं. आज समाजात पाळीविषयी अनेक गैरसमज आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून हे गैरसमज व्हॉट्सअॅप फॉरवर्डसारखे फॉरवर्ड होत आलेत. पण हे चुकीचं फॉरवर्डींग थांबवावं असं इतक्या शतकात कोणालाच का वाटलं नसेल? एकविसाव्या शतकापर्यंत असे चुकीचे समज कसे पसरून येऊ शकतात याचंच नेहमी आश्चर्य वाटत राहिलं. 

मला पाळी आलीय हे सांगायला मी कधीच लाजले नाही. मित्र-मैत्रिणींशी अगदी खुलेआम वेळप्रसंगी यावर चर्चा केली आहे. प्रोब्लेममध्ये आहे, बर्थडे आहे, कावळा शिवलाय, बाहेरची आहे असली विशेषणं मी गेल्या ५ वर्षांत तरी वापरलेली नाहीत. कारण हा शरीरधर्म मला कधीच अपवित्र वाटला नाही. जर खरंच दरमहिन्याला वाहणारं हे रक्त अपवित्र असेल तर जन्माला आलेलो आपण सगळेजण अपवित्र आहोत, असं समजायला हरकत नाही. किंबहुना ही मासिक पाळी नेहमीच माझ्यासाठी आनंदाचे क्षण घेऊन आलीय. माझ्या आयुष्यात जेव्हा जेव्हा चांगल्या घटना घडल्या आहेत, त्या प्रत्येक वेळी माझी मासिक पाळी सुरू होती. प्रहार, महाराष्ट्र दिनमान, एन वन न्यूज मराठी आणि आता नवाकाळ या प्रत्येक कामाच्या पहिल्या दिवशी मी पाळीत होते. थोडं हास्यास्पद वाटेल पण मासिक पाळी मला नेहमीच वरदान ठरलीय.

मला फारसे Period Cramps येत नाहीत. इतर दिवसात मी जितकी मोकळी, आनंदी असते, तितकीच आनंदी मी या दिवसांत असते. दुखणं-खुपणं घेऊन मी पोट धरून बसल्याचं मला फारसं आठवत नाही. पोटात दुखतंय म्हणून ना मी कधी शाळेला दांडी मारली आणि नाही कधी ऑफिसला. राहता राहिला प्रश्न मुड स्विंग्सचा, तर ते नेहमीच होत असतात, त्यासाठी विशेष मासिक पाळीची गरज नाही. 

समाजातील मासिक पाळीविषयीचा असलेला गैरसमज चटकन दूर होणार नाही. कारण क्रांती घडायला थोडा वेळ लागतोच. पण प्रत्येकाने निदान एकदा तरी विचार करून बघायला काय हरकत आहे? आज जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन आहे. या दिनापासून प्रत्येकाने आपल्या डोक्यात असलेली जळमटं स्वच्छ करायचा प्रयत्न केला तरी लवकरच समाजात बदल घडायला लागतील. प्रयत्न तर करून पाहुयात!

-स्नेहा स्वप्नाली गणेश कोलते

Comments

  1. वाह स्नेहा खरंच खूप छान लिहीले आहे आणि मासिक पाळी बद्दल सर्वांनी असाच विचार केला पाहिजे. मासिक पाळी आहे म्हणूनच सगळे जण आहे, मासिक पाळीच नसती तर कोणाचा जन्म झाला नसता.

    ReplyDelete

Post a Comment