साप, भिती आणि मी


चेंबूरला ज्या ठिकाणी मी राहायचे तिथं घरासमोरच घनदाट जंगल होतं. आमच्या शाळेच्या (चेंबूर) मागेही भरपूर झाडं होती. तिथं भरपूर साप असायचे. आमच्या भरवस्तीत साप शिरायचे. भलेमोठे साप. नाग, अजगरापासून सगळे साप मी लहानपणीच पाहिलेत. साप वस्तीत शिरले की आम्ही सगळी पोरं मोठ्या माणसांच्या मागून धावायचो. मग सर्पमित्र येऊन सापांना पकडून घेऊन जायचे. चेंबूरला खुली गटारं आहेत. त्यामुळे पावसाळ्यात या गटारातून अनेक पाण-साप यायचे. मग त्या पाणसापांना पकडायलाही आम्ही मोठ्या माणसांच्या मागे धावायचो. शाळेच्या मागेही भरपूर झाडी असल्याने आमच्या बेंचच्या खाली किंवा पत्र्यावर साप यायचे. कधीकधी भर परिक्षेत साप वर्गात शिरायचे. कधीतरी पायाखाली यायचे, कधी रस्ता अडवायचे. त्यामुळे सापांची तेव्हापासून मनात प्रचंड भिती होती. आजही ती कायम आहे. मधल्या काळात घोडपदेवमध्ये राहत असताना सापाशी संबंध तुटला होता. तिथं साप बघायचे झाले तर ते राणीबागेत जाऊन बघायचो. पण तरीही बंद पिंजऱ्याआड साप बघतानाही घाम फुटायचा.
इथं दिव्याला ज्या दिवशी शिफ्ट झाले त्याचदिवशी आमच्या मागच्या खाडीत मोठा अजगर पोरांनी पकडला. त्याला एका मोठ्या ड्रमात ठेवलं होतं. दिव्याला शिफ्ट झाल्या झाल्या पहिल्याच दिवशी अजगराचं दर्शन झाल्याने पुढे काय वाढून ठेवलंय याची जाणीव झाली. त्यानंतर कधीतरी साप दिसायचे. एकदा ऑफिसला जात असताना भरदुपारी साप चक्क माझ्या पायाखालून गेला. मी पाय टाकणार तेवढ्यात लालेलाल काहीतरी माझ्या पायाखालून काहीतरी सरपटत जाताना मला दिसलं आणि मी चार पावलं मागेच सरकले. जोरात किंचाळले. साप मात्र आपल्या डौलात एका झाडीतून निघून दुसऱ्या झाडीत शिरला. त्या रात्री मला काही झोप लागली नाही. सतत सापाचं ते दृष्य डोळ्यांसमोर येत राहिलं. या प्रसंगातून बाहेर पडतेय तोवर आमच्या बाजूच्या चाळीत एका घरात एक छोटा नाग सापडला. तेव्हापासून तर सापांविषयी भिती जरा जास्तच निर्माण झाली. भूतांविषयी जेवढी भिती माझ्या मनात नसेल तेवढी सापांविषयी आहे.
आमच्या चाळीतून बाहेर पडून मुख्य रस्त्याला जाण्यासाठी जो नेहमीचा रस्ता असतो तो एकदा काहीतरी कारणात्सव बंद होता. त्यामुळे मी दुसऱ्या रस्त्याने जात होते तेवढ्यात तिथल्या लोकांनी अडवलं. ‘पुढे जाऊ नकोस, मोठं काहीतरी आहे,’ असं लोक मागून ओरडले. मी जिथल्या तिथं थांबले. ‘मोठं काहीतरी’ म्हटल्यावर मी समजून गेले. थोडं इथंतिथं कानोसा घेतला तेव्हा ते ‘मोठं काहीतरी’ दिसलं. त्यामुळे त्या रस्त्यावरून जाणं शक्यच नव्हतं. पण चाळीतून मुख्य रस्त्याला तर पडायचं होतं.. त्यासाठी तिसरा पर्यायही होता. पण हा तिसरा पर्याय म्हणजे दोन्ही बाजूला उंचच उंच वाढले गवत आणि खड्ड्यात असलेला रस्ता. जी मुलगी रात्री एक-दीड वाजता बिंधास्त घरी यायची ती मुलगी भरदुपारी रस्त्यावरून चालताना घाबरत होती. त्या रस्त्यावरून जायचं म्हणजे मोठं दिव्यच होतं. कोणाला सोबतीला घ्यायचं म्हणजे आपला इगो आड येतो. घेतलं देवाचं नाव आणि त्या गवताच्या मधून फुटलेल्या रस्त्यावरून चालू लागले. प्रत्येक पाऊल टाकताना आपल्या पायाखाली काही आलं तर नाही ना याची खातरजमा करत होते. गवतातून पटकन कोणी बाहेर आलं तर? कोणीतरी गवतावरूनच उडी घेऊन मानेवर बसलं तर? असे असंख्य प्रश्न मी स्वत:च स्वत:ला विचारत होते. या प्रश्नांनी खरंतर भांबेरी उडालेली. पण ऑफिसला जायचंच होतं, त्यामुळे मुख्य रस्त्याला येणं महत्त्वाचं होतं. भरपावसाळी वातावरणात मला प्रचंड घाम फुटला, पण तरीही धीर एकवटून मी एकटीने तो रस्ता पार केला. त्या रस्त्यावरून अनेकदा ये- जा केलीय, अनेकदा तिथून खूप सारे प्राणीही पाहिलेत. मुगुंसपासून अनेक किटकपक्षांना पाहिलं. पण सापांची भिती काही गेली नाही.
आजही सापाविषयी मनात खूप भिती आहे. घरातही दक्षिण-उत्तर दिशेला झोपले की सापाची स्वप्न पडतात. भयंकर स्वप्न. (यामागचं शास्त्रीय कारण मला अद्यापही कळलेलं नाही.) म्हणून मी त्या दिशेने झोपणंही बंद केलं. ही स्वप्न इतकी भयंकर असतात की मी दचकून जागी होते. झोपेतच जोरात ओरडते. भूतांची स्वप्न पडल्यावरही मी जेवढी घाबरत नाही तेवढं मी सापांची स्वप्न पाहिल्यावर घाबरते.
दिनमानला असताना सापाविषयीच्या अनेक बातम्या असायच्या. त्या बातम्या लिहितानाही भिती वाटायची. सापांचे फोटो बातमीला लावताना अंग थरथर कापायचं. तेव्हा आमचे सहकारी सतीश मोरे एकदा मिश्किलीत बोलले की ‘कंप्यूटरमधला तो साप तुझ्या डेस्कवर येणार नाहीय. घाबरू नकोस. लाव तो फोटो बिंधास्त. आलाच साप बाहेर तर आम्ही आहोत.’ मग मोठ्या महत्प्रसयाने तो सापाचा फोटो बातमीला लावला. त्यानंतरही सापाच्या बऱ्याच बातम्या केल्या. त्यामुळे थोडीथोडी भिती दूर पळत गेली. एकदा सतीश सरांनीच कोणत्या तरी एका गावातला सापांचा व्हिडिओ दाखवलेला. त्या व्हिडिओमध्ये लहान लहान पोरं मोठ-मोठ्या सापांसोबत कसं खेळतात हे दाखवलं होतं. तेव्हापासून मनातून थोडीशी भिती दूर गेली. पण आता पुन्हा सापांची भिती वाटते.
परवा दिव्यात भरपूर पाऊस होता. तेवढ्यात एका मित्राने व्हिडिओ कॉल केला. त्याच्यासोबत बोलण्यासाठी मी बाहेर आले तर दारासमोरच एक साप डौलात पहुडलेला होता. त्याला पाहताच मी इतक्या जोरात ओरडले की माझा आवाज शेजारच्या चार घरांत घुमला. पाणसाप होता तो. हे पाणसाप सतत येतच असतात. गेल्यावर्षी दिव्यात भरपूर पाणी भरलं होतं तेव्हा चाळीतल्यांनी अनेक पाणसाप पकडले होते. त्यामुळे कधीकधी वाटतं मी मानवी वस्तीत राहते की सापांच्या अधिवासात? कितीही काहीही केलं तरीही मनातून आजही सापांची भिती जात नाहीय. उंदीर, झुरळ, पालींना मी कधीच घाबरले नाही. पण वळवळणारं गांडूळ दिसलं तरी मला भिती वाटते. मग सापांना पाहिल्यावर माझं काय होत असेल याचा अंदाजही न लावलेला बरा.

Comments

Popular Posts