Our Cancer Fighter



‘आज अहवाल आला, आईचा ब्रेस्ट कॅन्सर पूर्णपणे बरा झाला. आता तिला काळजीचं कारण नाही, फक्त वर्षभराने पुन्हा चेकअपला जायचंय.’ हा मॅसेज आमच्या ग्रुपवर मैत्रिणीने टाकला आणि मनावर आलेलं सगळं मळभ एकदम दूर झालं. गेल्या काही दिवसांपासून सतत नैराश्येच्या बातम्या समोर येत असताना अशी बातमी दिलासादायक वाटली. आमची मैत्रीण प्रणाली शिंदे. तिच्या आईला कर्करोगाचं निदान झाल्याचं कळल्यावर ती पूर्णपणे खचली होती. घरात सोबतीला आईशिवाय कोणीही मोठं नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत काय करायचं? कोणाकडे मदत मागायची? असे असंख्य प्रश्न तिला सतावत होते. डोक्यावर छप्पर असलं तरीही मायेने धीर देणारंही कोणीतरी लागतं, पण प्रणालीच्या बाबतीत मायेनं धीर देणारी आईच कर्करोगाने ग्रस्त झालेली होती. त्यामुळे आधारासाठी कोणाकडे बघायचं हा प्रश्नच होता. पण तिनं धीर सोडला नाही. कर्करोगाचं निदान झाल्याच्या पहिल्या दिवसापासून ती आईसोबत होती. आईच्या उपचारांसाठी स्वत:चं शिक्षण अर्धवट सोडलं. सतत हॉस्पिटलच्या वाऱ्या कराव्या लागत असल्याने नोकरीही सोडली. रोजच्या वेगवेगळ्या चाचण्या, नवनवीन थेरपी, डॉक्टरांचे सल्ले, पथ्यपाणी हे सगळं करता करता गेल्या दोन-चार वर्षांपासून तिलाही स्वत:चं आयुष्य आहे हेच प्रणाली विसरली. पण तरीही प्रणालीच्या चेहऱ्यावर कधीच टेन्शन नव्हतं. शिक्षण गेलं, नोकरी गेली यापेक्षाही तिला आईनं आता व्यवस्थित बरं व्हावं एवढीच अपेक्षा होती. त्यासाठी तिने जीवाचा जो काही आटापिटा केलाय तो आम्ही सगळ्यांनी प्रत्यक्षात पाहिलाय. मागे एकदा नाईट आऊटला पहाटे ५ वाजेपर्यंत गप्पा मारत बसलो होतो. तेव्हा ती भरभरून बोलत होती. ‘आईला आता बरं वाटतंय, ती आता पुन्हा पूर्वीसारखी मिसळतेय’ असं सांगताना तिच्या चेहऱ्यावरचा आनंद त्या अंधारातही स्पष्ट दिसत होता. ‘बाबा गेल्यानंतर आईनेच सांभाळलं, इतरांच्या घरची धुणी-भांडी करून चारही मुलांचा सांभाळ केला, शिक्षण दिलं’ हे सांगताना तिच्या डोळ्यांच्या कड्यांभोवती जमा झालेले अश्रूही दिसत होते. पण एवढं सगळं सांगतानाही त्या अश्रूंचा बांध फुटला नाही. ती म्हणायची, ‘मीच जर खचले तर घरच्यांना कोण आधार देणार?’ तिच्या आईनेही उपचारांना योग्य प्रतिसाद दिला. टाटा रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्सनेही व्यवस्थित मार्गदर्शन केल्याचं प्रणाली अनेकदा बोलली. हळूहळू आई बरी होऊ लागल्यावर प्रणालीने पुन्हा कॉलेज सुरू केलं. कॉलेज करता करता नोकरीही सुरू केली. दरम्यान, तिच्या आईनेही पुन्हा जोमाने कामाला सुरुवात केली. सगळं व्यवस्थित सुरू असताना कोरोनाचा कहर सुरू झाला. त्यांच्याच इमारतीत कोरोनाने शिरकाव केल्यानंतर मात्र आम्ही सगळे घाबरलो. इतर व्याधी असलेल्या रुग्णांना कोरोना लवकर पछाडतो, त्यामुळे आम्हाला तिच्या आईचीच जास्त काळजी होती. पण सुदैवाने सर्वोतपरी काळजी घेतल्याने आई सुरक्षित आहे. नियमित महिन्याच्या महिन्याला चेकअप होत असल्याने आईची प्रगती कळत होती. आणि आज चक्क रिझल्ट लागला. ब्रेस्ट कॅन्सरपासून आईची मुक्ती झाल्याचं जेव्हा तिने सांगितलं तेव्हा डोळ्यात चटकन पाणी आलं. या लढाईत आईने हार मानली नाही पण प्रणालीनेही हार मानायला दिली नाही. देवा असंच सगळ्यांना सुखरूप ठेव!

Comments

Popular Posts