गणेशोत्सव आणि पप्पा



गणेशोत्सवाचा माहोल तयार झाल्यापासून पप्पांची फार आठवण येतेय. एव्हाना आमचं घत उत्साहाने न्हाहून निघालं असतं. गावी जायचं असलं की त्यांना हुरूप यायचा. सगळे आजार, दुखणी खुपणी गुडूप व्हायची. म्हणायचे गावी गेलं की बरं वाटतं. आपल्या माणसात, आपल्या मातीत गेलं की सगळी दुखः विसरायला होतात. मुंबई नको वाटते आता. मी पुढच्या वर्षीपासून गावीच जाऊन राहणार आहे, तुम्ही पोरांनो कमवा आणि खा असं म्हणायचे. पण शेवटपर्यंत ते काही कायमचे गावी गेले नाहीत. त्यांच्या शेवटच्या दिवसांत म्हणजे बरोबर एक वर्षांपूर्वी ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीत त्यांनी गावी जायचा हट्ट केला. पण तो काळ असा होता की आम्ही त्यांना घेऊन जाऊ शकलो नाही. पप्पांनी आयुष्यात पहिल्यांदा आमच्याकडून काहीतरी अपेक्षा केलेली पण तीही आम्ही पूर्ण करू शकलो नाही. आणि या गोष्टीची टोचणी आयुष्यभर लागत राहणार आहे आम्हाला. आईबाप असतात तोवर त्यांच्या इच्छा, आकांक्षा आपण पूर्ण करत नाही, पण ते गेल्यावर त्याची जाणीव होते. 

पप्पांची कर्मभूमी मुंबई असली तरी त्यांचा ओढा गावी असायचा कायम. गणपती, महाशिवरात्र, शिमग्याला न चुकता हजेरी लावायचे. गावी जाण्यासाठी काहीही कारणं चालायची त्यांना. अगदी गावच्या मंडळाची मीटिंग आहे इथपासून ते गावच्या घराचे पत्रे निघाले आहेत ते बघून येतो जरा इथपर्यंत काहीही कारणं असायची. अगदी दोन दिवसांसाठी जायचे पण वेळात वेळ काढून जायचे.



Lockdown मध्ये सगळं बंद होतं. गणेशोत्सवात गावी जायचं असेल तर आधी १४ दिवस Quarantine व्हायचं मगच घरात प्रवेश मिळेल असा फतवा होता सरकारचा. पण त्याही काळात quarantine राहून पप्पा गणपतीला गावी गेले. माणूस कुठेही गेला तरी त्याची आपल्या गावाशी नाळ कायम राहिली असं म्हणायचे पप्पा. दोन वर्षांपूर्वी पप्पा सहज म्हणाले, "मी गेल्यावरही गणपतीला गावी जायचं. आपलं घर आहे तिकडे. गावचं घरही जपायचं. तुम्हाला गावी जाण्याची ओढ लागावी म्हणून घरात गणपती आणतो आपण. त्यामुळे दरवर्षी गावी जायचं. वर्सावल वगैरे ठेवायची नाही, पण ज्याला जमेल त्याने गावी जाऊन गणपती बसवायचाच." त्यावेळी आम्ही कोणी त्यांच्या या वाक्याकडे फार लक्ष दिलं नाही, पण ते वाक्य इतक्या लवकर गांभीर्याने घ्यावं लागेल असं वाटलं नव्हतं. आज भाऊ गणपतीसाठी गावी गेला. त्याची पॅकिंग सुरू असताना उगीच वाटलं आज पप्पा असते तर पप्पांनी आम्हा सर्वांना गावी नेलं असतं. चार पाच दिवस आपल्या माणसात घालवले असते, बाप्पाची सेवा केली असती. ते गेल्यापासून असा एकही सण झाला नाही की त्यांची आठवण आली नसेल. त्यांच्या फोटोतल्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहिलं की डोळे भरून येतात आणि वाटतं देवाने इतक्या लवकर का नेलं असेल पप्पांना? आता कुठे चांगले दिवस आलेले, तेसुद्धा त्यांना मनापासून जगता आले नाहीत! देवाने इतकं निष्ठुर होऊ नये कधी!

Comments

Popular Posts