पूर्ण न झालेल्या नवसाची कथा



स्वतःचं हक्काचं घर व्हावं म्हणून पप्पांनी खूप वर्षांपूर्वी लालबागच्या राजाला नवस केला होता. वर्षभरात स्वतःचं घर घेतलं तर सोन्याचं काहीतरी अर्पण करीन, असा नवस. त्यानंतरही बरीच वर्ष आम्ही भाड्याने राहिलो. आयुष्यातला अर्धाअधिक काळ भाड्याच्या घरात राहिल्याने स्वतःच्या घराची ओढ लागणं स्वाभाविक आहे. प्रयत्न करूनही घर घेता येत नसल्याने हतबल होऊन पप्पांनी तेव्हा नवस केला असेल. नवस केल्यानंतर बऱ्याच वर्षांनी आम्ही दिव्यात घर घेतलं. मधल्या काळात पप्पा हा नवस विसरून गेले. नवसाप्रमाणे वर्षभरात घर न घेतल्याने नवस फेडण्याचा प्रश्नच नव्हता. 


गेल्यावर्षी ऐन गणेशोत्सवात पप्पा केईएम हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होते. त्यांना गणपतीला गावी जायचे वेध लागलेले. पण त्यांचं स्वास्थ्य ठीक नसल्याने गावी घेऊन जाणं हिताचं नव्हतं. पण तेव्हा त्यांनी लालबागच्या राजाच्या नवसाविषयी सांगितलं. म्हणाले, बाप्पाने त्यावेळी माझा नवस पूर्ण केला नसला तरी मी वचन दिलं होतं. त्यानुसार वेळ मिळेल तसा लालबागच्या राजाला काहीतरी अर्पण करून ये. 

महिनाभर हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर म्हणजे पाच दिवसांचे गणपती गेल्यानंतर पप्पांना डिस्चार्ज मिळाला. पप्पांनी पुन्हा आठवण करून दिली, लालबागच्या राजाचा नवस फेडायचा आहे म्हणून. मी खरंतर याकडे दुर्लक्ष केलं होतं. पण पप्पांच्या इच्छेखातर मी तो नवस फेडून आले. गेल्यावर्षी कोरोनाच्या काळात लालबागच्या राजाचं दर्शन खुलं नव्हतं. पण दानकक्ष सुरू होता. दान कलशात मी पप्पांनी सांगितल्याप्रमाणे सोन्याचं छोटंसं पान अर्पण करून आले. आणि त्यानंतर आठवड्याभरातच पप्पांची प्राणज्योत मालवली. 


खरंतर उपास-तापास, नवस वगैरे या गोष्टींवर पप्पांचा विश्वास नव्हता. माझाही नाही. पण आपल्या परिस्थितीला कंटाळून माणूस शेवटी देवाकडूनच अपेक्षा करतो, त्यामुळे कदाचित तेव्हा पप्पांनी नवस केला असेल. पण जाता जाता पप्पांनी देवाचंही देणं मागे ठेवलं नाही. त्यांनी देवाला दिलेलं वचन पूर्ण केलं आणि मगच प्राण सोडले. माणसाला इतकं व्यवहारी राहता पाहिजे बस्स!

Comments