मंगळवारची गोष्ट

एव्हाना मधली सुट्टी संपलेली असायची. तीन साडेतीन वाजले की आम्हा पोरांचं लक्ष खिडकीबाहेर लागलेलं असायचं. "आज सगळ्यांच्या आधी जाऊन कोण ताव मारणार?" याच्या पैजा लागायच्या. "मी तर बाबांच्या रिक्षातून जाणार", "मी तर धावत पळत जाणार", "फक्त त्या वेड्या बाईच्या बंगल्यावरून जाताना सावध हा, नाहीतर ती वेडी बाई बाहेर येते", अशा कित्येक गप्पा भर वर्गात सुरू असायच्या. प्रत्येक विषय शिकवायला एकच सर किंवा बाई असायच्या. त्यामुळे दिवसभर त्यांचंच गाऱ्हाणं ऐकावं लागायचं. पण मंगळवारचा हुरूप यायचा. सहा वाजता होणाऱ्या बेलकडे सगळ्यांचं लक्ष असायचं. कारण बेल वाजली की वाजली रे आम्ही वर्गातून धूम ठोकायचो ते थेट मंदिरासमोर जाऊन उभे राहायचो. 

शाळा ते घर खरंतर दोन मिनिटांच्या अंतरावर होतं. पण मंगळवारी घरी जायला तास दीड तास उशीर व्हायचा. कारण आम्ही त्यादिवशी मंदिरात जात असू. शाळा ते मंदिर तसं दहा ते पंधरा मिनिटं अंतर. पण आमच्या पोटात इतके कावळे ओरडायचे की आम्ही ते अंतर अवघ्या सात-आठ मिनिटात पार करायचो. आता तुम्ही म्हणाल एवढा खटाटोप कशासाठी? तर, मंदिरात मिळणाऱ्या दाल (डाळ) पावसाठी. 

आजही मंगळवार आला की दालपावची चव जिभेवर रेंगाळते. शेवटची कधी खाललेली तेही आठवत नाही. पण पाचवीला असताना खालली असावी. कारण त्यानंतर तिकडे जाणं झालंच नाही. आजही कित्येकदा वाटतं तिथल्या मैत्रिणींना फोन करून विचारावं मंगळवारचा दालपाव अजूनही मिळतो का तिथे? 

चेंबूर शिवशक्ती नगरमध्ये अख्ख्या एरियात असं मंदिर नव्हतं, जसं सुंदर कॉलनीत बांधलं होतं. भव्य दिव्य आणि पांढरं शुभ्र. कोणत्या समाजाचं मंदिर होतं आठवत नाही. पण दर मंगळवारी तिथे दालपाव मिळायचा. एका छोट्या कागदावर पावाच्या एका तुकड्यात रसाळ दाल टाकून दिली जायची. ती दाल इतकी स्वादिष्ट लागायची की अगदी कागदाची टोकंसुद्धा आम्ही चाटून खायचो. फक्त दुर्दैव इतकंच की दाल पाव एकदाच दिला जायचा. कारण पुन्हा रांग लागेपर्यंत दालपाव संपलेला असायचा. म्हणूनच शाळेतून सुटल्यावर मंदिरात पोहोचेपर्यंत आमची घाई असायची. एकदा का दाल पाव संपला की पुन्हा पुढच्या मंगळवारची वाट पाहावी लागयची. 

खरंतर त्यानंतर अनेक ठिकाणी दालपाव खाल्ला. पण मंगळवारच्या दालपावची मज्जा कशातच नाही आली. आजही आमच्या घरात दालपावचा विषय निघाला की दादा मंगळवारच्या त्या दालपावची हमखास आठवण काढतो. आताही ती प्रथा तिथे सुरू असेल का? आणि असली तरीही आम्ही ज्या अतुरतेने खायला जायचो तशी मुलं तिकडे जात असतील का? असे प्रश्न उगाच पडतात आता.

दालपाव खाऊन झाल्यानंतर परत येताना अंधार पडलेला असायचा. थोडं जरी अंधुक झालं तरी आम्ही पोरं एकमेकांना सांभाळत तिथून जायचो. तो रस्ता कलेक्टर कॉलनीचा. उच्चभ्रू लोकांची वस्ती. तिथून जाताना त्यांची मोठाले बंगले बघत वेळ निघून जायचं. तिथे आमच्या वर्गातल्या मुलींच्या आया कामाला होत्या. मग त्यांच्या वशिल्याने कोणत्याही बंगल्यातल्या झोपाळ्यावर खेळायला जात असू. झोपाळ्यावर मस्त हिंदोळे घेतल्यानंतर पुन्हा भूक लागलेली असायची. तोपर्यंत सात साडेसात झालेले असायचे. बांगल्यातल्या बाया कधीतरी काहीतरी खायला देत. मग बंगल्यातील झोपाळा सोडून हळूच गेट उघडुन आपल्या घरची वाट धरायचो. किती अल्लड, निरागस बालपण होतं!

Comments

Popular Posts