काळाच्या पलीकडचा विचार करायला लावणारी मराठी नाटकं
काही कलाकृती अभिजात ठरतात. मराठी नाट्यविश्वात अशा असंख्य कलाकृती होऊन गेल्या, ज्याची चर्चा त्या नाटकाच्या ५० वर्षांनंतरही होते आहे. या नाटकांचे आशय हे काळाच्या पुढे विचार करायला लावणारे होते. गेल्या काही दिवसांपासून मी अनेक जुनी मराठी नाटके पाहिली. अर्थात युट्यूबवर. त्यापैकी विजय तेंडुलकर लिखित शांतता कोर्ट चालू आहे, सखाराम बाईंडर, जयवंत दळवी लिखित पुरुष, अशोक समेळ लिखित कुसुम मनोहर लेले आणि अजित दळवीलिखित डॉक्टर तुम्हीसुद्धा ही नाटकं दोन-चार दशकं जुनी असली तरीही सद्यस्थितीशी सुसंगत असल्यासारखी वाटतात.
या नाटकांची स्वतंत्र समिक्षा लिहिण्याइतपत किंवा परीक्षण करण्याइतपत नाटकामधलं मला फार काही समजत नाही. पण ही आशयघन नाटकं पाहताना गेल्या चार- पाच दशकात समाजात काहीच बदललं नाही याची जाणीव झाली. 'शांतता कोर्ट चालू आहे' हे नाटक प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांनी १९६७ साली लिहिलं. या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे या नाटकामध्येच एक नाटक रंगवण्यात आलं आहे. नाटकामधील नाटकाची रंगीत तालिम रंगमंचावर सुरू असताना या तालमीत वेगळंच नाटक सुरू होतं अन् मग स्वच्छंदी जगणाऱ्या नायिकेलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं. अविवाहित असलेली ही नायिका स्वतंत्र जगते, त्यातूनच तिच्या चारित्र्यावर संशय घेतला जातो. यामुळे पितृसत्ताक समाजातील स्त्रियांचं स्थान आणि सामाजिक दांभिकता प्रेक्षकांसमोर उभी राहते. स्वच्छंदी जगणारी लीला बेणारे पुरुषांशीही मनमोकळा संवाद साधते. पण ती अविवाहित असल्याने तिच्या या मुक्तपणामध्ये समाजाला फक्त बाहेरख्यालीपणा दिसतो. आजच्या स्थितीत डोकावलं तर स्वच्छंदी, मुक्तपणे जगणाऱ्या सगळ्यांच स्त्रियांकडे लोक कोणत्या नजरेने पाहतात हे वेगळं सांगण्याची गरज नाही. म्हणूनच ५० वर्षांपूर्वी रंगभूमीवर अवतरलेलं हे नाटक आजही कालसुसंगत वाटतं.
'सखाराम बाईंडर' हे नाटकही तसंच. आजच्या लिव्ह इन रिलेशनशिपच्या नात्याला चपराक देणारं हे नाटक. तेंडुलकरांचं हे दुसरं नाटक १९७२ साली रंगमंचावर आलं. त्यावेळी नवऱ्याने टाकलेल्या बाईकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन अत्यंत क्रूर होता. नवऱ्याने टाकलेली बाई समाजासाठी खुलं द्वार मानली जायची. तिच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची आणि तिच्या शरीरावर हक्क दाखवण्याचा जणूकाही अलिखित कायदाच होता. अशाच स्त्रियांना सखाराम बाईंडर घरात घेऊन येत असे. त्यांच्यावर मनमर्जीप्रमाणे वागत असे. अन् वेळ सरली, कंटाळा आला की सोडून देत असे. आजही उघड्या डोळ्यांनी आपण पाहिलं तर आपल्या आजूबाजूला पुरुषतसत्ताक परंपरेतील अनेक पुरुष असंख्य स्त्रियांना आपल्या वासनेचा बळी बनवतात आणि मन भरलं की फेकून देतात. हे नाटक त्या काळी खऱ्या अर्थाने अभिजात ठरलं होतं. रंगमंचावर नायिकेने साडी बदलणे, मुख्य कलाकाराच्या तोंडी असलेली भाषा आणि एकूणच नाटकाचा आशय यामुळे हे नाटक वादग्रस्त तर ठरलंच पण त्यापेक्षाही ते ऐतिहासिक ठरलं.
जयवंत दळवी यांनी लिहिलेलं 'पुरुष' हे नाटकही याच पंक्तीत बसेल. बाई म्हणून जगताना वेगळा मार्ग निवडला, आपल्या वागण्या-बोलण्यात ताठरपणा आणला की पुरुषी अहंकार दुखावला जातो. बाईची ही वृत्ती अनेक पुरुषांना सहन होत नाही. मग अशावेळी बाईला नमवण्याचं एकमेव हत्यार म्हणजे तिचं चारित्र्य. तिच्या चारित्र्यावरच हात घातला की ती बाई तिच्या कुटुंबासकट गप्प बसते. पण जन्मजात बंडखोर वृत्ती घेऊन आलेली बाई गप्प बसत नाही. न्यायदेवतेने तिला न्याय मिळवून दिला नाही तर कायदा हातात घ्यायलाही ती मागेपुढे पाहता नाही. १९८२ साली हे नाटक रंगमंचावर अवतरलं होतं. आज आपल्या आजूबाजूला पाहिलं तरीही या नाटकाचे असंख्य खरेखुरे प्रयोग आपल्याला दिसतील. १९८० च्या दशकात या नाटकाने अवघ्या महाराष्ट्राला हादरवून टाकलं होतं. या नाटकाचा शेवट कदाचित आजच्या अन्याय पीडित महिलेच्याही गावी नसेल. त्यामुळे जयवंत दळवी यांनीही काळाच्या किती पुढे जाऊन विचार केला होता, हे यातून स्पष्ट होतं.
प्रेमविवाह करूनही मनाजोगता नवरा भेटला नाही की अनेक महिला नात्यातून बाहेर पडतात आणि दुसरं नातं शोधण्याचा प्रयत्न करतात. पण या दुसऱ्या नात्यात पहिल्या नात्यापेक्षाही घोर फसवणूक झाली तर? ही फसवणूक थेट फक्त मानसिक, आर्थिक नव्हे तर बाईच्या बाईपणाचीच असेल तर? अशोक समेळांनी हेच 'कुसुम मनोहर लेले' या नाटकात सादर केलं आहे. सुजाता देशमुख या सधन कटुंबातील महिलेची मनोहर लेले कशी नियोजनबद्ध फसवणूक करतो, त्याच्या बायकोला मुलबाळ होत नसल्याने प्रेमाचं नाटक करून सुजाता देशमुख यांना लग्नाचं आमिष दाखवून तिचं पोटचं पोरगं पळवतो आणि या जंजाळातून सुजाता देशमुखचा पहिला नवराच कसा तिला बाहेर काढतो हे यातून दाखवण्यात आलंय. मुल-बाळ होण्यासाठी असंख्य वैद्यकीय उपचार सध्या उपलब्ध असताना गरजू बायकांना मानसिक आधार देण्याच्या नावाखाली आजही फसवणूक केली जाते. त्यामुळे सुजाता देशमुखच्या रुपाने असंख्य कुसुम मनोहर लेले आपल्या समाजात आजही सापडतात.
तर, अजित दळवीलिखित 'डॉक्टर तुम्हीसुद्धा' हे नाटक तर वैद्यकीय क्षेत्रातील छुप्या व्यवहारावर आणि नष्ट झालेल्या नीतीमत्तेवर प्रकाश टाकतो. गेल्या काही दशकांत वैद्यकीय क्षेत्र पैसा कमावण्याचे यंत्र बनले आहे. लोकांना फसवून, त्यांना भिती घालून त्यांच्या अवयवावरच डल्ला मारण्याचं किंवा शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांकडूनच झालेल्या चुका लपवण्याकरता रुग्णांच्या शरीराशी खेळ केला जातो. डॉक्टर तुम्हीसुद्धा या नाटकातही तेच घडतं. एका नर्सिंग होममध्ये हा सर्व खेळ रंगतो. या नाटकात स्त्रिरोगतज्ज्ञ असलेल्या महिला डॉक्टरविरोधात तिचाच डॉक्टर पती उभा राहतो अन् रत्ना पवार नावाच्या गर्भाशय निकामी कराव्या लागणाऱ्या रुग्णासाठी कोर्टात साक्ष नोंदवतो. आजही खासगी रुग्णालयात रुग्णांच्या अपरोक्ष, त्यांना अंधारात ठेवून त्यांचे अवयव काढून टाकण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे १९९१ साली रंगमंचावर आलेलं हे नाटक आजही कालसुसंगतच म्हणावं लागेल.
महत्त्वाचं म्हणजे वर उल्लिखलेली सर्व नाटकं ही सत्यघटनेवर आधारित आहेत. सामाजिक विषयांवर आधारित असलेली नाटकं ही खरंतर सत्य घटनाच असतात. फक्त त्यात पात्रांची, जागांची नावं बदलेली असतात. ही इतकी जुनी नाटकं आजही समाजातील वाईट प्रवृत्तीच्या माणसांना चपराक बसण्यासारखी आहेत. या वरील नाटकांचे असंख्य प्रयोग महाराष्ट्रभर झाले. गेल्या पाचेक वर्षात या नाटकांचे नव्या युगातील कलाकारांनी नव्याने प्रयोग केले, पुरुष नाटक तर आजही रंगमंचावर आहेच. फरक इतकाच नाटकातील पात्र बदलली, नेपथ्य बदललं, पटकथा बदलली तरी कथानक अन् आशय मात्र तोच राहिला.
Comments
Post a Comment