दृष्टीहीनांच्या आयुष्यात ‘साहित्य’ प्रकाश उजळवणार्या सुखदा
1200
पुस्तकांचे ब्रेल लिपीत रुपांतर
अंधांना वाचनाची आवड जोपसता यावी याकरता गेल्या 15 वर्षांपासून धडपडणार्या ठाण्याच्या सुखदा
पंतबाळेकुंद्री यांनी आतापर्यंत जवळपास 1200 पुस्तके
ब्रेल लिपीत रुपांतर केली आहेत. पुण्याचे रोबोटीक
इंजिनिअर उमेश जेरे यांनी या कामात त्यांना फॉन्ट सॉफ्टवेअर तयार करून देऊन मोलाची
मदत केली. आज महाराष्ट्रातील जवळपास 70 शाळांमध्ये सुखदा यांनी ब्रेल लिपीत रुपांतर
केलेल्या पुस्तकांच्या प्रती ‘वाचल्या’ जातात.
मुळच्या बेळगावच्या सुखदा या पती संजीव यांच्या
सततच्या बदलीच्या नोकरीमुळे 1994 साली पुण्यात स्थिरावल्यावर
त्यांनी ब्रेल लिपी आत्मसात करायचे ठरवले. कोथरूडच्या अंध शाळेतून त्यांनी ब्रेल लिपीच्या
नोट्स मागवून घेतल्या आणि घरच्या घरीच ब्रेल लिपीच्या अभ्यासाला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी मराठी बालकथांचे ब्रेल लिपीत
रुपांतर केले.
त्यांचे हे कार्य कोथरूडच्या अंध शाळांना आवडले
आणि त्यांनी सुखदा यांना इतरही पुस्तके ब्रेल लिपीत रुपांतरीत करण्याची विनंती
केली.
शाळांनी मला विनंती
केली पण काम जरा अवघड होतं.. ब्रेलर (ब्रेल
लिपी टाईप करणारा) च्या मदतीने ब्रेल
लिपीतील मराठी शब्दकोष तयार केला. मराठीतून मराठी असा
तो शब्दकोश आहे.
ब्रेल लिपीच्या या शब्दकोषामुळे अंधांसाठी ही
भाषा अत्यंत सोपी झाली. एक आणखी गोंधळ होतो
की, ब्रेल लिपीत रुपांतर केलेल्या प्रतीची झेरॉक्स काढता येत नसल्याने प्रत्येक
पुस्तकाच्या जेवढ्या प्रती हव्या तेवढी अधिकची मेहनत आली. पण ही अडचण आमचे परिचित रोबोटिक
इंजिनिअर असलेले उमेश जेरे यांनी दूर केली. त्यांनी देवनागरी प्रज्ञाचक्षू हे सॉफ्टवेअर विकसित
केले. या सॉफ्टवेअरमधून फोनेटिक पद्धतीने टाईप केले
जाते, ज्याचे रुपांतर ब्रेल लिपीत होते. ही
प्रक्रिया सोपी आणि सहज असल्याने आता एका पुस्तकाच्या अनेक प्रती छापता येतात,
सुखदा तळमळीने सांगत होत्या.
प्रज्ञाचक्षू मुळे
काम सुकर झाले आणि नॅब या संस्थेनेही सुखदा
आणि उमेश यांच्या कार्यात सहभाग घेतला. नॅबचे महेंद्र मोरे आणि रमण शंकर यांनी
त्या कामात मोठी मदत केली असल्याचे सुखदा यांनी सांगितले.
मनाचे श्लोक ते अनिल
अवचट
मनाचे श्लोक, अकबर-बिरबलाच्या
कथा, स्वातंत्र्यसेनानींच्या कहाण्या, रामरक्षा, इसापनीती, साने गुरुजींच्या बालवाङ्मयापासून अनेक
कवितासंग्रह, चरित्रे, आत्मचरित्रे, प्रकाश आमटे यांचे प्रकाशवाटा आणि साधना आमटे
यांचे समिधा, विकास मनोहर यांचे नेगल, मंगला आठलेकर यांचे गार्गी अजून जिवंत आहे, पु.ल. एक साठवण अशी अनेक पुस्तके सुखदा यांनी
ब्रेलमध्ये आणली आहेत. त्यात अनिल अवचट, शांता शेळके, आनंद नाडकर्णी, दुर्गा भागवत, डॉ. विजया
वाड अशा प्रसिद्ध लेखकांचा समावेश आहे.
देवनागरी प्रज्ञा
चक्षू हे सॉफ्टवेअर विकसित झाल्यानंतर ज्यांना या कार्यात सहभाग नोंदवायचा आहे
त्यांना मेलद्वारे हे सॉफ्टवेअर पाठण्यात आले. फोनद्वारे या सॉफ्टवेअरच्या वापरासंबंधी माहिती
देण्यात आली. या कार्याला तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने जवळपास
300 हून अधिक लोकांनी ब्रेल लिपीच्या चळवळीत साथ दिली. यामध्ये बावीस ते नव्वदी पार केलेल्या लोकांचाही समावेश
आहे. भारतातूनच
नव्हे तर सिंगापूर, वेस्ट इंडिज, अमेरिका आणि कॅनडा या देशातूनही सहभाग मिळत गेला.
Comments
Post a Comment