विद्यार्थ्यांच्या रँकिंगमध्ये मुंबई विद्यापीठ झिरो
एखाद्या विषयात
अनपेक्षितपणे चांगले गुण पडले किंवा अनुत्तीर्ण व्हायची खात्री असताना उत्तीर्ण
झाल्याचा शेरा दिसला की हर्षभरीत विद्यार्थी उद्गारायचे, चुकून पास झालो असणार..
आता दिवस बदललेत. विद्यार्थी काही म्हणतच नाहीत. मुंबई विद्यापीठच म्हणते चुकून
नापास केलं, गलती हो गई. आणि विद्यार्थी कपाळाला हात लावून बसतात.
विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी, तरूण पीढीचे भवितव्य बेफिकीरीने अंधारात लोटणाऱ्या
मुंबई विद्यापीठाचे आपण विद्यार्थी आहोत या विचारानेच आता हुशार विद्यार्थ्यांच्या
हृदयाची धडधड वाढू लागली आहे. तीन वर्षांत या विद्यापीठाने बेजबाबदार कारभाराचे
प्रदर्शन करणाऱा महागोंधळ घालत तब्बल ३५ हजार विद्यार्थी अनुत्तीर्ण ठरवले. आणि
असला भोंगळ व एकमेवद्वितीय कारभार करणारे आपले मुंबई विद्यापीठ हे आंतरराष्ट्रीय
शैक्षणिक सामंजस्य करार, अनेक व्यवसायाभिमुख
अभ्यासक्रम, सांस्कृतिक क्षेत्रातील चढता आलेख या सार्यांची
दखल घेऊन क्यूएस रँकिंगमध्ये राज्यात अव्वल ठरते इतकेच नव्हे तर देशातही चौथ्या
क्रमांकावर स्थान पटकावते तेव्हा विद्यापीठातून शिक्षण घेणारे लाखो विद्यार्थी
हसावे का रडावे या संभ्रमात पडले असावेत. शहरी
शिक्षणाच्या ओढीने महाराष्ट्राभरातून अनेक विद्यार्थी मुंबईत दाखल होतात. मुंबई विद्यापीठातून पदवी, पदव्युत्तर शिक्षणासाठी अर्ज करतात. मात्र या प्रवेश अर्जापासूनच विद्यार्थ्यांची
दमछाक सुरू होते. ऑनलाईन प्रवेश
प्रक्रियेच्या गोंधळापासून ते परिक्षेचा निकाल लागेपर्यंत विद्यार्थ्यांना पुरता
घाम आलेला असतो.
यंदाचा घाम आणणारा विषय म्हणजे मुंबई
विद्यापीठाने जवळपास 35 हजार
विद्यार्थ्यांना चुकून नापास केले आहे. 2017-18 या
वर्षात नापास झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 97 हजार विद्यार्थ्यांनी पुनर्मुल्यांकनासाठी अर्ज
केला होता. त्यापैकी 35 हजार पेपर चुकीच्या पद्धतीने तपासले असल्याची बाब
माहिती अधिकारात उघड झाली. हा प्रकार म्हणजे
विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सुरू असलेला खेळच म्हणावा लागले. विद्यापीठाचा हा अघोरी खेळ एका विद्यार्थीनीच्या
जीवाशी बेतला आहे. नेहमी अव्वल राहणारी
एक विद्यार्थीनी यंदा नापास झाल्याने तिने थेट आत्महत्येचे पाऊल उचलले. मात्र पुनर्मुल्यांकनाचा निकाल लागला असता ती पास
असल्याचे सिद्ध झाले. आता या आत्महत्येला
विद्यापीठाने केलेली हत्या का म्हणू नये? गेल्यावर्षीही
मुल्यांकनाची डिजिटल कार्यप्रणाली आणणल्याने निकालासाठी नोव्हेंबर उजडावा लागला. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या या
लेटलतिफचा जबर फटका बसला. वेळेत निकाल न
लागल्याने कित्येकांना उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेता आला नाही. त्यामुळे त्यांचे वर्ष वाया गेले. यंदा असा उशीर होऊ नये म्हणून कुलगुरू डॉ.सुहास पेडणेकर यांनी प्राध्यांपकांवर चांगलेच
निर्बंध लादले होते. दिलेल्या मुदतीत
पेपर तपासणी होण्याकरता प्राध्यापकांनी 35 हजार
विद्यार्थ्यांना चुकून नापासचा शेरा लगावला. विद्यापीठाच्या या चुकीमुळे विद्यार्थ्यांचे वर्ष
वाया जाते, विद्यार्थी नैराश्यात जातो, शिवाय विद्यार्थ्यांचे आर्थिक गणित कोलमडते हे
वेगळेच. पुनर्मुल्यांकनासाठी 500 रुपये भुर्दंड भरावा लागतो. तसेच, पेपरच्या
फोटोकॉपीसाठी 100
रुपयांची आकारणी केली जाते. नापास झाल्यावर विद्यार्थी फोटोकॉपी आणि
पुनर्मुल्यांकन अशा दोन्ही प्रक्रिया अवलंबतात. त्यामुळे दोन्हींसाठी एकूण 600 रुपयांचा खर्च प्रत्येकी विषयामागे येतो. पेपरची फोटोकॉपी मागविल्यानंतर कित्येक प्रश्न
तपासलेच नसल्याचे समोर येते, तर काही उत्तरांना
मार्केच दिली नसल्याचे स्पष्ट होते त्याची जबाबदारी कोण घेणार, वाया गेलेल्या
वर्षाची, मानसिक नैराश्याची जबाबदारी कोणावर? फोटोकॉपी मागविल्यामुळे समोर आलेल्या प्रकाराची
तक्रार करायला गेल्यास विद्यापीठाकडून योग्यती पावलेही उचलली जात नसल्याचे अनेक
विद्यार्थी सांगतात. शिवाय, पुनर्मुल्यांकनाचा निकालही विद्यार्थ्यांच्या
बाजुने लागतो.
या मुल्यांकनात विद्यार्थ्यांना पासचा शेरा दिला
जातो. त्यामुळे प्रथम मुल्यांकनाच्या वेळेस
विद्यार्थ्यांना जाणुनबुजून नापास केले जाते की काय हा प्रश्न पडतो. कारण पुनर्मुल्यांकनातून विद्यापीठाला चांगलीच
कमाई करता येते.
त्यामुळे नापास झालेले हे 35 हजार विद्यार्थी विद्यापीठाच्या आर्थिक कमाईला
बळी पडले असे म्हणायला वागवे ठरणार नाही. विद्यापीठाचा
हा गोंधळ केवळ निकालापुरताच मर्यादित राहत नाही. किचकट प्रवेश प्रक्रिया राबवणे, उशीरा हॉल तिकिट देणे, हॉल तिकिटवर चुकीचे नाव छापणे, हॉल तिकिटवरील वेळापत्रक चुकीचे देणे आदी अनेक
गोंधळ विद्यापीठाकडून राजरोसपणे सुरू असतात. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणार्या या
विद्यापीठावर सरकारचेही नियंत्रण नाही. विद्यापीठातील
कर्मचारी, वरिष्ठ अधिकारी आणि या सर्वांवर नियंत्रण ठेवणारे
कुलगुरूही विद्यार्थ्यांच्या होणार्या नुकसानीला जबाबदार आहेत. यंदा तरी विद्यापीठातील हा भ्रष्टाचार थांबेल अशी
विद्यार्थ्यांची आशा होती, मात्र ही आशा देखील
फोल ठरली आहे.
त्यामुळे चुकून नापास केलं म्हणत नामानिराळे होऊ
पाहाणारे मुंबई विद्यापीठ क्युएस रँकिंगमध्ये अव्वल ठरूनही विद्यार्थ्यांच्या
रँकींगमध्ये झिरो ठरले आहे.
Comments
Post a Comment