वडिलांचा वारसा जपणार्‍या सुषमा कौलगी



वडिलोपार्जित व्यवसाय नव्या कल्पनांसह, तंत्रज्ञानासह पुढे नेताना अनेक अडचणी येतात. मात्र या सगळ्या अडचणींवर सुषमा कौलगी गेली 42 वर्षे मात देत आहेत. 1947 साली दिलीप कौलगी यांनी सुरू केलेली सिग्मा लेबोरेटेरी ही फार्मा कंपनी 77 व्या वर्षीही सुषमा कौलगी यांच्यामुळे जगाच्या नकाशावर झळकत आहे.
सिग्मा लेबोरेटरी कंपनी ही एक औषधांचे उत्पादन करणारी कंपनी. या कंपनीचे सगळे उत्पादन परदेशात निर्यात होते. भारतात या कंपनीची पाळेमुळे असली तरीही या कंपनीला उत्पन्न परदेशातून मिळत असते. त्यामुळे साहजिकच या कंपनीच्या कामानिमित्ताने सतत इतर देशातील लोकांशी संपर्क साधणे, त्यांना आपल्या कंपनीविषयी माहिती देणे, आपल्या डिस्ट्रिब्युटरसोबत चांगले हितसंबध ठेवणे, आपल्या कंपनीतील कर्मचार्‍यांशी सलगीने वागणे आदी सार्‍या जबाबदार्‍या सुषमा कौलगी या नेटाने पार पाडत आहेत.
सुषमा कौलगी या कॉलेजमध्ये असल्यापासूनच सिग्मा कंपनीत काम करत होत्या. वडिलांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी अ‍ॅडमिनिस्ट्रेशन विभागात काम करायला सुरुवात केली. मात्र 1977 साली त्यांना असं जाणवायला लागलं की हे काम त्यांना जमत नाही, हे काम त्यांच्या समजण्यापलिकडचे आहे. त्याच काळात त्यांचं कॉलेज शिक्षण सुरू असल्याने त्या विचलीत झाल्या. कामाच्या बाबतीत चंचल झालेल्या मनाला सुषमा यांच्या वडिलांनी आवर घातला. वडिलांनी त्यांना प्रोत्साहन दिलं. अ‍ॅडमिनिस्ट्रेशन क्षेत्रातच आपला पाय रोवण्याचा सल्ला दिला आणि शेवटी सुषमा यांनी वडिलांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी पुन्हा जोमाने सुरुवात केली. आज त्या सिग्मा लेबोरेटरी कंपनी निर्यात विभागाच्या व्यवस्थापक या पदावर आहेत. फार्मास्युटीकल कंपनीत काम करताना वडिलांना आदर्श मानणार्‍या सुषमा यांना त्यांच्या वडिलांनी मोलाची मदत केली आहे.
गेली 47 वर्षे कंपनीत काम करताना सुषमा यांनी अनेक छंदही जोपासले आहेत. गायनाची त्यांना प्रचंड आवड आहे. त्यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षणही घेतले आहे. त्याचप्रमाणे मुंबईतील एनसीपीएत त्यांच्या गायनाचे कार्यक्रमही होतात असं त्या सांगतात. शिवाय त्यांना चित्रकलेतील रंग फार भावतात. त्यामुळे रंगांच्या सानिध्यात येण्यासाठी त्या चित्रकलेचा छंदही जोपासतात. आणि प्रत्येक महिलेल्या ज्याप्रमाणे स्वयंपाकाची आवड असते, त्याचप्रमाणे सुषमा यांनाही स्वयंपाकाची प्रचंड आवड आहे. विविध पदार्थ तयार करून इतरांना खावू घालायला त्यांना फार आवडतं असं त्या सांगतात.
भारतात राहून परदेशात व्यवहार करायचा, वडिलांनी सुरू केलेल्या कंपनीला प्रगतीपथावर ठेवायचे हे काही सोपे काम नाही. मात्र सुषमा कौलगी या सार्‍या जबाबदार्‍या अगदी सहज सांभाळत आहेत. आपलं ध्येय अर्धवट सोडून देण्यापेक्षा ध्येयपूर्तीसाठी प्रयत्न करा. प्रयत्न असफल होतीलही मात्र प्रयत्नांची पाराकष्ठा केल्यास यश नक्कीच मिळते असं त्या सांगतात.
आधुनिक युगात आपलं अस्तित्व सिद्ध करणाऱ्या सुषमा या खरोखरच दुर्गा आहेत असं म्हणायला हरकत नाही.
(आदिशक्ती पर्व दुसरे या युट्यूब सिरीजवरून साभार)


Comments