रुग्णांची माऊली डॉ. कामाक्षी भाटे
डॉ. कामाक्षी भाटे या गेल्या 32 वर्षांपासून केईएमच्या जीएस मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापिका आहेत. एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना घडवताना त्यांनी केवळ उपचार पद्धतीच शिकवली नाही तर रुग्णांशी सलोखा कसा निर्माण करायचा? त्यांच्या परिस्थितीचा अंदाज कसा घ्यावा? आपले उपचार त्यांच्या पथ्थी पडतील की नाही याचा आढावा कसा घ्यावा याचेही शिक्षण दिले. केवळ ट्रेनिंग किंवा क्लासेस घेऊन याविषयी माहिती देण्यापेक्षा एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिक्षणविषयक अभ्यासक्रमच सुरू केला. या अभ्यासक्रमालाच म्हणतात कम्यूनिटी मेडिसीन. म्हणजेच कम्यूनिटीमध्ये जाऊन रुग्णांचा अभ्यास करावा. जेणेकरून रुग्णाला बरे करण्यासाठी जास्तीत जास्त आणि चांगल्यात चांगले पर्याय डॉक्टरांना उपलब्ध होऊ शकतील. यासाठी त्यांनी मेडिकल एज्यूकेशन सेंटरचीही स्थापना केली आहे.
एवढेच नव्हे तर रुग्णांना त्यांचा आजार समजावून सांगण्यासाठी डॉ. भाटे पोस्टर्सचा आधार घेतात. हे पोस्टर्स रुग्णांना कशाप्रकारे मदत करतात, त्यांना त्यांच्या आजाराविषयी कशी माहिती देतात हेसुद्धा डॉ. भाटे आपल्या विद्यार्थ्यांना शिकवत असतात. त्यामुळेच के.ई.एम रुग्णालयात प्रत्येक विभागात संबंधित आजारांविषयी माहिती सांगणारे पोस्टर्स लावलेले आहेत.
डॉ. भाटे यांचे कार्य इथेच संपत नाहीत. त्यांनी अवयवदान जागृतीसाठीही योगदान दिलं आहे. अयवदान सध्याच्या युगात फार महत्त्वाचं आहे असं त्या म्हणतात. कारण आज कित्येक दृष्टिहिनांना हे जग पाहण्यासाठी डोळ्यांची आवश्यकता आहे. त्यामुळे मृत्यूनंतर अवयवदान केल्यास दुसरं कोणीतरी तुमच्या डोळ्यांनी जग पाहू शकेल असं त्या सांगतात. अवयवदान जनजागृतीसाठी त्या शक्य त्या पद्धतीने मेहनत घेतात. अगदी वैयक्तिक पातळीवर त्यांनी रुग्णांना आणि रुग्णांच्या नातेवाईकांना अवयव दानाचे महत्त्व पटवून दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल अनेकांनी घेतली आणि त्यांनीही अवयवदान जनजागृती करण्यास सुरू केली आहे.
वैद्यकिय क्षेत्र अत्यंत धावपळीचं असतं. रात्री-अपरात्रीही त्यांना कर्तव्यावर हजर राहावं लागतं. या धावपळीच्या युगात माणसाकडे छंद असले तरच तो उत्साहित राहू शकतो. त्याचप्रमाणे डॉ. भाटे यांनीही छंद जोपासले आहे. झाडाझुडपांची काळजी घेणं, नवीन रोपट्यांची लागवड करण्याचा त्यांचा छंद असल्याचं त्या सांगतात. डॉ. भाटे यांचे लहानपण गावी गेलं. गावातल्या शेतीत त्यांनी त्यांचं लहानपण घालवल्याने त्यांना शेतीकामाची, फुलं-फळं झाडांची प्रचंड आवड असल्याचं त्या सांगतात. त्यामुळे मुंबईत आल्यावर त्यांना शेतीकामांची प्रचंड आठवण येऊ लागली. त्यातूनच त्यांनी कुंडीतील शेतीला सुरुवात केली. विविध फळ, फुलांची रोपटी त्यांनी लावलेली असल्याचंही त्या आवर्जून सांगतात. सोबतच त्यांना मेंदी काढण्याचीही खूप आवड आहे. घरात येणार्या चिमुकल्यांचा हातात त्या नेहमी मेंदी काढतात. या छंदामुळेच आपल्या कामाचा थकवा जाणवत नाही आणि आणखी काम करण्याची ऊर्जा मिळते असं त्या सांगतात.
Comments
Post a Comment