मतदार वाढले सजगताही वाढायला हवी!
येऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मतदारांची संख्या वाढावी याकरता शासन पातळीवर जोराचे प्रयत्न सुरू आहेत. मतदार वाढीसाठी राबवण्यात आलेल्या मतदान नोंदणी कार्यक्रमामुळे तब्बल 36 लाख नव्या मतदारांची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मतदारांची संख्या पावणे नऊ कोटीच्या घरात गेली. मात्र मतदारांची संख्या वाढल्याने मतदारांमध्ये सजगता येईल का? हा प्रश्नच आहे. महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येपैकी 70 टक्के जनता मतदार असली तरीही गेल्या कित्येक वर्षात महाराष्ट्रातील मतदान 55 टक्क्यांच्या वर गेलेले नाही. त्यामुळे यंदा मतदारांची वाढलेली संख्या पाहता मतदानाची टक्केवारी वाढेल का हा प्रश्न उपस्थित होतो. दिलेल्या आकडेवारीवरून यंदा मतदारांमध्ये युवकांची संख्या जास्त आहे. अजूनही मतदार नोंदणी सुरू असल्याने ही संख्या वाढणार असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक युवा मतदारांच्या हातात आहे. लोकशाहीला बळकटीकरण आणण्यासाठी मतदानाची भावना नागरिकांच्या गळी उतरवणे गरजेचे आहे. त्यासाठी नवमतदारांनी पुढाकार घेऊन मतदानाची जनजागृती केली पाहिजे. शासन स्तरावर मतदारांची संख्या वाढवण्यासाठी विविध योजना सुरू आहेत. मात्र मतदार कार्डकडे केवळ शासकीय प्रमाणपत्र म्हणून न पाहता त्याचा वापर करत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी करणे गरजेचे आहे. कमी होत जाणारी मतदानाची आकडेवारी ही चिंतेची बाब आहे. ही परिस्थिती बदलणे गरजेचे आहे. त्यासाठी स्थानिक प्रशासन आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतल्याने मतदारांची संख्या वाढली, मात्र मतदानाची टक्केवारी वाढेल का हे येणारा काळच ठरवेल. लोकशाहीने नागरिकांना अनेक हक्क दिले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे मतदानाचा हक्क. हा हक्क बजावल्यास देशात परिवर्तन घडते. त्यामुळे युवकांनी सकारात्मक होत स्वयंस्फूर्तीने मतदानाचा हक्क बजावून राष्ट्रीय कार्य पार पाडण्यास आपला खारीचा वाटा उचलावा. तरच विकसनशीलतेकडून विकसित देश होण्यास मदत होईल. मतदानादिवशी सुट्टीचा आनंद घेण्यापेक्षा आपले हक्क बजावल्यास मोठी क्रांती घडू शकते. सत्ता परिवर्तन घडू शकते. माझ्या एका मताने काय होणार आहे हा स्वार्थी भाव बाजूला सारून देश हितासाठी आपले बहूमुल्य मत योग्य पक्षाला दिल्यास देशाचा विकास प्रगतीपथावर येईल. भारत हा तरुणांचा देश आहे. सध्या आलेल्या आकडेवारीवरून पावणे चार मतदारांमध्ये सर्वाधिक प्रमाण युवा मतदारांचे आहे. मुंबईत 13 लाख 49 हजार 692 पुरुष नवमतदारांची नोंद आहे तर, 11 लाख 9 हजार 410 महिला नवमतदारांची नोंद झाली आहे. मुंबईप्रमाणे ठाण्यातही मोठ्या प्रमाणात नवमतादारांची नोंद झाली आहे. पुणे, नाशिक, जळगाव, अमरावती या मोठ्या शहरातही नागरिकांनी मतदार नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे येणार्या निवडणुकांत या मतदारांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान दिल्यास योग्य ते सत्तांतर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यातील समस्या, विविध योजना, विकासकामे आदी गोष्टींना प्राधान्य देत नवमतदारांनी सजग राहायला हवे. लोकशाही सुदृढ आणि सक्षम करण्याचा तो एकमेव मार्ग आहे. राजकारणातील भ्रष्टाचार, विरोधक दरदिवशी सत्ताधार्यांची काढत असलेली उणीधुणी यामुळे युवा वर्ग राजकारणापासून अलिप्त राहायला लागला आहे. काही हातावर मोजण्या इतपत युवा वर्ग राजकारणात जवळकी साधतो. मात्र तो वर्ग कोणत्यातरी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून अधिक ओळखला जात असल्याने त्याच्याकडून एका विशिष्ट पद्धतीचाच प्रचार होताना दिसतो. त्यामुळे नवमतदारांना मतदानाचे महत्त्व विषद करण्यासाठी सामाजिक संस्थानी पुढाकार घेतल्यास नवमतदारांच्या विचारात क्रांती घडू शकेल. कारण राजकारणाकडे कितीही कानाडोळा केला तरीही शहराची, विभागाची प्रगती खुर्चीवर बसलेल्या राजकारण्यांच्या हातातच असते हे ही तितकेच खरे. त्यामुळे मतदानासाठी त्या खूर्चीवर बसण्यासाठी ज्या उमेदवाराची पात्रता आहे, त्यालाच मत देणे हेसुद्धा युवकांच्या हाती आहे. काही उद्दाम कार्यकर्त्यांकडून मतं विकत घेतली जातात. आपले अमुल्य विकले जाऊ नये याकरताही युवकांमध्ये आणि इतर मतदारांमध्ये जनजागृती झाली पाहिजे. तरच समाजात राजकीय परिवर्तन घडून येऊ शकते. केवळ मतदारांची टक्केवारी वाढली म्हणजे देशाचा विकास साधला जाऊ शकत नाही. या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला तरच देशाचा विकास साधला जाऊ शकतो. म्हणून मतदारांची संख्या वाढली तरी मतदार सजग झाला असे होत नाही. त्यांना सजग करण्यासाठी सुजाण नागरिकांनी पुढाकार घ्यायला हवा.
![]() |
दैनिक महाराष्ट्र दिनमान |
Comments
Post a Comment