तुच तुझ्या रूपाची राणी गं!
गोरापान रंग, उंच देहयष्टी, बोलके डोळे, त्याभोवती धनुष्याकृती वळणदार भुवया, गालावर खळी, ओठाच्या वरच्या पाकळीवर एखादा काळा तीळ थोडक्यात सगळं कसं जिथल्या तिथं, सुबक सुंदर अशी काहीशी स्त्री सौंदर्याची व्याख्या ठरवून ठेवली आहे. या व्याख्येच्या साच्यात, निकषांत बसणार्याच मुली-महिला सुंदर, बाकी सगळ्या मग ठेंगण्या, जाड्या, बारीक वगैरे असतात, असे मानणारा एक मोठा वर्ग आहे. साचेबद्ध, झापडबंद अशा या वर्गाला म्हणजे त्यात पुरुषही आले आणि महिलाही, त्यांना या चौकटीत न बसणारी स्त्री सुंदर वाटतच नाही. मग सुरू होतो जगाने आपल्याला सुंदर म्हणावे म्हणून आटापिटा करणाऱ्या महिलांचा खटाटोप. महानगरांमधील जवळपास 90 टक्के महिला अशा बॉडीशेमिंगला बळी पडत आहे. त्याच स्वत:ला आहे तशा स्वीकारत नाहीत, परंपरेने चालत आलेल्या सुंदरतेच्या व्याख्येत स्वत:ला बसवण्याची अतोनात पराकाष्ठा करतात. त्यांच्या असुरक्षित मानसिकतेचा गैरफायदा घेऊन पैसा उकळण्यासाठी मग गल्लीबोळातील सुंदर दिसण्याचे दवाखाने तयारच असतात. त्यात सौंदर्य प्रसाधनांच्या जाहिरातीत केलेल्या विधानांमुळे, दाखवल्या जाणाऱ्या ठराविक साच्यातील महिलांमुळे प्रत्यक्षातील महिलांमध्ये आणखी नकारात्मक भावना निर्माण होते आणि त्यातून बॉडी शेमिंगचे प्रकार घडतात. फोर्टिस हेल्थकेअरने देशातील 9 शहरांत एक सर्वे केला होता.
दिल्ली, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, अमृतसर, लुधियाना, मोहाली आणि जालंधर अशा महत्त्वांच्या शहरात केलेल्या सर्वेनुसार 90 टक्के महिला बॉडी शेमिंगच्या बळी ठरतात असं समोर आलं आहे. आपल्या शरीराची आपल्यालाच लाज वाटणे किंवा अमुक एकासारखं दिसावं असं वाटणं, त्यासाठी प्रयत्न करणे म्हणजेच बॉडी शेमिंग. काही महिन्यांपूर्वी शीवमध्ये राहणार्या एका तरुणीने आत्महत्या केली. चेहर्यावर पुरळ असल्याने तिनं आत्महत्या केली असं आत्महत्येच्या चिठ्ठीत लिहिलं होतं. चेहर्यावरील पुरळ घालवण्यासाठी ती महागडे उपचारही घेत असल्याचे तिच्या पालकांनी सांगितलं. मित्र-मैत्रिणींसोबत गप्पा मारतानाही पुरळांमुळे ती नकारात्मक होत असल्याचे जाणवत होते. ही नकारात्मक भावना तिच्यापर्यंत पोहोचली कारण तिच्या पुरळांबद्दल तिला कोणीतरी जाणीव करून दिली असेल. आपल्यातल्या शारीरिक कमरतेची कोणी आपल्याला जाणीव करून दिली तरीही त्याकडे काणाडोळा करायला महिलांनी शिकायला पाहिजे. नपेक्षा इतरांपेक्षा आपल्याकडे काहीतरी कमी आहे ही भावना महिलांमध्ये नकारत्मकता निर्माण करते. चारचौघांत वावरताना न्यूनगंड वाटू लागतो, वाढतो, सामुहिक ठिकाणी जाणं टाळणं, सतत इतर महिलांना हेकेखोर वृत्तीने पाहणं, दुसर्यांच्या सौंदर्यावर हेवा करणं अशा गोष्टी सर्रास अशा महिलांच्या बाबतीत होतात. इतरांच्या दृष्टीने आपण कुरूप आहोत ही भावना सतत बॉडी शेमिंगला बळी पडलेल्या महिलांच्या मनात वावरत असते. हल्ली नखशिखांत सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न केले जातात. म्हणजे पापण्यांच्या केसांची लांबी, भुवयांचा आकार, भुवयांच्या केसांची घनता, नखांची लांबी, तळहाताच्या कातडीचा मऊपणा इतका सखोल विचार केला जातो. या सगळ्यांची काळजी घ्यायची म्हणजे सौंदर्य प्रसाधनं हवीच. मुळात सौंदर्य प्रसाधने तयार करणार्या कंपन्यांनीच हा सापळा तयार करून ठेवला आहे. त्यातून देशी-परदेशी ब्रॅण्डने तर चमकदार, आकर्षक जाहिरांतीमधून महिलांनी सुंदर नव्हे त्यांची उत्पादनं वापरूनच सुंदर दिसलं पाहिजे असे ठासून सांगितल्यामुळे महिलाही या जाहिरातींना बळी पडतात आणि अशा सौंदर्यप्रसाधनांचा वापर करतात. बारीक होण्यासाठी डाएट करणं, डाएटच्या नावाखाली पोट मारून जगणं, डाएटमधून पौष्टिक आहारांना दूर लोटणं यामुळे महिला बारीक तर होतात शिवाय कमकुवतही होतात. प्रत्येक शरीराची ठेवण वेगळी असते. त्यामुळे अमुक एकासारखं दिसण्यापेक्षा आपण जसे आहोत तसे सुदृढ कसे राहू याचा विचार व्हायला हवा. फोर्टीस हेल्थकेअरने केलेल्या सर्वेक्षणानुसार 47.5 टक्के महिला ऑफिस आणि शाळा-महाविद्यालयात बॉडी शेमिंगचा सामना करतात असे समोर आले. दिवसभरातील सर्वाधिक वेळ याच ठिकाणी जात असल्याने या ठिकाणांहून मिळालेले टक्केटोणपे साहजिकच जिव्हारी लागतात. त्यातील काही महिला या टोमण्यांना नजरेआड करतात तर काही महिला बॉडी शेमिंग करणार्यांच्या विरोधात उभे राहतात. पण हे प्रमाण अवघे 28 टक्के आहे.
वास्तविक, महिलांनो, तुमच्या शरीरावर, सौंदर्यावर बोलण्याचा अधिकार इतर कोणालाही नाही. तेव्हा तुम्हाला कोणी ‘मस्करी’च्या नावाखाली जरी डिवचण्याचा प्रयत्न केला तरी तत्काळ विरोध करा. बॉडी शेमिंगचा हा प्रकार केवळ सामान्य घरातील महिला-मुलींनाच होतो अशातला भाग नाही. मध्यंतरी अभिनेत्री विद्या बालनच्या वाढत्या वजनावर टिका करण्यात आली होती. शिवाय स्पृहा जोशीलाही तिच्या वाढत्या वजनामुळे ऐकून घ्यावं लागलं होतं. मात्र या दोघींनी त्या-त्या वेळी सडेतोड उत्तरे दिली आणि समाजात रुपद्वेष निर्माण करण्यार्यांच्या चपराक लगावली होती. प्रसिद्ध युट्यूबर प्राजक्ता कोळी (मोस्टली सेन) हिनेही बॉडी शेमिंगविरोधात दोन वर्षांपूर्वी एक रॅपसाँग तयार केलं होतं. ‘आय एम शेमलेस’ असे त्या गाण्याचे बोल असून तिने महिलांना बॉडी शेमिंग करण्यार्याविरोधात हॅशटॅग आय प्लेज टु बी मी ही मोहीम राबवली होती. तिच्या या मोहिमेला देशभरातूनच नव्हे तर जगभरातून प्रतिसाद मिळाला. आपल्याला नैसर्गिकरित्या वाढ होऊन मिळालेल्या शरीरावर प्रेम केलंत तर महिला अधिक सुंदर दिसतील. आपल्यातील सकारात्मक विचार, आपलं आनंदी असणं हेच आपल्या सौंदर्याचं गमक आहे. स्त्रियांच्या रुप-बांधावरून तयार झालेली काही सामाजिक बंधनं तोडून महिलांनी ‘मी’ म्हणून जगावं. सौंदर्याच्या नादात स्वतःला दुःखी करून राहिलात तर आयुष्य हातातून हा हा म्हणता निघून जाईल. स्वतःच्या नजरेतून स्वतःकडे पाहा. आरशात पाहिल्यावर आपण स्वतःला आवडलो की बास्स.. दुनियेला आपण आवडतो की नाही याचा विचारच सोडून द्या. दुनिया गेली तेल लावत..
![]() |
दैनिक महाराष्ट्र दिनमान |
आणखी वाचा -बहिष्कार नको, अधिकार वापरा
Tag-body shaming, fat girl, skinny girl, love, respect,
Comments
Post a Comment