समाजमाध्यम सोडा, वेळेचा अपव्यय टाळा
सरकारी नोकरीची स्वप्ने पाहणार्या प्रत्येक स्पर्धा परिक्षा देणार्या उमेदवाराला यशस्वी होण्यासाठी एका कानमंत्राची आवश्यकता असते. वर्षांनुवर्षे त्याच त्याच परिक्षा देऊनही स्पर्धा परिक्षांमध्ये अयशस्वी ठरणारे अनेक विद्यार्थी आपल्या आजुबाजुुला पाहायला मिळतात. उच्चपदस्थ अधिकारी होऊन देशाच्या प्रगतीत हातभार लावण्यासाठी अनेक विद्यार्थी आज केंद्रीय, राज्यस्तरीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणार्या परिक्षांचा अभ्यास करत आहेत. मात्र या परिक्षांमध्ये पास होण्यासाठी, यश मिळवण्यासाठी एक ठराविक असा फॉर्म्युला कोणालाही सापडलेला नाही. सोळा सोळा तास अभ्यास करून कोणीही यशस्वी होत नसतं, त्यासाठी सुसूत्रपद्धतीची आवश्यकता असते. तसेच, स्वतःवर नियंत्रण असण्याचीही गरज असते. सोशल मीडियावर नियंत्रण ठेवल्यामुळेच यंदाचे युपीएससीचे स्पर्धक यशस्वी होऊ शकले असा एक सूर सध्या ऐकायला मिळतो आहे. म्हणजेच एखाद्या गोष्टीत यशस्वी व्हायचं असेल तर सोशल मीडियापासून अलिप्त राहण्याचाच कानमंत्र या यशस्वी परिक्षार्थींनी दिला आहे. यंदा यशस्वी ठरलेल्या कित्येक विद्यार्थ्यांची सोशल मीडियावर खातीच नाहीत. अवघ्या विशीत असणार्या या तरुणांनी सोशल मीडियापासून अलिप्त राहूनच आपले उद्दीष्ट साध्य केले आहे. युपीएससीचा निकाल लागल्यानंतर यशस्वी विद्यार्थ्यांना सोशल मीडियावर शोधण्याचा अनेकांनी खटाटोप केला.

यंदाच्या निवडणुकीत तर थेट प्रचारापेक्षाही सोशल मीडियावरील प्रचाराला अधिक उत आलाय. स्वयंघोषित कार्यकर्ते याच्या त्याच्या पोस्टला वाट्टेल तशी कॉमेंन्ट्स करताहेत. प्रत्येक विरोधी पक्षातील उमेदवाराला ट्रोल केलं जातंय. स्त्री उमेदावारांविषयी तर अगदी खालची पातळी वापरली जाते आहे. हे ट्रोलिंग रोखलं पाहिजे यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहेच. मात्र मिलिअनच्या घरात असलेल्या सोशल मीडियावरील खात्यांवर देखरेख ठेवण्यासाठी सायबर यंत्रणेवर नक्कीच ताण येत असणार. स्वतंत्र विचार करण्याची क्षमता मानवात आहे. मात्र तंत्रज्ञानाच्या युगात मानव ही विचारशक्तीच हरवून बसला आहे. एखाद्या अजस्त्र सापाने भक्ष्याला जखडावं तसं तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाने आपल्याला घट्ट विळखा घालून ठेवला आहे. हा विळखा आपण सैल सोडू शकतो. फक्त मनावर नियंत्रण ठेवावं लागेल. सोशल मीडियामुळे वाचन, गप्पा मारणे, आप्तेष्टांना भेटणे, खेळणे अशा गोष्टी सहज मागे पडल्या आहेत. आपला वेळ या माध्यमात अनाठायी खर्च होतो आहे. पुढे जायचं असेल, आणखी समृद्ध व्हायचं असेल तर सोशल मीडियावरील वापरावर निर्बंद्ध आणवेच लागतील. युपीएससीसारख्या खडतर परिक्षांमध्ये यशस्वी परिक्षांर्थींनीच हा संकेत आपल्याला दिला आहे. धावत्या युगात आपल्याला अपटेड राहायलाच हवं, पण अपटेड राहण्याच्या नादात आपला वेळ किती खर्च होतोय याकडेही आपण लक्ष द्यायला हवं.
![]() |
दैनिक महाराष्ट्र दिनमानआणखी वाचा- तुच तुझ्या रुपाची राणी गं |
Tags- kanishk katariya, shrutsti deshmukh, upsc topper, social media awarness, time spending on social media,
Comments
Post a Comment