मोडून पडला संसार, पण मोडला नाही कणा...


एकूणच सगळी हतबलता जाणवतेय. महापूर आला नि सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओजचा पाऊस झाला. हे फोटो पाहून हादरायला झालंच होतं, पण त्याहीपेक्षा वाईट अवस्था हे सारं उघड्या डोळ्यांनी पाहिलं तेव्हा झाली. महाडच्या बाजारपेठेतून जाताना अत्यावस्थ पडलेल्या गाड्या पाहिल्या नी पेंगुळलेले डोळे ताडकन जागे झाले. जसजशी गाडी पुढे जात होती तशी पावसामुळे झालेली हानी प्रकर्षाने जाणवत होती. महाड हा अगदी सुरुवातीचा भाग होता. दरड कोसळून मृत्यू पावलेल्यांचा आक्रोष आठवत होता. सगळं एकदम लख्खं आठवलं.

महाड मागे गेलं आणि चिपळूणच्या वाटेवर डोळे लागलेले असताना आता आणखी काय वाढून ठेवलंय याची कल्पनाही करवत नव्हती. गाडी चिपळुणात पोहोचली आणि बाजारपेठेत शिरली. आणि तिथली परिस्थिती पाहून जागच्या जागी सुन्न झालो आम्ही. पूर ओसरून पंधरा दिवस लोटले तरी लोकांच्या डोळ्यातील आसवं पुसली नव्हती. रोज उगवणारी नवी सकाळ त्यांच्यासाठी विविध समस्या घेऊन येत होती. 

मैत्रिण म्हणाली, ‘नेहमी चिपळुणात येताना उत्साह वाटायचा, आज आले तेव्हा एकदम उदास वाटायला लागलं. जिथं सतत एनर्जेटिक वाटायचं ते शहर एकदम भकास झालेलं पाहावलं नाही. ज्या ठिकाणी आपण राहिलो- वाढलो ते गाव आता इतकं कोलमडून पडलं असेल असं वाटलंही नव्हतं.’ तिच्या बोलण्यातून महापुराच्या आधीचं चिपळूण आठवलं. गजबजलेली बाजारपेठ आठवली. माणसांची वर्दळ आठवली. मुंबईकरांच्या वाटेवर डोळे लावून बसलेला गावकरी आठवला. पण हे किती क्षणिक होतं. जे समोर दिसतंय ते खरं की स्वप्न हेच समजत नव्हतं. मुंबईच्या पावसाने हतबल झालेलो आपण चिपळूणचा महापूर जर आपण प्रत्यक्षात अनुभवला असता तर पुढचे कित्येक दिवस झोप लागली नसती. 

महापुराचा वेग इतका महाभयंकर होता की मोठमोठाल्या दुकानांची शटरं उखडून पडली होती. फर्निचर रस्त्यावर वाहत गेले होते. दुकानाच्या आतल्या सामानांची मोजदादच करायला नको. कपड्यांच्या दुकानांत तर आता सेल लावलाय. भिजलेले, कारवेलेले कपडे अनेक दुकानदार मोफत विकतायत. वर्षानुवर्षे उभा केलेला व्यवसाय एका पावसात जमिनदोस्त झाला. प्लास्टिक, अन्नधान्यांची दुकाने ओसाड पडली. व्यवासायिकांच्या डोळ्यात भविष्यातला अंधार स्पष्ट दिसत होता. यांना उभं राहण्याकरता पुन्हा शुन्यापासून सुरुवात करावी लागणार आहे. अगदी शुन्यापासूनच.

बाजारपेठेतून वाट काढत जुवाड गावात पोहोचलो. या गावातील लोक अद्यापही एका शाळेत राहत आहेत. पुन्हा पाऊस आला तर कुठे धावाधाव करायची, त्यापेक्षा पुनर्वसन होत नाही तोवर शाळेतच तंबू ठोकायचा असा निर्धार गावकऱ्यांनी केलाय. त्यांच्या गावात जाणारी वाट अत्यंत खडतर होती. दोन्ही बाजूला उद्ध्वस्त झालेली शेती, चिखलाने माखलेली पायवाट आणि उजव्या हाताला लालेलाल झालेली नदी. या वाटेवरून चालताना कोणालाही वाटणार नाही आतमध्ये २३ कुटुंबाची वस्तीही राहत असेल, इतक्या आतमध्ये हे गाव वसलेलं आहे. पण समितीच्या काही स्थानिक सदस्यांमुळे या गावापर्यंत पोहोचता आलं. पुराच्या पाण्यात वाहून आलेले कपडे, उन्मळून पडलेली झाडं, गुरं, जनावरं असं सगळं काही या नदीनं गिळंकृत केलं. गावातली घरं जवळ‌पास ७ ते ८ फूट उंच. २००५ सालच्या पुरातून धडा घेत इथल्या प्रत्येकाने घरं उंच करून घेतलेली. मात्र २००५ पेक्षा हा प्रलय महाभयंकर होता त्यामुळे ८ फुटांवर असलेल्या घरातही पाणी भरलं आणि गावकऱ्यांना नेसत्या वस्त्रानिशी गाव रिकामी करावं लागलं. स्वत:चा जीव वाचवताना गुरं मात्र तिथंच राहिली आणि तिथंच त्यांचा अंत झाला. पाणी ओसरल्यानंतर गावकऱ्यांनी गावात पाहणी केली तेव्हा इतरस्त्र पडलेले गुरांचे मृतदेह जीव कालवणारे होते. महाराष्ट्र कृती समितीचे समन्वयक प्रसाद पाष्टे यांनी १५० जणांची टीम गावात नेऊन सगळ्यात आधी तिथला चिखळगाळ बाहेर काढला. प्रत्येकाच्या घरापर्यंत जाणाऱ्या पायवाटेवरचा चिखल बाजूला केला. मृत गुरांना नदीतच जलसमाधी दिली. आता प्रश्न पडलाय हे सारं पुन्हा कसं आणि केव्हा उभं करायचं?

पुढे भारतीय समाज सेवा केंद्रात पोहोचलो. अनाथ बालकं इथं राहतात. जवळपास २२ बालंक आहेत, त्यातील १६ बालकं १ वर्षांपेक्षाही लहान. तीन मजली इमारत असल्याने पाणी वाढत गेल्यावर मुलांना दुसऱ्या माळ्यावर स्थलांतरित केलं गेलं. या अनाथालयाचा तळमजला आणि पहिला मजला पाण्यात बुडाला. इमारतीच्या मागे असलेली सिमेंटची टाकी पाण्याच्या प्रवाहात वाहत गेली. सिमेंटची टाकी वाहत जाईपर्यंत पुराच्या पाण्याचा जोर होता. समाज सेवा केंद्राचे समन्वयक माहिती सांगत होते तेव्हा आमच्या प्रत्येकाच्या अंगावर काटा उभा राहिलेला. कारण २२ निष्पाप मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न होता. सुदैवाने सगळी मुलं सुखरुप आहेत. पण सामानाची नासधुस झाली. परंतु, अनेकजण स्वयंस्फुर्तीने मदत देत आहेत. यातून हे अनाथालय पुन्हा उभं राहिल याची खात्री आहे.

तिथून पुढे दुसऱ्या गावात जाताना मध्येच अपरांत हॉस्पिटल लागलं. हो तेच हॉस्पिटल जिथं १० कोरोना रुग्ण व्हेंटिलेटर अभावी मृत झाले. पाण्याचा जोर वाढल्याने वीज पुरवठा खंडीत झाला होता. वीजेच्या अभावाने व्हेंटिलेटर बंद पडले, परिणामी कोरोना रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. तब्बल १० रुग्ण एकाच वेळीच मृत झाले, शिवाय रुग्णालयातील परिचारिका वाहून गेल्या. हा धक्का सहन झाला नसावा म्हणून रुग्णालयाच्या मुख्य डॉक्टरांना हृदय विकाराचा झटका आला. हे हॉस्पिटल गेल्याच महिन्यात सुरु करण्यात आलं होतं. पण महिन्याभरातच एवढी मोठी आपत्ती रुग्णालयावर येऊन कोसळली. नवंकोरं हॉस्पिटल भकास दिसत होतं. हा धक्का सहन करणं कठीणच आहे. पण रुग्णालयाच्या संचालकांना लवकरात लवकर देव बरं करो, आणि पुन्हा सगळं उभं करण्याची ताकद देवो. 

आजूबाजूची गावं पाहताना रस्त्यावर नुसता कचऱ्याचा ढीग दिसत होता. मदतीसाठी गाडी गावात आल्याचं कळताच अनेक गावकरी गाडीजवळ जातात. आपली व्यथा सांगतात. गाई-गुरं गेली. शेती गेली. गाड्या वाहून गेल्या. आता कसं जगायचं असं विचारतात. त्यांच्या प्रश्नांना ना समोरं जाता येत होतं, आणि नाही त्यांना उत्तरं देता येत होती. यापेक्षा वेगळी हतबलता मी कधीच अनुभवली नव्हती.

आता एकच विनंती आहे, महाराष्ट्र सकारात्मक कृती समितीसारख्या अनेक संस्था आहेत, त्या आपल्या परीने गावं उभी करायला मदत करतीलच. पण शेवटी संस्थांचे हात तोकडे असतात. त्यामुळे सरकारने संवेदनशीलतेने हे प्रकरण हाताळलं पाहिजे. थोडंसं राजकारण बाजूला ठेवून माणुसकीने हात पुढे केला पाहिजे. स्थानिक प्रतिनिधींनीही स्वत:चे खिसे भरताना उद्या हीच वेळ आपल्यावरही येऊ शकते एवढं लक्षात ठेवलं पाहिजे. कारण इथं केलेली पापं इथंच भोगावी लागतात.

Comments

  1. खरंय सोशल मीडियावर फोटोस पाहताना आणि स्वतः त्या ठिकाणी जाऊन परिस्थिती अनुभवताना हे नुकसान किती मोठंय हे जाणवतं.

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts