आईचं हळदीकुंकू

If you want to change the system, be a part of system

सतत ताजीतवानी राहणारी, हसरी, टापटीप राहणारी माणसं अचानक नीरस जगू लागली की त्यांच्याकडे पाहवत नाही. माझी आई चापूनचोपून साडी नेसून, कपाळावर मोठी लाल टिकली, केसात गजरा आणि चेहऱ्यावरच्या खळीने खुलून दिसायची. पण पप्पा गेल्यानंतर ती बेरंग जगत होती. अकाली आलेल्या वैधव्याने तिचं तेज झाकोळलं गेलं. तिच्या या निस्तेज चेहऱ्याकडे आम्हाला पाहवत नव्हतं. तिला म्हंटलं, 'तू आधी जशी प्रसन्न रहायचीस तशीच राहा, समाज काय म्हणेल याकडे लक्ष देऊ नकोस.' आपलं माणूस गेल्याचं दुःख असतंच, पण त्याच्यामागे किती काळ बेरंग जगायचं? पण समाजातील अनिष्ट परंपरांच्या जोखडात बायका इतक्या गुरफटून जातात की त्यांना त्यांचं स्वतंत्र आयुष्य असतं हेच त्या विसरून जातात. 

घरात रोज देवपूजा होते. बत्ती लावून झाली की घरातील बायकांना कुंकू लावून थोरामोठ्यांच्या पाया पडायचा शिरस्ता आहे. पण पप्पा गेल्यापासून आईच्या कपाळाला कुंकू लावलं जात नव्हतं. तिने याबाबत दुःख व्यक्त केलं नाही, पण तिला हे फार खटकायचं. मग वहिनीने पुढाकार घेतला आणि रोज देवबत्ती केल्यानंतर तिच्या कपाळाला कुंकू लावायला सुरुवात झाली. 

जागोजागी हळदीकुंकू होतात, पूर्वी आईला हमखास आमंत्रण असायचं. पण आता दोन वर्षांपासून तिला आमंत्रणं यायची बंद झालीत. साहजिकच तिला याचं वाईट वाटलं असणार. आमच्याकडेही जोरात हळदीकुंकू होतो. आई आणि तिच्या मैत्रिणी उत्साहाने एकत्र येत कार्यक्रम करतात. पण गेल्यावर्षी हळदीकुंकू कार्यक्रम झाला नाही. मला याचं फार वाईट वाटलं. नवरा गेला म्हणून बाईने कपाळावर कुंकू लावू नये, तिने नटू सजू नये, गजरा माळू नये यामागचं शास्त्र मला आजही समजलेलं नाही.  त्यामुळे यंदा दणक्यात हळदीकुंकू करायचा असं ठरवलं. अर्थात आमच्या दारासमोर हा कार्यक्रम होत असला तरी तो सार्वजनिक होता. आम्ही सगळ्याजणी छान नटलो. आईलासुद्धा कित्येक दिवसांनी नटलेलं पाहिलं (यावरून अनेकांनी दबक्या आवाजात चर्चाही केली बरं का!). सगळ्या बाया येऊन एकमेकींना हळदीकुंकू लावत होत्या. एकीदोघींनी आईच्या कपाळाला हळद लावली पण कुंकू लावलं नाही. हे सगळं मी बघत होते. कार्यक्रम संपता संपता मी आईजवळ गेले आणि तिला हळदीकुंकू लावलं, मागून वहिनीही आली. हळदीकुंकवाच्या कार्यक्रमात तिच्या कपाळाला कुंकू लागल्याने तिचा चेहरा पुन्हा खुलला. आपण यांच्यापेक्षा वेगळे नाहीत याची तिला जाणीव झाली.

हळदी कुंकू किंवा टिकली लावा अगर लावू नका, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण या प्रथा परंपरांच्या नावाखाली बायकांना मिळत असलेली वागणूक थांबायला हवी. If you want to change the system, be a part of system असं एक वाक्य राजकुमार रावच्या शाहिद या चित्रपटात आहे. हे वाक्य ऐकल्यापासून मनात इतकं रुंजी घालत होतं की समाजात बदल घडवायचा असेल तर आधी आपल्याला त्या समाजाचा एक भाग होता आलं पाहिजे हे प्रचंड पटलं आणि जाणवलं. 

कुंकू आपण लहानपणापासूनच लावतो, मग त्यात सौभाग्याचा भाग कुठून आला देव जाणो! सौभाग्य, वैध्यव्य यात फरक केला की बाई बाईपासून तुटत जाते. त्यामुळे आपल्या आजूबाजूला असलेल्या अशा एकल बायकांना वेगळेपणाची वागणूक देण्यापेक्षा त्यांनाही मानाने, सन्मानाने वागवलं तर समाज म्हणून आपण लवकर प्रगल्भ होऊ!

(तळटीप - ही पोस्ट वाचल्यानंतर, 'बाई गं, आपल्यात असं नाही चालत', असं सांगायला कोणाचा मॅसेज अगर फोन आला तर स्वतःचा अपमान करून घेण्याची तयारी ठेवा. आणि तुझ्यासारख्या मुलींनी हळदीकुंकूत गुरफटू नये असा सल्ला देणाऱ्या सो कॉल्ड पुरोगाम्यांनीही लांब राहा.)

Comments

Popular Posts