‘वारी’ ऑन सोशल मीडिया
‘वारी’ ऑन सोशल मीडिया
आजच्या तरुणांना आधात्म्याची गोडी फार कमी आहे. मात्र वारकरी संप्रदायाची प्रथा अशीच अविरत पुढे सुरू ठेवण्याकरता एका तरुणाने सोशल मीडियामार्फत पाऊल उचललं. आजच्या घडीला फेसबुक, ट्वीटर, ब्लॉग, व्हॉट्सअॅप अशा माध्यमांतून ते लाखो तरुणांपर्यंत वारकरी संप्रदायाची प्रथा पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत.

मात्र याच वारकरी संप्रदायातील काही तरुण मंडळी हिरीरीने पुढे येतात आणि आजचं तंत्रज्ञान वापरून परंपरागत चालत आलेली संस्कृती पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. त्यातीलच एक अक्षय महाराज भोसले. वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षापासून ते कीर्तन करतात. त्यामुळे आज त्यांना त्यांच्या संप्रदायात प्रचंड मान आहे. मात्र ते तेवढय़ावरच थांबले नाहीत.
तरुणांना या गोष्टींची माहिती व्हावी यासाठी त्यांच्या कलेने पावलं उचलायला हवीत. म्हणून सहा वर्षापूर्वी त्यांनी फेसबुकवर पेज तयार केलं. त्यानंतर हळूहळू अनेक सोशल मीडियावर त्यांनी आपला जम बसवला. फेसबुक, ट्वीटर, व्हॉट्सअॅप, ब्लॉग अशा विविध माध्यमांतून ते त्यांच्या वारक-यांशी संवाद साधतात. नवीन, तरुण वारक-यांना प्रोत्साहन देतात.
अक्षय महाराजांचा जन्म सातारा जिल्ह्यातील बिजवडी गावातला. शाळेत असतानाच त्यांनी पारमíथक शिक्षण आपल्या आईकडून घेतलं. ते स्वत: शास्त्रीय पखवाज वादक आहेत. अगदी कमी वयात ते भारतरत्न लता मंगेशकर, पं. हरिप्रसाद चौरसिया, हृदयनाथ मंगेशकर, पखवाज वादक पं. भवानी शंकर अशा थोर लोकांना भेटून आले आहेत.
कीर्तनकार म्हणून त्यांची प्रचिती असली तरी ते लेखक म्हणूनही प्रसिद्ध आहेत. ब्लॉगवरचं त्यांचं लिखाण फार प्रसिद्ध आहे. त्यांच्या या ब्लॉगला परदेशी वाचकही लाभले आहेत. त्याचबरोबर ते अनेक दैनिक, मासिके यांमध्ये लिहीत असतात. शिवाय वारकरी संप्रदायाचे मुखपत्र मासिक ‘वैष्णव दर्शनचे’ ते मुख्य संपादकही आहेत. त्यांना आता संत साहित्य विश्वात पीएच.डी. करायची आहे.
एवढं सारं कौशल्य असलेल्या या युवा महाराजांनी वारकरी संप्रदायाची ही प्रथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अॅप तयार केलं आहे. या अॅपमध्ये वारीविषयी संपूर्ण माहिती, मान्यवरांचे लेख, त्याचसोबत विठुमाऊलीचं लाईव्ह दर्शनही घेता येणार आहे. कामामुळे वेळ मिळत नसलेल्या वारक-यांना या अॅपचा नक्कीच फायदा होईल, यात काही शंका नाही.
‘आजकाल प्रत्येकाकडे स्मार्ट फोन्स आहेत. त्यामुळे आपला अधिक वेळ या मोबाईलमध्येच खर्ची होत असतो. मग त्यांना मोबाईलमार्फतच वारकरी संप्रदायाची सर्व माहिती पुरवली तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल, या हेतूने आम्ही अॅपची निर्मिती केली’’, असं अक्षय महाराज सांगतात.
वारीला सोशल मीडियाशी कनेक्ट केल्याने घरबसल्या अनेकांना माऊलीचं दर्शन घेता येणार आहे. त्याचबरोबर वारीतील छायाचित्रे पाहून अनेक तरुण छायाचित्रकार या वारीकडे वळल्याचं चित्र आपण पाहू शकतो. जवळपास अठरा दिवस पायी चालून माऊलीचं निदान ओघवतं दर्शन व्हावं एवढीच वारक-यांची अपेक्षा असते.
ऊन, पाऊस, वारा झेलत हा वारकरी का बरं एवढय़ा लांब पायी चालत जातो यावरही अनेक तरुण आता संशोधन करत आहेत. त्यांनाही या गोष्टीचं नवल वाटतंय. मात्र माऊलीच्या एका भेटीने वर्षभर काम करण्यासाठी ताकद मिळते अशी भावना या वारक-यांमध्ये आहे. त्यामुळे वारक-यांचे दृष्य टिपण्यासाठीही अनेक तरुण पुढे येतायेत.
यंदाची पर्यावरण दिंडी
गेल्या दोन-तीन वर्षात महाराष्ट्रात दुष्काळ पसरला आहे. या दुष्काळाच्या झळा फक्त शेतक-यांना सोसाव्या लागतात आणि आजही हजारो शेतकरी वारकरी या वारीसाठी येतात. त्यामुळे त्यांच्यात ‘पाणी वाचवा, झाडे वाचवा’ असे विविध विषय घेऊन हे तरुण त्यांना मार्गदर्शन करतात. त्याचसोबत त्यांनी आतापर्यंत एकूण ५० हजार रोपांच्या बिया या गावक-यांना वाटल्या आहेत.
Comments
Post a Comment