ग्राहक देवो भवः


kurla station, limbu sarbat, viral video, railway station, ban on limbu sarbat, kala khata, orange juice,

उन्हाची काहिली वाढली आहे, डोक्यावर सूर्य आग ओकतोय, पायाच्या तळव्यापर्यंत उन्हाचे चटके लागताहेत, अंगकांती करपतेय, जिवाची लाही लाही होतेय अशी भट्टी दररोज तापत असताना घोटभर थंडावा शोधत अनेकजण रस्त्यावर वा फलाटांवरील स्टॉलवर लिंबू सरबत, कोकम सरबत, काला खट्टा असे जे काही समोर दिसेल ते गटागटा गळ्याखाली उतरवतात. रस्त्यावरील घाण, धूळमाती, फलाटावरील स्टॉलवाल्याचे कळकट मळकट कपडे, गलिच्छ देहबोलीकडे दुर्लक्ष करून, तेथील अस्वच्छतेकडे कानाडोळा करून, बादलीभर पाण्यात वारंवार बुचकळवलेल्या मळक्या ग्लासमधूनच आपण अशी शीतपेये प्राशन करतो. विचारही करत नाही की ही शीतपेये नक्की कशापासून बनवली आहे, त्यात कुठले पाणी आहे, लिंबाचा वा कालाखट्टाचा स्वाद आणण्यासाठी त्यात कुठला केमिकल लोचा ओतलाय, त्यातला गोडवा साखरेचा आहे की घातक सॅक्रीनचा? क्षणभरासाठी  ही शीतपेये थंडावा देतात पण नंतर लक्षात येते की घशाची वाट लागलीय. 
kurla station, limbu sarbat, viral video, railway station, ban on limbu sarbat, kala khata, orange juice,

या शीतपेयांमधून आपण कितीतरी जंतू, विषाणूंना आपल्या शरीरात स्वहस्ते प्रवेश देत असतो याची सामान्य माणसांना जाणीवही नसते. रस्त्यावर, रेल्वे स्थानकांवरील लिंबू सरबत आणि इतर ‘चविष्ट’ शीतपेयांमागची रेसिपी काय, ही सरबते कशी बनवली जातात याचा आँखो देखा हाल सर्वांना नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून पाहायला मिळाला होताच. सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने पसरलेला हा व्हिडिओ पाहताच प्रत्येकाच्या भुवया उंचावल्या आणि लिंबू सरबताला नक्की चव कशाने येते याची प्रचिती आपल्याला आली. कुर्ला स्थानकातील छप्पर दुरुस्तीसाठी काढण्यात आले आहे. त्यामुळेच या गलिच्छ लिंबू सरबतवाल्याचे बिंग फुटले. एका जागरूक तरुणाने मोबाईलमधून लिंबू सरबत बनवण्याची पद्धत चित्रित केली आणि समाजमाध्यमांवर व्हायरल केली. सध्या उष्माम प्रमाणाबाहेर वाढल्यामुळे आपण सहज लिंबू सरबत रिचवतो. त्यामुळेच हा व्हिडिओ मुंबईकरांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये बराच भाव खावून गेला. समाजमाध्यमावर व्हायरला होणार्‍या व्हिडिओची मग वृत्तपत्र, वृत्तवाहिन्यांनीही बातमी केली. खातरजमा झाल्याने, विश्वास बसल्याने कुर्ला स्थानकातील या लिंबू सरबतवाल्याविषयी समस्त मुंबईकरांच्या मनात चीड निर्माण झाली. स्टॉलचा परवाना देताना जे काही तोडपाणी होते ते अनेकांना माहिती नसते. वर्षानुवर्षे एकच ठेकेदार स्टॉल अडवून बसलेला असतो. एकदा का परवाना दिला की तो ग्राहकांची लुटमार सुरू करतो आणि रेल्वेचे आरोग्य खाते, दर्जा तपासणी विभाग सारे डोळे झाकून गप्प असतात. आजवर हेच चालत आले आहे पण, या लिंबू सरबत चित्रफितीने सारे भांडे फोडल्यावर मध्य रेल्वेचे आरोग्य विभाग व प्रशासनही हडबडले. लोकांचा रोष पाहून त्यांनी कधी नव्हे ती तात्काळ पावलं उचलली आणि मध्य रेल्वेवरील प्रत्येक स्थानकावर अशा स्टॉलधारकांची पाहणी केली. अखेर पाहणीनंतर रेल्वेवरील लिंबू सरबत, काला खट्टा, ऑरेंज ज्यूस विक्रीलाच बंदी करण्यात आली. खरेतर ही पावले याआधीच उचलली गेली पाहिजे होती. मात्र बोभाटा झाल्याशिवाय अधिकार्‍यांना जाग येत नाही म्हणूनच लोकांना जागरूक आणि दक्ष राहावे लागते. आरोग्याची काळजी घ्यायची तर ही दक्षता अत्यावश्यकही आहे. इतर कुणी आपल्यासाठी काळजी घेणार नाही. आता हा प्रकार उघडकीस आला म्हणून आपण मुंबईकर आता महिनाभर तरी लिंबू सरबत पिणार नाही. पण आपल्यासारख्या सामान्य नागरिकांची स्मरणशक्ती फारच अल्प असते हे सार्‍याच नियमभंग करणार्‍या विक्रेत्यांना माहिती आहे. त्यामुळे महिनाभरानंतर पुन्हा असे विक्रेते सक्रिय होतील आणि पुन्हा नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू होईल. रस्त्या-रस्त्यांत, चौका-चौकांतही असे अनेक शीतपेये विक्रेते, चायनिज कॉर्नर, वडापाव विक्रेते बसलेले असतात. 
kurla station, limbu sarbat, viral video, railway station, ban on limbu sarbat, kala khata, orange juice,

अन्न व औषध सुरक्षा प्रशासनाने दिलेले नियम पायदळी तुडवून विक्रेते आपला स्टॉल थाटतात. रस्त्यांवरच्या अशा पदार्थांमधून इ-कोलाय या जंतूचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरतो. त्यातून अतिसार, जुलाब, गॅस्ट्रो सारखे अनेक आजार उद्भवण्याची शक्यता असते, नव्हे अनेक आजारांना आपण बळी पडतोच. पण तरीही आपण बाहेरचे पदार्थ खाणे सोडत नाही. सणासुदीच्या काळात अनेक हलवायांच्या दुकानांत एफडीएचे छापे पडतात. याच काळात उच्च दर्जाचे खाद्यपदार्थ विकत घेण्याचे आवाहन वगैरे केले जाते. या दोन-चार महिन्यात एफडीए एकदम सक्रीय असते. मात्र सण-वार निघून गेले की पुन्हा छोटे-मोठे स्टॉलधारक सगळे नियम तुडवायला मोकळे असतात. त्यातही रेल्वे फलाटांवर असलेल्या स्टॉलधारकांवर एफडीएची नजर पडत नसल्याने हे विक्रेत निर्धास्तपणे ग्राहकांच्या आरोग्याशी तखेळ मांडतात. असे प्रकार उघडकीस आले की तात्पुरती मलमपट्टी म्हणून संबंधित विक्रेत्यांवर थेट बंदी आणली जाते. मात्र बंदी आणल्याने विक्रेते ताळ्यावर येणार नाहीत. त्यांच्यासाठी कठोर कायदा करायला हवा. या कायद्यांचे पालन होते की नाही याची चौकशी, तपासणी व्हायला हवी. तरच, सामान्य ग्राहकांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ थांबेल. मध्य रेल्वेवरील लिंबू सरबतनंतर आता रेल्वेवरील वडापाव, शेवपुरीवरही टांगती तलवार आहे. ज्या वडापाववर अर्धी मुंबई जगते तोच वडापाव आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. अर्थात केवळ मध्य रेल्वेवरील वडापावचे स्टॉल्स बंद करण्यात येणार आहे. मात्र सरसकट बंदी हा उपाय नसतो, तर व्यवसायासाठी काटेकोर नियम गरजेचे असतात. कारण अशा बंदीमुळे ओल्यासोबत सुकेही जळते. स्वच्छतेचे सर्व नियम पाळून, ग्राहकांना देव मानून जे विक्रेते प्रामाणिक आपला व्यवसाय करतात त्यांच्यावरही बंदीची वेळ आल्याने मध्य रेल्वेने आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा अशी प्रामाणिक विक्रेत्यांची अपेक्षा आहे. कारण रेल्वेमुळे अपघात घडतात म्हणून आपण रेल्वेसेवाच बंद नाही करत, तर अपघात घडू नयेत म्हणून काळजी घेतो. तद्वत सरसकट बंदी आणण्यापेक्षा कायदे-कानू काटेकोरपणे अमलात आणावेत हेच योग्य ठरेल.


kurla station, limbu sarbat, viral video, railway station, ban on limbu sarbat, kala khata, orange juice,
दैनिक महाराष्ट्र दिनमान

Tags-kurla station, limbu sarbat, viral video, railway station, ban on limbu sarbat, kala khata, orange juice, 

Comments