अभंगांना आधुनिक ताल

आपल्या कलागुणांना आपणच व्यासपीठ मिळवून द्यायचं, मात्र त्याचा फायदा समाजाला झाला पाहिजे आणि संत-महात्म्यांनी रचलेले अभंग आजच्या पिढीलाही कळायला हवेत या हेतूने ‘अभंग रिपोस्ट’ नावाचा उपक्रम काही तरुणांनी सुरू केला आहे.
abhangएखादी गायनाची स्पर्धा भरवली जाते. स्पध्रेत जिंकण्यासाठी अनेक गट हॉलिवूड, बॉलिवूड संगीताचा आधार घेतात. श्रोत्यांना आणि प्रेक्षकांना खूश करण्यासाठी आजची उडती गाणी गायली जातात. मात्र याच स्पध्रेत जर एखादा अभंग सादर झाला आणि चक्क त्या अभंगाला पहिलं बक्षीस मिळालं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल ना! पण हे खरं आहे.
आपल्या संस्कृतीतही अनेक चांगल्या आशयाची गाणी आहेत, मात्र बॉलिवूड प्रेमाच्या नादात आपण हे सगळं विसरत जातोय, हे जेव्हा त्या चौघांना कळलं तेव्हा त्यांनी एक युक्ती लढवली. महाराष्ट्राला ‘संतांचं घर’ म्हटलं जातं. याच संतांनी अनेक अभंग लिहून ठेवले आहेत.
आजच्या तरुणाईची नाळ या अभंगांशी जोडता यावी याकरता या चौघांनी ‘अभंग रिपोस्ट’ नावाचा उपक्रम सुरू केला. त्या काळच्या अभंगांना आजच्या काळातील चाल देऊन तो अभंग सोशल मीडियाद्वारे अनेकांपर्यंत पोहोचवला.
अजय व्हावळ (गिटारिस्ट), विराज आचार्य (तबला वादक), दुष्यंत देवरुखकर (ड्रमर वादक), स्वप्नील तरफे (गिटारिस्ट), सुयोग गोसावी (गायक) असे कलाकार एखाद्या घरात एकत्र जमतात. एखादा अभंग आजच्या पद्धतीने चालबद्ध करतात. त्याचा सुंदर व्हीडिओ तयारकरतात आणि क्षणार्धात त्या व्हीडिओला हजारो लाईक्स मिळतात. त्यांचे हे व्हीडिओ प्रचंड व्हायरल होतायेत.
एवढंच नव्हे तर फेसबुकवर तर अनेक पेजेस त्यांचे हे व्हीडिओ आवर्जून शेअर करत आहेत. तरुणांनी तर या अजब कल्पनेला अक्षरश: उचलून धरलं आहे. युटय़ूबवर त्यांच्या व्हीडिओजना जवळपास दोन लाखांहून अधिक व्हय़ूव्हर्स आहेत.
केवळ रेकॉर्डिंग पुरतं त्यांचं हे काम मर्यादित नसून त्यांना अनेक कार्यक्रमांमध्ये खास निमंत्रित केलं जातं. त्यांचं हे कौशल्य पाहून तिथेही शाबासकी मिळतेच. तरुणांकडून उत्तम प्रतिसाद मिळतोय मात्र थोर-मोठेही यांच्या या कार्यक्रमाबद्दल भरभरून बोलतात.
नुकताच त्यांचा ‘पुंडलिक वर दे’ हा व्हीडिओ प्रसिद्ध करण्यात आला. हा व्हीडिओ तर नेटिझन्सने प्रचंड व्हायरल केलाय. त्याचबरोबर आता आषाढी एकादशी असल्याने या व्हीडिओला प्रचंड प्रसिद्धी मिळतेय.
‘आम्ही बी घडलोया’ हा व्हीडिओसुद्धा प्रचंड गाजतोय. ‘तरुणांना चांगल्या आशयाची गाणी त्यांच्याच पद्धतीने चालबद्ध केल्याने त्यांना ऐकायला आवडतात. त्याचबरोबर काही जुने-चांगले विचार त्यांच्या कानावर पडतील असा विचार करून आम्ही ‘अभंग रिपोस्ट’ सुरू केलंय.’ असं अजय व्हावळ सांगतो.

Comments