त्यांच्या शिक्षणासाठी "समन्वय"

त्यांच्या शिक्षणासाठी समन्वय

मुंबईपासून आदिवासी पाडे आजकाल काही दूर नाहीत. प्रगत होऊ पाहणारे हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले आहेत. त्यांनाही शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे, त्यामुळे ‘समन्वय’ने पाऊल उचललं आणि सुरू झाला तो त्यांना शिकवण्याचा प्रवास.
educationमहाविद्यालयात शिकताना अभ्यासाव्यतरिक्त काहीतरी करावं, ज्याचा उपयोग समाजाला होईल आणि आपल्यासोबतच समाज शिकेल. गेल्या काही दशकांत आदिवासी पाडेही आपल्या अगदी शेजारीच आले आहेत.
राज्यघटनेत प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार आहे; परंतु आदिवासी लोक या अधिकारापासून वंचितच राहिले आहेत. नेमकी हीच समस्या महर्षी दयानंद महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी त्यांच्या शिक्षणासाठी स्थापन केली ‘समन्वय’ संस्था.
विद्यार्थ्यांचं समाजाशी असलेलं नातं घट्ट होण्यासाठी, समाजसेवेची आवड जोपासण्याकरता, लोकांमध्ये विशिष्ट गोष्टीची जनजागृती करायला शिकवण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात एन.एन.एस.चं शिक्षण दिलं जातं. प्रत्येक जण या शिक्षणासाठी स्वत:हून पुढाकार घेतात. त्यातूनच त्यांच्यात समाजसेवेची गोडी निर्माण होते, आणि आयुष्यभर समाजसेवा करण्याचं व्रत घेतल्यासारखं ही मुलं पछाडतात आणि कामाला लागतात.
त्याचप्रमाणे या ‘समन्वय’तील विद्यार्थ्यांचं झालं. कॉलेजमध्ये शिकत असताना एन.एन.एस. युनिटमध्ये या मुलांची ओळख झाली. वर्षभरात होत असलेल्या विविध उपक्रमांमुळे समाजसेवेची रुची वाढत गेली आणि आपणही आदिवासी विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करावं असं त्यांच्या मनात निर्माण झालं.
यासाठी त्यांनी एन.एन.एस. युनिटचे समन्वयक डॉ. अविनाश कारंडे यांच्याकडे चौकशी केली. ही कल्पना त्यांनाही प्रचंड आवडली. ‘महाविद्यालयीन शिक्षण संपल्यावर तुम्ही तुमची संकल्पना सत्यात उतरू शकता, त्यासाठी मी स्वत:हून तुम्हाला मदत करेन’ असे ते म्हणाले. महाविद्यालयीन शिक्षण संपल्यावर ही संकल्पना सत्यात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले.
मुंबई, ठाण्यासारख्या जागतिक कीर्तीच्या प्रगत शहरांपासून शंभर कि.मी.पेक्षाही कमी अंतरावर असणा-या ठाणे व पालघर जिल्ह्यातील बरेचसे आदिवासी पाडे आजही अन्न, पाणी, निवारा, वीज, आरोग्य, शिक्षण, दळणवळणाची साधने यांसारख्या मूलभूत व महत्त्वाच्या गरजांपासून वंचित राहिलेले आहेत.
तसेच कुपोषण, बेरोजगारी, निरक्षरता, बालविवाह, व्यसनाधीनता यांसारखे गंभीर प्रश्न या गिरिजनांच्या उंबरठय़ांवर अजूनही भक्कमपणे ठाण मांडून आहेत. या सा-या प्रश्नांची उत्तरं सापडणं व समस्यांचं निराकरण होण्यासाठी फेब्रुवारीपासून १०-१२ तरुण मित्र-मैत्रिणी एकत्र आले आणि त्यांनी स्थापन केलं ‘समन्वय’.
प्रथम तिकडे जाऊन त्यांनी त्या आदिवासी पाडय़ांचा अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांची संख्या केवळ २ टक्केच आहे. तसेच जे शिकलेले आहेत, त्यांच्याकडे रोजगार नाही, त्यामुळे बेरोजगारीमुळे मिळेल ते काम करण्याची यांची तयारी आहे. जे काम उपलब्ध आहे त्यात त्यांना ‘काम भरपूर पण दाम नाही’ अशी अवस्था.
ज्यांना शिकायचं आहे त्यांना शिक्षणात अनेक अडचणी, शाळा- महाविद्यालये पाडय़ांपासून लांब असल्याने शिक्षण संख्या घटते आहे, असं त्यांना वाटलं. त्यामुळे प्रथम त्यांनी तरुणांच्या मनात विश्वास निर्माण केला.
तरुणांना संगणकाचं ज्ञान देण्याचं काम केलं. तसंच ‘काम भरपूर, पण दाम नाही’ अशा अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी एक युक्ती लढवली. तरुणांची बायोडेटा प्रोफाईल तयार करण्यात आला. तो बायोडेटा Nokari.com या वेबसाईटवर अपलोड केला आहे.
जेणेकरून त्यांना योग्य काम मिळू शकेल.
आता राहिला तो प्रश्न लहान विद्यार्थ्यांचा. त्यांच्या गावात केवळ एकच शाळा आणि दोनच शिक्षक त्यामुळे प्राथमिक शिक्षणाचीही बोंब आहे. परंतु तिथल्या शिक्षकांनी या ‘समन्वय’ टीमला सहकार्य करायचं ठरवलं. विद्यार्थ्यांना इंग्रजी, संगणक आदी महत्त्वाचे विषय शिकवणं गरजेचं आहे.
कारण उद्याच्या भविष्यासाठी तेच फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे समन्वय दर रविवारी पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक संगणक ज्ञान, कम्युनिकेशन इंग्लिश, दैनंदिन व्यवहारातील गोष्टी शिकवतात. तर पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना पथनाटय़, नाटक यांचा आधार घेत बोधपर गोष्टी सांगितल्या जातात.
यामुळे अक्षर ओळख, अंक ओळख, आकलन क्षमता वाढीस लागते. हे शिकण्यासाठी विद्यार्थ्यांचा सहभागही जास्त असतो. जवळपास ९९ टक्के विद्यार्थी या वर्गाना उपस्थित राहतात. दिवसेंदिवस विद्यार्थीसंख्या वाढत असल्याचे समन्वयातील एका स्वयंसेवकाने सांगितले.
या आदिवासी पाडय़ातील अविनाश नावाच्या तरुणाने पदवीपर्यंत शिक्षण घेतलं होतं. परंतु मध्यंतरी त्याला मानेचा आजार झाल्याने घरीच होता. परंतु समन्वय टीमने त्याला धीर दिला, पाठिंबा दिला, प्रोत्साहन दिले. त्याची ही व्यथा त्यांनी फेसबुकवर मांडली.
त्याला प्रतिसाद म्हणून एका फॅक्टरी मालकाने त्याच्याशी संपर्क साधला आणि अविनाशला कामावर रुजू करण्याचे मान्य केले. समन्वयने आतापर्यंत केलेली सर्व कामे त्यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केली आहेत, त्यामुळे त्यांना अनेकांनी मदत केली. बुलढाण्यामधील एका नागरिकाने त्यांना खेळण्याचे साहित्य, स्टेशनरी साहित्य, रोख पैसे अशी मदत केली.
आता या समन्वयमध्ये एकूण १५ तरुण आहेत. त्यातील काही महर्षी दयानंद महाविद्यालयातील, साठय़े महाविद्यालयातील, तर सलाम बॉम्बे फाऊंडेशनमधील काही मित्र परिवार या समन्वयमध्ये सामील झाले आहेत. तर काही लेक्चरर, लॅब असिस्टंट असे शिक्षित तरुणही यात समाविष्ट आहेत.
संपर्क- अक्षय वणे, ९९८७६५१२९४

Comments

Popular Posts