अंग झिम्माड झालं..
शनिवार-रविवार तुफान पाऊस पडला. या पावसाची मजा लुटण्याचा मोह कोणाला आवरणार नाही. कोणी वरळी सी-फेस किंवा मरिन ड्राईव्हला धाव घेतली तर कोणी चक्क माथेरान-लोणावळा गाठलं. कोणी नियोजन केलं तर कोणी घरी बसून खिडकीतून पाऊस बघण्यातच धन्यता मानली. काहीही असो शनिवार-रविवारी प्रत्येकानेच पावसाचा मनमुराद आनंद लुटला. अचानक प्लान्स करून पावसात झिम्माड केलेल्या मित्र-मैत्रिणींनी ही मजा आमच्यासोबत शेअर केली.

तरुणांसाठी तर हा पावसाळा वेगळाच जिव्हाळ्याचा विषय असतो. नुकतंच कॉलेज सुरू झालेलं असतं, त्यामुळे सुट्टीच्या काळात शरीराला आणि मनाला लागलेली मरगळ पावसाच्या सरींनी कुठे गायबच होऊन जाते. मात्र अकरावी आणि तेरावीच्या अजूनही प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याने पावसापासून आपल्या बॅगेतले डॉक्युमेंट्स सांभाळत ते देखील पावसाळा एन्जॉय करताना दिसतात.
कँटीनमध्ये घोळक्यामध्ये बसून चहाचा सूर्र्र लावणे आणि गरमा गरम भजीचा आस्वाद घेणे म्हणजे व्वा.. अजून काय पाहिजे यार, असंच वाटतं ना. त्यातच ट्रेकिंगला जाण्याची मजा पावसाळ्यात काही औरच असते. थोडंसं असंरक्षित पण काळजी घेत ट्रेकिंग केलं तर पावसाचा आनंदही लुटता येतोच की. अगदीच ट्रेकिंगची भीती वाटणारे तरुण वळतात धबधबा किंवा रिसॉर्टकडे.
सरलेला रविवार हा जून महिन्यातला शेवटचा रविवार होता. त्यात शनिवारही सुट्टी असल्याने अनेकांनी योजना आखल्या होत्या. त्यात बरसणा-या सरींमुळे काहींनी अचानक प्लान्स केले आणि हा वीकेंड साजरा केला. त्याचे अपडेट्स सोशल साईट्सवर पडतच होते.
फोटो, स्टेटसवरून तरुणांचा पाऊस अधिक बहरायला लागला. अजूनही बहरतोय. बाहेर पाऊस पडतो ना पडतो तोच स्टेटस अपटेड झालेच पाहिजे. त्यात प्रत्येक ग्रुपमधल्या एका अवलियाकडे तरी डीएसएलआर कॅमेरा असतोच. त्यामुळे रेनी फोटोशूटला काही औरच मजा येते. या वीकेंडला कोणी कशी मज्जा केली हे जाणून घेण्याचा प्रयत्न दै. ‘प्रहार’नेही केला, चला तर मग जाणून घेऊया तरुणांच्या वीकेंडचा पाऊस.
नरिमन पॉइंटला फूल टू धमाल
आम्ही शाळेतले मित्र केव्हापासून भेटायचे प्लान्स करत होतो. मात्र वेळच मिळत नव्हता. अखेर पावसाळा सुरू झाला आणि प्रत्येकाला फिरायचे वेध लागले. आमचा प्लान सत्यात उतरला आणि भेटलो. मुंबईकरांची जान असलेला समुद्रकिनारा म्हणजे नरिमन पॉइंट. पावसाळ्यात तिथे तुफान गर्दी असते. त्याचप्रमाणे आम्ही पण तिथे गेलो होतो. एवढय़ा दिवसांनी शाळेतल्या मित्र-मैत्रिणींना भेटलेलो, त्यामुळे एक वेगळाच उत्साह होता. त्यात रविवारी प्रचंड पाऊस होता. कोसळणा-या प्रत्येक थेंबाचा आम्ही आनंद घेत होतो. हा वीकेंड जाम भारीच होता.
- स्वप्नील साळुंखे
- स्वप्नील साळुंखे
कॉलेज कट्टा अनुभवला
माझं कॉलेज नुकतंच संपलं. त्यामुळे पावसातल्या कॉलेजच्या आठवणी अशाच जाग्या ठेवण्यासाठी आम्ही पुन्हा आमचा क्लास भरवला. कॉलेजच्या बाहेर रविवारी एकत्र भेटलो आणि भिजण्यासाठी एकच धूम ठोकली. सुट्टीच्या काळात दुरावलेलो आम्ही पुन्हा एकदा एकत्र आलो. जुने दिवस आठवत रविवार कसा गेला ते कळलंच नाही, मात्र वीकेंडच्या या पावसाने आमच्या मैत्रीला पुन्हा एकदा ओलावा मिळाला.
- स्वप्नाली सरफरे
- स्वप्नाली सरफरे
वाढदिवस भर पावसात
शनिवारी माझा वाढदिवस होता. मुसळधार पाऊस असल्याने सेलिब्रेशन होईल की नाही यात शंका होती. मात्र सरप्राईज देणार नाहीत ते मित्र कसले. अचानक सगळ्यांनी प्लान केला आणि गार्डनमध्ये भेटायला बोलावलं. भर पावसात माझ्या वाढदिवसाचा केक कापला गेला. हा क्षण अविस्मरणीय होता. त्यानंतर आम्ही पावसात त्या गार्डनमध्ये खूप खेळलो, पावसात भिजलो. मजा आली.
- नरेश शिंदे
- नरेश शिंदे
ट्रेकिंगचं नियोजन
मी एक गिर्यारोहक आहे. त्यामुळे पावसाळा माझ्यासाठी खासच असतो. मी वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये ट्रेक केले आहे. पावसाळ्यासाठी खास योजना विविध ग्रुप्सकडून केल्या जातात. म्हणजे जून महिन्यात पुढच्या तीन महिन्यांचं नियोजन केलं जातं. आजकाल सोशल मीडियावर असे अनेक ग्रुप्स पाहायला मिळतात. त्यामुळे आवडेल त्या ग्रुपशी संपर्क साधायचा आणि त्यांना जॉईन व्हायचं. त्यामुळे नव्या ओळखीही होतात आणि नव नवे भाग पाहायलाही मिळतात. जूनचा शेवटचा आठवडा अशाच गोष्टींचं प्लािनग करण्यात गेला, त्यामुळे येणारा जुलै महिना आमच्या गिर्यारोहकांसाठी निश्चितच चांगला जाईल.
- संपदा बांदेकर, गिर्यारोहक
- संपदा बांदेकर, गिर्यारोहक
कविताप्रेमींशी भेट
पाऊस म्हटलं की कविता आणि पावसातली कविता म्हटलं की आठवतात ते संदीप खरे. मी एक चित्रकार असल्याने विवध लोकांचे चित्र काढत असतो. त्याचप्रमाणे संदीप खरे सरांचंही मी चित्र काढलं होतं. त्यातच रविवारी त्यांना भेटण्याची संधी मिळाली. हा क्षण अविस्मरणीय होता. ‘‘तकलुफ बरतरफ, मुझसे मेरी तस्वीर अच्छी है’’ हाच शेर गुलजार सरांनी संदीप सरांना दिला होता आणि मी काढलेल्या चित्रावर सही करताना त्यांनी तोच शेर लिहिला. आता जाम भारी वाटतंय. हा पावसाळा आणखी मस्त जाणार यात काही शंका नाही.
- अभिजीत मुरुडकर, व्यंगचित्रकार
- अभिजीत मुरुडकर, व्यंगचित्रकार
फुटबॉलची मजा लोणावळ्यात
पावसाळा म्हटला की मजा- मस्ती आलीच. शनिवारी सकाळपासूनच पाऊस सुरू होता. आजकाल काय व्हॉट्सअॅप हातात असल्यामुळे काही ठरवायचं असलं की वेळ लागत नाही. पटापट एसएमएस केले आणि आम्ही लोणावळ्याला जायचं ठरवलं. झालं ठरलं आणि लगेच ठरवलं. लोणावळ्याला तिथे आम्ही टायगर हिलला गेलो. धुकं आणि पावसाची सांगड, काय धमाल आली. तिथे आम्ही भर पावसात फुटबॉल खेळलो आणि पोटाची खळगी भरून काढण्यासाठी गरमा गरम वडापाव आणि चहावर ताव मारला. खूप मजा आली.
- बिपीन झरेकर
- बिपीन झरेकर
माथेरानमध्ये फेरफटका
माथेरान म्हणजे एव्हरग्रीन ठिकाण, जिथे प्रत्येकाला जायला आवडतं. त्यातच पावसाळ्यात माथेरान म्हणजे जणू स्वर्गच असतो. त्यामुळे रविवारी आम्ही माथेरानची ट्रीप केली. पावसामुळे या ट्रीपला चार चाँद लागले यात काही शंका नाही.
- सुरज सिंग
- सुरज सिंग
वरळी सी-फेसवर तुफान मस्ती
शनिवारी पावसाने मस्त जोर धरलेला. रविवारीही असाच पाऊस पडेल असं वाटलं होतं. त्यामुळे रविवारी कुठे तरी फिरायला जावं असं वाटत होतं. रविवारीही पाऊस मस्त होता, त्यामुळे माझ्या क्लासच्या मित्र- मैत्रिणींसोबत अचानक वरळी सी-फेसला जायचा प्लान ठरला. समुद्रकिना-यावर पावसाची मज्जा काही औरच असते. त्यामुळे हा लास्ट वीकेंड एकदम भारी होता.
- आदेश आगरे
- आदेश आगरे
Comments
Post a Comment