सण कलेचा अन् उत्साहाचा

आपल्या महाराष्ट्राला कलेचा वारसा लाभला आहे. त्यात आपले सणवारही अगदी जोषात साजरे केले जातात. आजची पिढी आपले कलागुण दाखविण्यासाठी याच सणांचा आधार घेते. त्यामुळे तरुणांना मिळालेलं हे सणांचं व्यासपीठ त्यांच्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे जाणून घेऊ या.
PADWAआजच्या पिढीला परंपरेचं काहीच सोयरसुतक राहिलेलं नाही, त्यांना आपल्या रूढी-परंपरांविषयी काहीच माहीत नाही, अशी ओरड काहीशी प्रत्येक घराघरांतून ऐकायला मिळत असते. परंतु सगळेच जण या गटात मोडणारे असतात असं नाही.
पूर्वापार चालत आलेल्या परंपरेचा इतिहास जरी माहीत नसला तरी त्यातून जर सामाजिक प्रबोधन होत असेल, इतरांना फायदा होत असेल तर त्या परंपरांना खतपाणी आजच्या तरुण पिढीकडून घातलं जातं यात काही शंका नाही. महाविद्यालयात जाणारे किंवा नुकतंच कॉलेज संपून नोकरीला लागलेल्या तरुणांचा यात सहभाग असतो.
रोज सकाळी १० वाजता उठणारा हा तरुणवर्ग गुढीपाडव्याला मात्र पहाटे ५ वाजताच उठून प्रभात फेरीला निघतो. या गुढीपाडव्याचं आणखी महत्त्व म्हणजे या काळात तरुणांना आणि इतर वयोगटातील वर्गाला त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासही मदत होते.
चालत्या प्रभात फेरीत रांगोळी काढणे, पथनाटय सादर करणे, ढोल-ताशांचा गजर, लेझिमच्या तालावर नाचणे आदी कला आपल्याला पाहायला मिळतात. त्याचशिवाय अनेक मंडळे विविध उपक्रम, कार्यक्रम राबवत असतात. तर काही जण विविध स्पर्धाचं आयोजन करतात.
त्यामुळे परंपरा जपताना त्यातून कला साध्य होत असेल, सामाजिक प्रबोधन होत असेल तर तरुण मुलं नेहमीच पुढे येत असतात हेच यातून दिसून येतं. चला तर पाहू या गुढीपाडव्याला आपल्या विविध कलागुणांना वाव देणारे तरुण कसे सहभागी होतात ते.
सोशल मीडियावर पाऊस आजकाल सर्वकाही सोशल मीडियावर शेअर करण्याची जणू रितच पडली आहे.
त्यामुळे आपला इव्हेंट क्रिएट करून इतरांना त्यात इंटरेस्टेड करण्यात येतं. आपल्या परिसरातील कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा याकरता या सोशल मीडियाचा वापर केला जातो.
लोकांना इनव्हाईट करण्याची ही नवी पद्धत तरुणांमध्ये लोकप्रिय होत चालली आहे. त्याचसोबत ही रॅली संपते ना संपते, लगेच सोशल मीडियावर सेल्फी, ग्रुफीचा पाऊस सुरू होतो. अनेक हॅशटॅग वापरत, फिलिंग शेअर करत, हटके काहीतरी स्टेटस ठेवून सोशल मीडियावर हे फोटो पसरू लागतात.
अभ्यासाला बुट्टी
शेवटच्या वर्षात असणारे, अभियांत्रिकी शिक्षण घेणारे, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची या काळात परीक्षा असते; परंतु आपल्या मराठी मातीचा सण साजरा करण्यासाठी सारेच जण उत्सुक असतात. परीक्षेचा अभ्यास काय नंतरही करता येईल; परंतु आताची मजा नंतर नाही मिळणार अशी भावना काही विद्यार्थ्यांची असते.
त्यातही कल्पकतेचा अभ्यास करणारे विद्यार्थी तर अशा रॅली, प्रभात फे-यांना तर आवर्जून उपस्थित राहतात. त्यामुळे परीक्षा आहे म्हणून अभ्यासू किडा बनून घरी बसणं या काळात विचार केला तरी शक्य नाही असं काहींनी सांगितलं.
गर्ल्स बाईकरायडर्स
पूर्वी रस्त्यावरून भरधाव वेगाने मुलीची बाईक बाजूने गेली तर नजरा लगेचच मागे वळायच्या. परंतु आता ही परिस्थिती राहिली नाही. मुंबईच्या रस्त्यांवर सर्रास आपल्याला गर्ल्स बाईकरायडर्स दिसतील. परंतु जर अगदी आपल्या मराठमोळ्या पेहरावात जर कोणी बुलेट, रॉयल एनफिल्ड चालवताना दिसलं तर नक्कीच नवल वाटेल ना.
मुंबई, ठाणे, डोंबिवलीसारख्या अस्सल मराठमोळ्या विभागात या गर्ल्स बाईकरायडर्स आपल्याला नक्कीच सापडतील. केसाच्या भांगापासून ते पायाच्या पैंजणापर्यंत या सुरेख दिसतात. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या बाईकरायडर्सची जागा आता महिलांनी घेतली असल्याने या पाडव्याला तरुणींची रॅली नक्कीच निघणार.
GUDHI PADWAवेशभूषा
पहाटे लवकर उठून थोर, राजे-महाराजे यांचा पोषाख परिधान करून लोक येथे येतात. फॅन्सी ड्रेसचा उत्साह तर सगळ्यांनाच असतो; परंतु अशा पारंपरिक कार्यक्रमांना काहीतरी हटके करण्याचा मानस प्रत्येकालाच असतो. त्यामुळे प्रभात फेरीला जाण्यासाठी अगदी मध्यरात्रीपासूनच वेशभूषेची तयारी केली जाते.
कोणी लोकमान्य टिळक, कोणी शिवाजी महाराज, कोणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर असा पोषाख परिधान करतात. काही जण तर त्या व्यक्तींनी दिलेल्या संदेशाचे फलकही हातात घेऊन उभे राहिलेले दिसतात.
ठिकठिकाणचा गुढीपाडवा
गिरणगावचा पट्टा म्हणजे सणवारांचं माहेरघर. त्यामुळे नववर्षाचे स्वागत करण्यासाठी याठिकाणी जय्यत तयारी केली जाते. साहजिकच आपले धडाडीचे युवा कार्यकर्ते यात असतातच.
मुंबईतील गिरगाव, भायखळा, लालबाग, परळ, दादर, बोरिवली, चुनाभट्टी, भाईंदर, मुलुंड याठिकाणी पाडवा उत्साहात साजरा केला जातो; परंतु थोडं मुंबईच्या बाहेर गेलात की ठाणे, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर व त्यापुढील पट्टय़ातही अगदी उत्साहात हा सण साजरा केला जातो.
डोंबिवलीचं गेट टुगेदर
श्री गणेश मंदिर संस्थान यांच्यातर्फे गुढीपाडवा प्रभात फेरीचं आयोजन केलं जातं. संपूर्ण डोंबिवलीकर यात सहभागी होतात. परंतु खरा उत्साह असतो तरुणांमध्ये. कारण रांगोळ्या काढण्यापासून ते ढोल-ताशांच्या गजरात लेझिमच्या तालावर नाचण्यापर्यंतचा तरुणांचा उत्साह पाहण्याजोगा असतो.
श्री गणेश मंदिर संस्थान यांच्यातर्फे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरता अनेक स्पर्धाचे आयोजनही करण्यात येते. तरुणांचा सहभाग अशा कार्यक्रमांना मिळावा हाच हेतू बहुदा यामागचा असावा.
आमच्या सगळ्या मित्रांचा गुढीपाडवा हा खास दिवस असतो. परंपरा जपण्याचा हा सर्वात उत्तम मार्ग आहे असं मला वाटतं. त्यामुळे एकत्र येऊन जल्लोष साजरा करणं, कार्यक्रमात कुठेही बीभत्सपणा न करणं याचीही दक्षता आमच्याकडून घेतली जाते. या सणांमुळे पारंपरिक वेशभूषा करून मिरवायलाही मिळतं. आजकाल सेल्फीची क्रेझ वाढल्याने पारंपरिक पोषाखाला जरा जास्तच डिमांड आलंय.
- सोहम नारकर, अभियांत्रिक विद्यार्थी
धडपड एका क्लिकसाठी
फोटोग्राफी हा माझा छंद. बीएमएम करत असल्याने या छंदाशी आणखी जवळीक वाढली. एका परफेक्ट क्लिकसाठी सारेच फोटोग्राफर पाडव्याच्या फेरीला हजेरी लावतात. परंतु एक परफेक्ट क्लिक मिळावा ज्यामुळे आपल्याला इतरांकडून वाह.. मिळेल.
या दिवशी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यामुळे भरपूर फोटो काढायला वाव असतो. अनेक सीनियर्स फोटोग्राफर्सही येथे येत असल्याने त्यांच्याकडून अनेक टिप्स मिळतात. त्यामुळे माझ्यासाठी गुढीपाडवा म्हणजे शिकण्याचा दिवस असंच मी मानते.
- निकिता मुरकर, बी. एम. एम. विद्यार्थी
आजी-आजोबांकडून प्रेरणा
पूर्वी मी पाडव्याच्या रॅलीला जायचे नाही. गेल्यावर्षी मी पहिल्यांदाच गेली. तिकडचं वातावरण मोहून टाकणारं होतं. त्यातही एवढय़ा उतार वयातही वयोवृद्धांना जो काही उत्साह येतो तो शब्दांत सांगणं अशक्य आहे. मुलूंडची फेरी चिंतामणी देशमुख गार्डन ते संभाजी गार्डन अशी फिरत जाते.
या फेरी दरम्यान विविध कार्यक्रम होत असतात. लेझिम, ढोल-ताशा पथक यांच्याकडे पाहून तर आणखी हुरूप येतो. अनेक तरुण राजे-महाराजे यांचा पोषाख परिधान करून येतात. त्यामुळे काही मिनिटांसाठी त्या काळातच गेल्याचा फील येतो. मस्तपैकी पारंपरिक पोषाख करून रॅलीच्या येथे मिरवणं म्हणजे एक करमणूकच असते.
- मनाली ठाकूर, मुलुंड, सी.एस. विद्यार्थी

Comments

Popular Posts