फेस्टिव्हल्समागचे खरे चेहरे

फेस्टिव्हल्समागचे खरे चेहरे

वर्षाच्या शेवटचा आणि सुरुवातीचा महिना म्हणजे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीचा फेस्टचा महिना असतो. फेस्ट म्हणजे कॉलेज फेस्टिव्हल सुरळीत व्हावा यासाठी विविध टीम तयार केल्या जातात. त्यात महत्त्वाची असणारी टीम म्हणजे पब्लिक रिलेशन (पीआर) अर्थात जनसंपर्क पाहणारी टीम. आपल्या फेस्टला जास्तीत जास्त प्रसिद्धी देण्याचे काम ही टीम करत असते.
Blackberry-Malhar-Festival-2013थंडीचा ऋतू सुरू झाला की कॉलेजिअन्सच्या आयुष्यात सुरू होतो तो फेस्टचा ऋतू. लेक्चर संपल्यावर, ऑफ लेक्चरमध्ये आणि आवडते प्रोफेसर असले तर ऑन लेक्चरही गप्पा रंगतात त्या आपल्या महाविद्यालयातील फेस्टच्या. आपला फेस्ट जास्तीत जास्त कॉलेजांपर्यंत पोहोचावा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, जास्तीत जास्त स्पॉन्सर्स मिळावेत, थीम हटके असावी, स्पर्धेत रंगत यावी याकरिता नेहमीच चढाओढ दिसते. कट्टय़ावरच्या गप्पा रंगतात त्या आता फेस्टच्या थीमसाठीच आणि फिरणे होतं ते स्पॉन्सर्सशिपसाठी. जेवढे स्पॉन्सर्स जास्त तेवढी तयारी जय्यत आणि तेवढीच प्रसिद्धीही. सहजच फेसबुक, ट्विटर उघडलं तरी वेगवेगळ्या विषयांना हॅशटॅग देऊन फेस्टबाबतची माहिती अनेकांना पोहोचवली जाते.
महाविद्यालयात प्रत्याक्षात फेस्ट जरी नियोजित वेळेत होणार असला तरी सोशल मीडियावर मात्र फेस्टची इत्थंभूत माहिती रोज अपडेट होत राहते. फेस्टच्या मार्केटिंगचा सोप्पा फंडा म्हणजे मीडिया. मग तो सोशल मीडिया असो, प्रिंट मीडिया वा इलेक्ट्रॉनिक मीडिया. फेस्टची तयारी कशी चालू आहे, कोणते-कोणते कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत याची माहिती कार्यक्रमाच्या आधी तर कार्यक्रम संपन्न झाल्यावर फेस्ट कसा झाला, किती प्रतिसाद मिळाला? फेस्टमधील गंमत याबद्दलची माहिती वर्तमानपत्रात देण्याची जबाबदारी पीआर टीममधल्या विद्यार्थ्यांची असते.
आपला फेस्ट उत्तम व्हावा, नियोजित व्हावा, व्यवस्थापन चोख असावे याकरता फेस्टचे विभाजन वेगवेगळ्या गटात केले जाते. विद्यार्थीही आपली जबाबदारी अगदी चोख पाळत असतात. त्यात अति महत्त्वाचं आणि फेस्टला प्रसिद्धी देणारं पद म्हणजे पब्लिक रिलेशन (पीआर)चे. आपला फेस्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याकरिता पीआर झालेले विद्यार्थी जीवाचे रान करतात.
प्रत्येक मीडियाशी सबंधित असलेल्या व्यक्तींना भेटायचे, त्यांना आपल्या कार्यक्रमाविषयी सांगायचं काम त्यांचं असतं. त्यामुळे साहजिकच त्यांचा जनसंपर्क मोठा असणे गरजेचे असते. त्याचशिवाय ‘थंड डोकं आणि जिभेवर साखर’ या म्हणीचा पुरेपूर वापर येथे करावा लागतो. अनेक महाविद्यालयात बीएमएमचे शिक्षण दिले जाते. बीएमएमचे विद्यार्थी मुख्यत्वे पब्लिक रिलेशनसारख्या व्यवसायाचा विचार करत असतात, त्यामुळे त्यांच्यासाठी फेस्टमध्ये पीआर म्हणून काम करायला मिळणे म्हणजे सुवर्णसंधीच असते. त्यामुळे त्यांना स्वत:च्या ‘उद्या’चा शोध घेता येतो.
पीआर विद्यार्थी हा मुख्यत्वे महाविद्यालयाचा प्रतिनिधी म्हणूनच काम पाहत असतो. लोकांपर्यंत पोहोचणारी कोणतीही माहिती ही पीआरमार्फत जात असते, त्यामुळे आपल्या फेस्टबद्दलची संपूर्ण व खरी माहिती बाहेर जावी यासाठी पीआर मेहनत घेत असतात. एखादी बातमी मीडियाला द्यायची असेल तर ती बातमी छापून येईपर्यंत संबंधित लोकांशी संपर्कात राहणे, त्यांच्याशी गोड बोलत आपलं काम करून घेणं महत्त्वाचं असतं. महाविद्यालयीन काळातच अशा गोष्टींचे प्रशिक्षण मिळणे महत्त्वाचे असते. पीआरसाठी लागणारे महत्त्वाचे कौशल्य म्हणजे संवादकौशल्य.
संवादकौशल्य उत्तम असेल तर आपल्या फेस्टविषयी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते. आपला कार्यक्रम इतरांच्या कार्यक्रमांपेक्षा किती वेगळा आहे हे इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या कार्यक्रमासोबतच इतरांच्या कार्यक्रमाचीही तेवढीच माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे. फेस्टिव्हलदरम्यान अनेक खेळांचे, स्पर्धाचे आयोजन करण्यात येते. त्या खेळांची, स्पर्धेची माहिती, नियम समजून घेऊन थोडक्यात सांगण्याची जबाबदारी पीआर टीमची असते. फेस्टमध्ये येणा-या प्रमुख पाहुण्यांपासून ते त्यांच्या व्यवस्थेपर्यंतची तयारी कधीकधी पीआरलाच करावी लागते. कार्यक्रमासाठी जे प्रमुख पाहुणे निश्चित करतात त्यांच्या वेळा सांभाळण्यापासूनचे सर्व कामही पीआरलाच करावी लागतात.
पीआर टीम कॉलेजचा चेहरा
पीआरची टीम मुख्यत्वे महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करते. त्यामुळे आम्हाला फेस्टबद्दल नेहमी सतर्क राहणे भाग आहे. आपला कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची टीम वेगवेगळ्या मीडिया लोकांशी भेटत असते. त्यातून स्पॉन्सर्सशिप मिळते, मोफत प्रसिद्धी मिळते; पण मीडिया पार्टनर नसेल तर आम्हाला अजून मेहनत करावी लागते. त्यासाठी संवादकौशल्य आणि एखाद्याला आपला कार्यक्रम समजावून सांगण्याची कला अंगी असली पाहिजे.
- अनुराधा नवलकर, महर्षी दयानंद महाविद्यालय
भाषाकौशल्य पाहिजे
कार्यक्रमादरम्यान महाविद्यालयात येणा-या प्रत्येक विद्यार्थ्यांला कार्यक्रमांविषयी समजावणे, त्यात होणा-या खेळांविषयी माहिती देणे महत्त्वाचे असते. त्यातही विविध महाविद्यालयातून येणारे विद्यार्थी विविध भाषा जाणणारे असतात, त्यामुळे त्यांना त्यांच्या भाषेत समजावून सांगण्यासाठी आपल्याला ती भाषा ज्ञात असणे गरजेचे आहे. जानेवारीमध्ये आमचा ‘टेक्नोझोन’ हा फेस्ट होणार आहे, त्याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. स्पॉन्सर्सना जाऊन भेटण्यापासून ते कार्यक्रमाच्या नियोजनापर्यंतची सर्व जबाबदारी माझी आहे.
- दीप्ती कोटियन, एसएनडीटी महाविद्यालय
वर्तमानपत्रांशी जवळून संबंध
सोशल मीडियावर फेस्टची माहिती प्रसिद्ध होत असली तरी वृत्तपत्रासारख्या प्रसिद्धीमाध्यमातून आपला कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्याची क्रेझ असते. त्यात कॉलेजवयात नियोजित केलेल्या फेस्टची बातमी वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाल्यावरची मजा काही औरच असते. त्यामुळे पीआरचे पद सांभाळताना विविध माध्यमांशी संबंधित असणा-या लोकांशी आम्हाला संपर्क करावा लागतो. आजकाल प्रत्येक ठिकाणी महाविद्यालयीन वार्ताहर असल्याने वृत्तपत्रातल्या प्रसिद्धीची सोय सोपी झाली आहे.
- ऋषीकेश बामणे, चेतना महाविद्यालय

Comments

Popular Posts