तरुणाईचं ‘बाप्पा’ कनेक्शन

तरुणाईचं ‘बाप्पा’ कनेक्शन

दिवसभर कोलाहल अंगावर वागवणारी, रात्री शांत असणारी मुंबई आता काही दिवस अगदी मध्यरात्रीही गजबजलेली दिसेल. जिथे तिथे असेल रोषणाई, गाणी, जल्लोष आणि उत्साह. अर्थात हा सर्व गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद सोहळा आहे आणि हा उत्साह वाढवण्यामागे सगळ्यात मोठा हात असतो तो तरुणाईचा. बाप्पा येणार म्हटल्यावर काही महिने आधीपासूनच तरुणांच्या अंगात जोश संचारतो.
dholमुंबईतल्या अनेक गणपती मंडळांमध्ये आता उत्साहाचं वातावरण आहे. या आनंदोत्सवातला आणि उत्साहामधला सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे तरुणाई. गेल्या वर्षीपेक्षा यंदाचा गणेशोत्सव कसा दणक्यात साजरा होईल यासाठी या तरुण मित्रमंडळींचे आटोकाट प्रयत्न चालू असतात. मग गणपती उत्सव साजरा कसा करायचा यावर चर्चा झडतात. नियोजनाचे बेत आखल्यावर सजावटीची तयारी सुरू होते. मग अगदी बाप्पाची मूर्ती घडवण्यापासून ते मंडप सजावटीपर्यंत आणि बाप्पाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत सारेच कामाला लागतात. या सर्व कामांची दोरी तरुण मुलांच्याच तर हाती असते. कारण उत्सवाचं प्रत्येक कार्य बिनधास्तपणे व निर्विघ्न पार पाडण्याची प्रचंड ऊर्जा या तरुणांच्या अंगी असते. मोठय़ांकडून शिकत आणि आपली कल्पकता कामाला लावत ही तरुणाई मग मंडळाच्या कामांमध्ये गुंतून जाते. बाप्पाची सेवा करण्यासाठी त्यांच्यात जणू चढाओढच लागते. गणपतीचा सण मग वैयक्तिक स्वरूपातला घरातला असो किंवा बाहेरचा सार्वजनिक मंडळाचा, तरुणांचा सहभाग त्यात असणारच. गणपतीवरच्या प्रेमापोटीच गणपतीच्या मंडपात रात्रभर काम करत, येणा-या भक्तांना तरुण सहकार्य करत असतात.
मूर्ती घडवण्यापासून या सहभागाची सुरुवात होते. बाप्पाची आकर्षक सुबक मूर्ती बनवण्यासाठी तरुण मंडळीचा नेहमीच उत्साहपूर्ण हातभार असतो. या मूर्ती बनवताना निरनिराळ्या प्रक्रिया कराव्या लागतात. त्यासाठी भरपूर लोकांची गरज लागते. अशावेळेस अनेक गणपती बनवणा-या वर्कशॉप्सना या तरुण मंडळीची मदत मिळते. आजकाल संपूर्ण हिरेजडीत गणपतीही उपलब्ध आहेत, त्यामुळे मूर्त्यांवर कोरीव काम करण्यापासून ते असे हिरे बाप्पावर चढवण्यापर्यंतच्या सर्व कलाकुसरीच्या कामांमध्ये तरुण मंडळी हल्ली रस दाखवू लागली आहे. त्यातून त्यांच्या कलेलाही वाव मिळतो वा बाप्पाची मूर्ती घडवल्याचे समाधानही मिळते. रंगकाम, फायनल टच यांसारख्या गोष्टींसाठीही ते सहकार्य करतात. मूर्ती विलोभनीय व सुंदर दिसावी यासाठी तरुण मुलं कार्यशाळांमध्ये धडपडताना दिसतात. कॉलेजमधील प्रोजेक्ट असाईनमेंट करताना त्यांना जेवढा आनंद होत नाही तेवढा आनंद तरुणांना अशा मूर्ती घडवताना होत असतो. खास तरुणांसाठी हल्ली अशा कार्यशाळा घेतल्या जातात, ज्यामुळे खूप हुरूप येतो असं एका कार्यशाळेत भाग घेऊन स्वत:च्या घरासाठी गणेशमूर्ती बनवणा-या स्वप्नाली धाबुगडे हिनं सांगितले.
गेल्या दोन आठवडय़ांपासून सार्वजनिक गणपती मंडळांच्या मंडपांमध्ये गणपतीचे आगमन होत आहे. हा आगमन सोहळाही अविस्मरणीय व्हावा यासाठी मंडळाकडून खास काळजी घेतली जाते. अशा वेळेस डीजे तर असतातच; पण ढोल-ताशांच्या तालावर तरुणही नाचताना दिसतात. हेच ढोल-ताशे वाजवण्याचं काम देखील तरुण मंडळीच करतात. अशी अनेक पथकं सध्या मुंबईसारख्या शहरात उपलब्ध आहेत. त्याचशिवाय तरुण मुलांसोबतच तरुणीसुद्धा अशा ढोल-ताशांच्या पथकात काम करताना दिसतात. गणपती मिरवणुकांच्या निमित्ताने तरुणाईच्या कलेला प्रशस्त व्यासपीठ मिळते. अनेक मंडळातर्फे गणपती उत्सवामध्ये स्पर्धा व कार्यक्रम घेतले जातात, ज्यामध्ये तरुणांचा सहभाग मोठय़ा संख्येने असतो.
दिवसभर कॉलेजबाहेर टवाळक्या करणारी तरुण मंडळी या दिवसात मात्र शिस्तीने मुकाट बाप्पाच्या मंडपात काम करताना दिसतात. आजची तरुण पिढी नास्तिक झाल्याची ओरड अशावेळेस खोटी वाटू लागते. कारण रात्रभर गणपतीच्या सेवेसाठी बाहेर राहून परत दिवसभर कॉलेज किंवा काम सांभाळून या तरुणांच्या चेह-यावर दमल्याचा, थकल्याचा अजिबात लवलेशही नसतो. अशावेळेस विचार येतो एवढी ऊर्जा कुठून बरे येत असेल यांच्यात? तहान-भूक विसरून गणपतीचा मंडपच त्यांच्यासाठी दहा दिवसाचं घर होऊन जातं. काहींशी बोलताना असं जाणवलं या बाप्पासाठी काही जण खास सुट्टीही काढतात. गेल्या काही वर्षभरात गणपतीच्या दर्शनासाठी बाहेर पडणा-यांची संख्या वाढली आहे; शिवाय रात्रीच्या वेळी बाहेर पडणारे भक्तगणही जास्त आहेत. ज्यामध्ये बहुसंख्या तरुण मंडळी असतात. काही मंडळामध्ये बाप्पाच्या सजावटीसोबतच चलचित्र देखाव्याचेही आयोजन केले जाते, तेव्हा अशा गणपती मंडपात प्रचंड गर्दी होते, मग अशावेळेस येणा-या भक्तांना कोणतीही अडचण होऊ नये म्हणून हीच तरुण मंडळी स्वयंसेवकाचं काम करतात.
परीक्षेसाठी आदल्या दिवशी जागे राहून अभ्यास करणारी ही तरुण मंडळी मात्र अशा वेळेस १०-१० दिवस झोपतही नाही. रात्र रात्रभर जागून मंडपाची सजावट केली जाते. आपल्या मंडपाचं डेकोरेशन कसं सरस होईल, गेल्या वर्षीपेक्षा बाप्पा कसा छान दिसेल याचे नियोजन केले जाते. काही ठिकाणी यासाठी काही इव्हेंट मॅनेजमेंटची टीमही योजली जाते. आजही काही मंडळात हायटेक देखावे दिसतात. त्यासाठी प्रचंड मेहनत व बुद्धी ही तरुणांचीच असते. मग विषय निवडण्यापासून ते तो लोकांसमोर मांडण्यापर्यंत सा-या गोष्टींसाठी तरुणाई पुढे असते.
काही महाविद्यालयांतून खास स्वयंसेवकांचे गट बनवले जातात. जास्त गर्दीच्या ठिकाणी लोकांना सहकार्य करण्यासाठी महाविद्यालयांतून विशेष पुढाकार घेतला जातो. रस्त्यावरील ट्रॅफिक पोलिसांना सहकार्य करण्यासाठी हे विद्यार्थी पुढाकार घेतात. गेल्यावर्षी परळच्या महर्षी दयानंद महाविद्यालयाच्या एनएनएस युनिटच्या विभागाने लालबागसारख्या गजबजलेल्या ठिकाणी जाऊन स्वयंसेवकाचे काम केले होते, त्यामुळे अनेक भक्तांना त्यांचा फायदा झाला. तसंच हे विद्यार्थी गणपती आगमन व विसर्जनाच्या मिरवणुकांमध्ये देखील आवर्जून मदत करतात.
सध्या प्रत्येक गोष्टीसाठी सोशल मीडियाचा वापर केला जातो. त्यामुळे आपल्या मंडळाचे सोशल मीडियाद्वारे प्रमोशन करण्यासाठी ही तरुण मंडळी नेहमीच पुढे असतात. अनेक मंडळाचे फेसबुक पेज आहेत. त्याद्वारे या दहा दिवसातल्या प्रत्येक गोष्टी या पेजवर शेअर होताना दिसतात. या काळात सर्वात मोठा फायदा होतो तो तरुण छायाचित्रकारांना. त्यांच्यामार्फत विविध गणपतींचे फोटो काढून ते सोशल मीडियावर अपलोड केले जातात. त्यामुळे आपण घरी बसूनही शहरातल्या अनेक गणपतींचे दर्शन घेऊ शकतो. मंडपात होणा-या प्रत्येक कार्यक्रमाविषयीची माहिती सोशल मीडियावर दिली जाते. ही माहिती सतत सोशल मीडियावर अपलोड करण्यासाठी सोशल मीडियामध्ये रस असणा-या काही खास तरुण मंडळीची नियुक्ती केली जाते. यातूनही अनेक तरुणांना शिकायला मिळते.
प्रसिद्ध मंडळांच्या मंडपात दिवसरात्र गर्दी असते. त्यामुळे भक्तांना सहकार्य करण्यासाठी ही तरुण मंडळी स्वयंसेवकाचे काम करत असतात. अशा मोक्याच्या वातावरणात आंबटशौकीनांचीही काही कमी नसते; पण या स्वयंसेवकांमुळे त्यांना चांगलीच चपराक बसते. एकंदरीतच तरुणांमधला हा उत्साह बघण्याजोगा असतो.
दिवसभर कॉलेज किंवा ऑफिस सांभाळून रात्री पुन्हा बाप्पाच्या सेवेसाठी हजर राहत असल्यावर या तरुणांच्या आरोग्यावर काही परिणाम होत नसेल का? त्यांना थकवा येत नसेल का? परंतु हे करताना त्यांचा बाप्पाच त्यांना बळ देतो असं काही तरुणांनी सांगितले. भक्तिमय वातावरणात आपल्याला असलेले दु:ख आपण विसरून जातो, शिवाय पुढच्या आयुष्यातील प्रवासासाठी हे अनुभव उपयोगाला येतात. या उत्साहामागचं तरुणांचं नेमकं कारण काय असतं असं काही आम्ही काही तरुणांना विचारले, त्यावर त्यांनी दिलेल्या या काही प्रतिक्रिया पाहूया.
मित्रांमध्ये हिरोगिरीची भावना
एखाद्या मोठय़ा गणपतीच्या मंडपात स्वयंसेवकाचं काम करतोय असं म्हटल्यावर मित्रांच्या नजरेत लगेच आपला मान वाढतो. मग थेट दर्शन घेण्यासाठी भरपूर विनवण्या येतात. त्यामुळे त्यांच्या नजरेत आपण एकदम हिरोच होऊन जातो. त्याचशिवाय बाप्पाची सेवा केल्यामुळे मनात समाधानही मिळते. या काळात सर्वत्र रोषणाई, आतिषबाजी असल्याने थकायला होत नाही. - महेश जांभळे, विद्यार्थी
सेवेमुळे मिळतं समाधान
दिवसभर मी कॉलेजमध्ये असतो. या काळात असाईनमेंट्स, प्रोजेक्ट्स खूप असतात, त्यामुळे दिवसभर प्रोजेक्ट्सची कामं करून थकायला होतं; पण रात्री बाप्पाच्या मंडपात जायचं असा विचार मनात आला की सगळा थकवा गायब होऊन अंगात जोश येतो व हातातील कामं बाजूला पटकून उरकून आम्ही बाप्पाजवळ जातो. यातच आम्हाला भरपूर समाधान मिळते. - आकाश कुळये, विद्यार्थी
लहानपणीची आवड जोपासतो
मला लहानपणापासून मूर्ती घडवण्याची आवड होती. त्यामुळे आमच्या शेजारच्या वर्कशॉपमध्ये जाऊन मी मूर्तिकारांना मदत करत असतो. त्यातून ते मला त्यांच्या पद्धतीने मानधनही देतात. पण कोणतीही अपेक्षा न करता मला तिथे काम करायला आवडतं शिवाय अनेक नानाविध गोष्टी मला शिकायला मिळतात. त्याचशिवाय कोरीव काम, रंगकाम या गोष्टी मला अगदी सर्रास करायला जमतात. बाप्पाच्या मूर्तीची कलाकुसर केल्यामुळे सजावट नक्की काय असते ते मला समजलंय. - राहुल आडविलकर, विद्यार्थी
जनसेवा हीच ईश्वरसेवा
बाप्पाची सेवा करायला मला फारसं आवडत नाही. फक्त दिवसातून एकदाच देवाची मनापासून प्रार्थना करतो. पण जनसेवा म्हणजेच ईश्वरसेवा हे मला मान्य असल्यामुळे मला भक्तांची सेवा करायला आवडते. त्यामुळे आमच्या मंडपात येणा-या भक्तांना काही कमी पडत नाही ना? त्यांची गैरसोय होत नाही ना याची मी खबरदारी घेत असतो, आणि यातच मला समाधान मिळतं. बाप्पांच्या भक्तांची सेवा केल्याने मी बाप्पाच्या अगदी जवळ गेलोय असा मला भास होतो. – प्रवीण कदम, विद्यार्थी

Comments

Popular Posts