संकल्प ‘मनाशी’
संकल्प ‘मनाशी’
आपण अनेक संकल्प करतो, पण ते अपूर्ण राहतात. आपल्याला छंद असतात, पण ते जोपासण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो. हे असं का घडतं ? कारण आपण आपल्या मनाशी प्रतारणा करतो. त्यावर उपाय काय हा पेच आपल्यासमोर आहे.

विदेशी दौरे करत असतानाही मराठी लेखनावर आणि भाषेवर असलेलं प्रभुत्व वाचून मला नेहमीच वीणा पाटील यांचा अभिमान वाटत आलाय. वाचता वाचता एक लेख वाचनात आला ‘मनोल्लंघन.’ यात त्यांनी असं सांगितलं आहे की, एखादी गोष्ट कार्यसिद्धीस न्यायची असेल तर त्यासाठी मनोल्लंघन होणं गरजेचं असतं.
कारण आपण वर्षभरात अनेक संकल्प करतो. पण संकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेलं मनोल्लंघन करण्यास कोणीही तयार नसतं. त्यामुळे त्यात खंड पडतो आणि तो संकल्प तिथेच संपतो. मुळात हे संकल्प तोडण्यासाठीच असतात की काय असा माझा भ्रम आहे, असो.
मनोल्लंघन करायचं म्हणजे नक्की काय करायचं असं तुम्ही विचाराल. मनोल्लंघन म्हणजे जे आपण मानत आलो आहोत ते तसंच सुरू ठेवणं बंद करायचं. म्हणजे एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर त्यासाठी तशी आपली मानसिकता तयार करणं गरजेचं आहे.
वैद्यकीय शिक्षण घेत असलेला विपुल म्हणतो की, ‘मला नृत्याची फार आवड आहे, पण अभ्यासाच्या ताणात नृत्य करायला वेळच मिळत नाही.’ याउलट अभ्यासाचा ताण असेल तर खुशाल नाचावं. काय हरकत आहे? मनसोक्त नाचल्याने आपला ताणही कमी होतो. त्यामुळे विपुलने आपली आवड जोपासलीच पाहिजे.
म्हणतात ना, आवड असली की सवड मिळतेच म्हणून. तसंच एखादी संकल्पना जोपासायची असेल तर त्याआधी आपली तशी मानसिकता करून घेणं गरजेचं आहे. कारण एखादं कार्य सिद्धीस न्यायचं असेल तर ते त्यासाठी त्याचा ध्यास असणं गरजेचं असतं.
नववर्षाच्या चाहुलीला तर अनेक असे संकल्प करणारे दिसतात. या वर्षी मी रोजनिशी लिहिणार यापासून ते यावर्षीपासून मी खोटं बोलणार नाही इथपर्यंत. मराठी नववर्षाच्या दिवशीही अनेकांकडून नवे संकल्प केले जातात. परंतु ते किती पूर्णत्वास गेले का हे त्यांनाच ठाऊक, असो. मनोल्लंघनासाठी आपल्या मनाची तयारी करावी लागते, जे सहसा जमत नाही.
एखादा छंद जोपासायचा म्हटला तरी सर्वात मोठा अडसर येतो तो वेळेचा. त्यामुळे वेळेचं व्यवस्थापन करणं फार महत्त्वाचं आहे. आपण आपल्या कामासाठी चौकट तयार केलेली असते. त्या चौकटीत आपण फक्त नेहमीचंच आयुष्य बांधलेलं असतं.
एखादा छंद जोपासायचा म्हटला तरी सर्वात मोठा अडसर येतो तो वेळेचा. त्यामुळे वेळेचं व्यवस्थापन करणं फार महत्त्वाचं आहे. आपण आपल्या कामासाठी चौकट तयार केलेली असते. त्या चौकटीत आपण फक्त नेहमीचंच आयुष्य बांधलेलं असतं.
आपला छंद वा आपली इच्छा, संकल्प यांना दुय्यम स्थान देतो. त्यामुळे साचेबद्ध जीवनात त्या आपल्या छंदाला कमी प्रमाणात वेळ दिला जातो. जर या साचेबद्ध टाईमटेबलमध्ये स्वत:च्या छंदाला थोडाफार वेळ दिला तर स्वत:साठीही वेळ निघाल्याचं समाधान आपल्याला मिळेल.
पण वरीलप्रमाणे कोणीही अशा प्रकारे मन वळवायला तयार नसतं. इतरांप्रमाणेच स्वत:लाही वेळ देणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यासाठी वीणा पाटील म्हणतात तसं ‘मनोल्लंघन’ होणं गरजेचं आहे.
स्वत:ला स्पेस हवी असं जेव्हा वाटेल तेव्हा सगळ्यांपासून दूर जाऊन कुठेतरी अभयारण्यात बसण्याची गरज नसते. गरज असते ती फक्त आपल्या माणसांमध्ये राहून ठरवलेल्या वेळेत थोडासा बदल करून उरलेल्या वेळेत आपलं जग जगण्याची. त्यासाठी मनाची तयारीही असावी लागते.
कारण आपण असे कित्येक बघतो जे स्वत:ला स्पेस मिळावा म्हणून काही वेळ काढतात, परंतु आपण स्वत:चाच का विचार करावा असं म्हणत पुन्हा स्वत:पासून दूर होतात. असं करणं थांबवलं पाहिजे. घरात राबणारी गृहिणी असो, अभ्यासात रमणारा विद्यार्थी असो, ऑफिसला जाणारा तरुण असो किंवा रिटार्यमेंट घेऊन घरी बसलेले वृद्ध असो, स्वत:ची स्पेस प्रत्येकाने जपली पाहिजे. त्यातूनच आपण आपल्याला उमगत असतो.
Comments
Post a Comment