लायब्ररी

लायब्ररी

एक वास्तू माझ्या-तुमच्या, सगळ्यांच्या कॉलेजमध्ये आहे. आपण येता-जाता ती नेहमीच बघतो. कोणती ही वास्तू?आठवतं का? ही आहे आपल्याच कॉलेजमधली लायब्ररी. बरेच दिवस इथे तुमची पावलं फिरकली नसतील तर चला एक फेरफटका मारू.
Medlibraryकॉलेजातली लायब्ररी.. एका कोप-यातली.. शांत शांत. जिथे पाऊल टाकताना तिथल्या शांततेचा दबदबा वाटतो. जरा कुठे खुट्ट आवाज झाला की सर्व कोप-यांमध्ये अचूक नजर ठेवून असणा-या लायब्ररीयनची नजर आपल्याकडेच असेल म्हणून आपल्याला तिथे भीती वाटते. अर्थात त्यांची भीती वाटते म्हणून नाही पण एकूणच लायब्ररीत जाण्याची फारशी हौस नसल्यामुळे आपण तिथे फिरकत नाही. कधी कधी लेक्चरला बंक मारून टाईमपास म्हणून लायब्ररीत जाऊन पुस्तकं चाळण्याची हुक्की येते पण तिथे ग्रुपने जाऊन गप्पा मारता येत नाहीत, मग अशा खेपा कमीच होतात. लायब्ररीची आठवण सर्वानाच हमखास परीक्षेच्या वेळी येते.
निवांत अभ्यास करण्यासाठी कॉलेजातले सर्व कट्टे भरून जातात तेव्हा लायब्ररीत जागेची शोधाशोध सुरू होते. इथल्या शांततेत आणि मित्रमैत्रिणींच्या बरोबर अभ्यासाला एक वेगळीच लय येते. खरं तर इथली पुस्तकं आयुष्य समृद्ध करणारी असतात. आता मात्र एका क्लिकवर मिळणा-या माहितीकडे कल वाढला असून कॉलेजातली लायब्ररी विस्मृतीत जातेय की काय हा प्रश्न निर्माण झाला आहे. आजकाल विद्यार्थ्यांना ई-लायब्ररी मोबाईलवर उपलब्ध असते. पण काहीही असो.. ख-या लायब्ररीची सर कोणालाच येणार नाही. याचं कारण तिथलं वातावरण. मन लावून अभ्यास करण्याची स्फूर्ती देणारी जागा म्हणजे कॉलेजातली लायब्ररी. ‘अभ्यासू’ प्रकारात मोडणा-या मुलांचं जणू दुसरं घर. आपल्या महाविद्यालयीन अभ्यासक्रमातील नोट्सपासून ते साहित्यविश्वातील प्रसिद्ध पुस्तकं, वृत्तपत्रे, साप्ताहिके, पाक्षिक, मासिके, नियतकालिके, अनियतकालिके, दिवाळी अंक आदी सर्व आपल्या कॉलेज लायब्ररीमध्ये उपलब्ध असतात. परंतु हल्लीचे विद्यार्थी इंटरनेटवर जास्त विसंबून राहात असल्यामुळे लायब्ररी आता सुनीसुनी वाटते.
चुकला फकीर मशिदीत सापडतो त्याप्रमाणे परीक्षेच्या काळात चुकला विद्यार्थी सापडण्याची हमखास जागा म्हणजे लायब्ररी! कधी कोणाचा डोळा चुकवायचा असेल तर विद्यार्थी मुद्दामहून लायब्ररीत जाऊन बसतात. अभ्यास करताना संदर्भासाठी लागणारी पुस्तकेही इथे असतात, परंतु इंटरनेटनं आपल्याला एवढं आळशी बनवलं आहे की सर्च इंजिनमध्ये आपल्याला हवा असलेला शब्द टाकला तर त्याच्याशी संबंधित लाखो वेबसाईटस् मिळतात. मग का बरं संदर्भाची एवढी जड पुस्तके वाचायची? असा विचार करणारे विद्यार्थी लायब्ररीकडे फिरकत नाहीत.
आपण, थ्री इडियटस्, टू स्टेट्स, कुछ कुछ होता है, मोहब्बते अशा चित्रपटांमध्ये कॉलेज लायब्ररी पाहिली असेल. पुस्तकांनी भरगच्च लायब्ररी, त्यात प्रेमीयुगुल डोळ्यांनी बोलताहेत किंवा एखादं कॉलेज जीवनातलं रोमँटिक गाणं असं काहीसं चित्र तुमच्या मनात लायब्ररीविषयी असेल. या फिल्मी लायब्र-या पडद्यावर पाहायला मजा वाटते. पण तुमच्या स्वत:च्या कॉलेजच्या लायब्ररीतही जरा डोकावून पाहा की! आजची तरुणाईही खूप वाचते, लिहिते असं म्हणतात. पण हे वाचणं केवळ ऑनलाईन रीडिंग आहे किंवा ऑनलाईन विकत घेतलेलं पुस्तक असतं. त्यामुळे भरगच्च वाटणारी कॉलेज लायब्ररी आता काहीशी ओस पडलेली दिसते. काही महाविद्यालयात तर आपली नजरही पुरणार नाही एवढय़ा लांबचलांब लायब्ररी आहेत, जिथे गेल्यावर हे पुस्तक घेऊ की ते घेऊ असा विचार पडतो.
पूर्वी परीक्षेच्या काळात तर लायब्ररीमध्ये बसण्यासाठी रांगा लागत असत. बसायला जागा मिळणार नाही या विचारानेच विद्यार्थ्यांना सकाळी लवकर जाग यायची, त्यातही आपल्याला हवं असलेलं पुस्तक जर कोणी घेतलं तर परीक्षा संपेपर्यंत आपल्या हातात येणार नाही या कल्पनेनं बिचारे विद्यार्थी सकाळीच कॉलेजची पायरी चढत असत. शिवाय गेल्या वर्षीच्या नोट्स, गेल्या वर्षीचे पेपर्स हे सारं लायब्ररीत उपलब्ध असल्याने त्यासाठीही विद्यार्थ्यांची रांग लागायची. आणि हो.. आजही हे सर्व अभ्यास साहित्य तुमच्या कॉलेजच्या लायब्ररीत देखील उपलब्ध आहे बरं!
लायब्ररी हे दुसरं घर वाटतं त्यामुळे तिथले ग्रंथपाल म्हणजे लायब्ररीयन सुद्धा अगदी घरचेच वाटतात. प्रत्येक वर्षात शिकणा-या विद्यार्थ्यांवर यांची बारीक नजर असते. आताशा मुलांना आपला ग्रंथपाल कोण आहे याची देखील जाणीव नसते. कोणत्या चित्रपटाचं शूटिंग असेल किंवा प्रश्नपत्रिका लायब्ररीत मिळत आहेत अशी अफवा उठली तरच आपण लायब्ररीचा रस्ता धरतो, नाही तर ती वाट मात्र विद्यार्थ्यांची वाट पाहतच उभी राहते. इंटरनेटवर सर्व पुस्तके उपलब्ध असली तरी कधीतरी त्या लायब्ररीत जाऊन बघा, माहीत नसलेली पण वाचावीशी वाटतील अशा पुस्तकांशीही तुमची भेट होईल. केवळ परीक्षा आलीय म्हणून जाऊ नका, तर आपल्याच कॉलेजचा हा एक भाग तुमच्या किती मदतीचा ठरू शकतो हे अनुभवण्यासाठी लायब्ररीची रोज एक खेप माराच. इथेच वाचन, संग्रह, लिखाणासारख्या चांगल्या सवयी लागतील. आणि तुमच्या येण्या-जाण्यामुळे थोडीशी अडगळीत पडलेली कॉलेजची लायब्ररी पुन्हा एकदा हॅपनिंग होईल!

Comments

Popular Posts