थेंबे थेंबे घागर भरे
थेंबे थेंबे घागर भरे
दुष्काळावर मात करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. त्यात तरुणानींही सहभाग घेतला. संदेश लालगे आणि त्याचे सहकारी मित्र मुंबईत लोकांकडून पाणी जमा करतात आणि टँकरद्वारे बीड, लातूर अशा पाण्याची टंचाई असलेल्या गावात पुरवतात.

मात्र शेतक-यांची ही अवस्था केवळ पाण्याच्या अभावाने म्हणजेच पाऊस कमी होण्याचा परिणामांमुळे झाली आहे. मग त्यांना कपडे, पैसे देण्यात काय अर्थ? कोरडय़ा दुष्काळाने होरपळणा-या लोकांना पाण्याचीच मदत केली तर! संदेश लालगे आणि त्याच्या सहका-यांनी ही संकल्पना उचलून धरली आणि शहरभर फिरून लोकांकडून पाण्याची मदत मागू लागले.
दुष्काळाविरोधात लढायचं असेल तर सर्वानी एकत्र येणं गरजेचं आहे. त्यासाठी त्यांना मदत करणं गरजेचं आहे. मग या लोकांना कशा प्रकारे मदत करता येईल, असा प्रश्न गोरेगावमध्ये राहणारे राजेश गंगार यांच्या मनात आला.
त्यांनी त्यांची ही शंका दया शंकर विश्वकर्मा या तरुणासमोर मांडली. त्यालाही नेमकं काय करावं हे कळलं नाही, त्याने त्याचा मोर्चा संदेश लालगे या त्याच्या मित्राकडे वळवला. संदेश लालगे, निर्मला निकेतनमध्ये महाविद्यालयात शिकतोय. त्याने विचार मांडला की आपण दुष्काळग्रस्त लोकांसाठी पाण्याचीच सोय करू या.
संपूर्ण राज्यभर पाण्याचा तुटवडा आहे. मात्र मुंबईत ब-या प्रमाणात पाणी नागरिकांना मिळतंय. प्रत्येकाने आपल्या वाटणीतलं निदान एक लिटर पाणी दिलं तरी दुष्काळग्रत शेतक-यांना त्याचा फायदा होईल. कारण रोज पैसे देऊन पाणी विकत घेणं त्यांना परवडणारं नाही.
संदेशची ही कल्पना सगळ्यांनाच आवडली. त्यांनी ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. संदेश लालगे, दयाशंकर विश्वकर्मा आणि विशाल बिरादार यांनी इतर इच्छुक मित्रांना हाताशी धरून त्यांची एक टीम तयार केली.
हे तरुण गोरेगाव पश्चिम या भागात फिरून नागरिकांकडून पाणी मागू लागले. नागरिकांनाही त्यांची ही कल्पना आवडली. प्रत्येक जण आपापल्या परीने पाणी देत होते. कोणी १ लिटर तर कोणी १० लिटर. बीड, लातूरसारख्या गावात पाण्याची कमतरता असल्याने टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागते.
गावक-यांचा पैसा या पाण्यातच वाया जातो. नाहीतर घरातला महिला वर्ग लांब दूर कोसाहून एका हंडय़ासाठीही वणवण करताना दिसतो. उन्हातान्हात जाऊन डोईवर घागर, कळशी ठेऊन पाणी आणणं काही सोपं काम नाही. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. त्यांच्यासाठी पाणी पुरवणं गरजेचं आहे.
अवकाळी पावसामुळे शेतीचंही नुकसान झालं आहे, त्यातच कर्जाचा भडीमार, त्यात ही पाण्याची मारामार असल्याने शेतकरी पूर्ण हवालदिल झाला आहे, त्यांना मदत व्हावी म्हणून संदेश आणि त्याच्या सहका-यांनी उचललेलं हे पाऊल फार मोलाचं आहे. मुंबई आणि इतर शहरातील नागरिकांनी जर असेच उपक्रम राबविले तर राज्यातील हा दुष्काळ नक्कीच कमी होईल.
‘निर्मल निकेतन’ या महाविद्यालयातून त्यांचा अनुभव मुंबई म्हणून प्रकल्प सुरू आहे. ही सारी समाजसेवा या प्रकल्पाअंतर्गतच केली जाते, असं संदेश म्हणाला. एकूण ६ महाविद्यालयांतील ६० ते ८० विद्यार्थी या कार्यात सहभागी असल्याचंही त्याने सांगितलं. आजवर त्यांनी जवळपास ५ ते ६ लाख नागरिकांना तृप्त केलं आहे.
मुंबईहून पाणी लातूर, बीड येथे नेलं जातं. त्यासाठी त्यांना स्थानिक पुढा-यांचा पाठिंबा असल्याचंही संदेश म्हणाला. आता त्यांचे ६ टँकर बीडला तर १ टँकर लातूरला पाण्याची सेवा देतंय.
तरुणांचं हे कार्य इतरांना तर आवडलंच आहे; परंतु त्यांनी ज्या गावांना मदत केली आहे त्या गावातही त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. त्यांनी गावक-यांसोबत सभादेखील आयोजित केली होती. पाणी हे भूतलावरचं सर्वात महत्त्वाचं मानलं जातं.
तिसरं महायुद्ध झालं तर ते पाण्यासाठीच होईल असंही म्हटलं जातं. मग अशावेळेस समाजाची भावी ओळख असणा-या तरुणांनी जर समजूतदारीनं पाऊल उचललं तर नक्कीच राज्यातील दुष्काळामुळे होरपळणारा शेतकरी सुखाने जगू शकेल.
Comments
Post a Comment