व्यक्त होण्याआधी...
व्यक्त होण्याआधी..
सध्या गाजतं तन्मय भट्टचं प्रकरण लक्षात घेता अभिव्यक्ती स्वातंत्र्य पुन्हा एकदा चर्चेत आलं. सोशल मीडियाचा वापर करून तरुणाई बिनधास्त व्यक्त होते, मात्र हे व्यक्त होणं जर कोणाच्या बदनामीचं कारण ठरत असेल? तर मात्र आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याचं तरुणाई सांगते. या तरुणाईला खरंच स्वातंत्र्याची नव्याने ओळख करून देणं गरजेचं आहे?

आजच्या तरुणाईला नेमकं अभिव्यक्ती स्वातंत्र म्हणजे मोकळं रान वाटतं. आपल्या मनाला वाटेल ते, हवं तसं बोलण्याचं स्वातंत्र म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र का? आपल्याला बोलायला स्वातंत्र आहे, विचार करायला स्वातंत्र आहे, आपलं मत मांडण्याचंही स्वातंत्र आहे. मात्र आपल्या बोलण्यातून, कृतीतून कोणत्याही वाईट आणि चुकीच्या गोष्टींना खतपाणी न मिळणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. आजचा तरुण पटकन एखाद्या गोष्टीवर व्यक्त होतो. एखाद्या विषयावर आपली ठामपणे बाजू मांडतो. त्या बातमीसाठी एखादा स्टँड घेतो. त्यातही सोशल मीडियाचा या गोष्टीत अधिक वापर केला जातो. सध्या सोशल मीडियावरचे ट्रेंड लगेच प्रसिद्ध होतात.
लगोलग इकडची पोस्ट तिकडे फॉरवर्ड केली जाते. त्यातील मजकूर, आशय हे समजून न घेता केवळ विनोद किंवा वेळखाऊ गोष्ट म्हणून आपण शेअर करतो. मात्र या गोष्टी शेअर करताना आपणही भान राखलं पाहिजे की जर असे विनोद किंवा मजकूर जेव्हा थोरा-मोठय़ा व्यक्तींविषयी असतील तर त्यावर विनोद करण्याची आपली पात्रता आहे का? लेख, व्यंगचित्र, चित्र आदी माध्यमांचा वापर करत एखाद्याला बदनाम करता येतं. मात्र आपल्या कलेचा असा वापर करणं हे केव्हावी अयोग्यच आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याची अंमलबजावणी कोणावरही अन्याय होऊ नये, प्रत्येकाने बोललं पाहिजे, मतं मांडली पाहिजेत यासाठी करण्यात आली आहे. मात्र गेल्या काही वर्षापासून या कायद्याचा तरुणांकडून गैरवापर केलेला दिसतो. आपल्या करमणुकीसाठी आपण इतरांचं नाव खराब करता कामा नये. आजच्या तरुणांच्या मते अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या काय हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न.
व्यक्त व्हा पण जपून
सोशल मीडियाचा वापर अधिक होत असल्याने त्यावर आपल्याला लक्ष ठेवायला कोणी नाही, एक उत्तम पोस्ट केली की क्षणार्धात शेकडो लाईक्स मिळतात, हा समज तरुणांमध्ये बळावत चालल्याने असे प्रकार घडतात. मुळात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या आजच्या तरुणाईला उमगली नसावी. आपण व्यक्त व्हावं, मतंही मांडावीत पण त्यामुळे कोणाचाही अनादर होता कामा नये. – अक्षय चौघुले, सीए विद्यार्थी
चुकीचा संदेश न पोहोचणे
तरुणाई फक्त वरवरचा विचार करताना दिसते. केवळ आपल्याला हक्क आहे म्हणून आपण बरळत जाणं योग्य नाही. आपण कोणाविषयी बोलतोय याचाही विचार करायला हवा. जर आपण एखाद्या व्यक्तीला बदनाम करत असू तर ते कसलं स्वातंत्र आलं? कोणत्याही माध्यमात बोलताना, व्यक्त होताना विचार करणं गरजेचं आहे. आपण आपलं मत व्यक्त करताना त्यातून एखादा चुकीचा संदेश तर जात नाही ना, याचाही विचार करायला हवा. - श्रद्धा सावंत, विद्यार्थी
कायद्याची गळचेपी
तरुणाईला व्यक्त व्हावं हे मलाही पटतं मात्र तन्मय भट्ट प्रकारावरून हे फ्रिडम ऑफ स्पिच आहे की फ्रिडम ऑफ शेम आहे हेच कळत नाही. जर असे प्रकार वरचेवर घडत राहिले तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या पूर्णपणे बदलून जाईल. त्यापेक्षा न्यायपालिकेने आतापासूनच काहीतरी यावर गाईडलाईन्स देणे गरजेचं आहे. - अभिजीत मुरुडकर, व्यंगचित्रकार
कलेचा वापर जपून
जर आपण व्यक्त होत असू तेव्हा आपला दृष्टिकोन स्वच्छ हवा. मत मांडण्याआधी त्या विषयाची सखोल माहिती असणं गरजेचं आहे. त्यातही जर ती गोष्ट देशातल्या प्रतिष्ठित लोकांच्या संबंधातली असेल तर मत मांडण्याआधी किंवा व्यक्त होण्याआधी दोन्ही बाजूंचा विचार व्हायला हवा. केवळ आपल्याकडे असलेल्या कलेचा वापर करत मग लेखन, व्यंगचित्र यांमार्फत आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली बदनाम करणं हे केव्हाही अयोग्यच आहे. - प्रियंका रक्ते, विद्यार्थी
Comments
Post a Comment