सेवाव्रती तरुणाई

अभ्यासातून वेळ काढून कॉलेजमधील धम्माल, मजामस्ती बाजूला ठेवून दुस-यांसाठी जगणारी तरुणाईही गेल्या काही वर्षापासून आपल्याला पाहायला मिळते आहे. आपल्याला मिळणा-या पॉकेटमनीमधले पैसे साठवून गरजू लोकांसाठी ही मुलं राबताना दिसतात. कधी आपली कला सादर करून पैसे मिळवून तर कधी पार्ट टाईम जॉब करून ही तरुणाई पैसे गोळा करते आणि समाजातल्या गरजूंना मदतीचा हात पुढे करते.
seva2तरुण पिढीचे आदर्श पाहायला गेलं तर त्यांच्या तोंडी नेहमीच सिनेमाची गाणी व वागण्यात एक प्रकारचा बेधुंदपणा आढळतो. जो वयानुसार तसा स्वाभाविकच असतो. मात्र याच तरुणांच्या डोक्यात समाजासाठी आपण काही केलं पाहिजे असेही विचार घोळत असतात. काही तरुण मुलं या विचारांना प्रत्यक्ष रूप देण्यासाठी धडपडतात.
अगदी निरपेक्ष मनाने महाविद्यालयीन तरुण-तरुणी समाजातील गरजू घटकांना मदत करण्यासाठी पुढे सरसावतात. त्यावेळी त्यांना ना त्यांच्या पॉकेटमनीची तमा असते ना त्यांच्या फावल्या वेळातल्या टाईमपासची. अनेक कॉलेजांमधून देखील विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या समाजसेवेची सवय जडावी यासाठी प्रयत्न केले जातात.
तर कधी स्वत: तरुणच स्वत:हून अशा लोकांपर्यंत जाऊन पोहोचतात. त्याकामी काही समाजसेवी संस्थांची मदत देखील त्यांना मिळते. तरुणांना सामाजिक बांधिलकी जपण्याविषयी फार काही कळत नाही असं म्हणणा-यांसाठी पुढील काही उदाहरणं खूप काही सांगून जातील.
मैत्रीचा हात गरिबांसाठी
आपल्या मैत्रीचा उपयोग समाजसेवेसाठी व्हावा यासाठी एकत्र आलेले दोन मित्र म्हणजे श्रीकांत आणि चेतन. गेल्या दोन वर्षापासून हे तरुण मरिन लाईन्स येथे असलेल्या गरीब मुलांसाठी विविध उपक्रम करतात. प्रत्येक सण त्यांच्यासोबत साजरा करतात. शिवाय आठवडय़ातून एकदा तरी त्यांच्या भेटीला जाऊन त्यांच्या अभ्यासाची उजळणी घेतात. खाऊ, कपडे, खेळणी या गोष्टी देऊन ते त्यांच्या आनंदात सहभागी होत असतात.
यातून त्यांना मानसिक समाधान मिळते असं ते सांगतात. शिवाय त्यांच्यासोबत वेळ घालवल्यावर आम्हाला आमच्या बालपणात गेल्याचा भास होतो. चेतन आणि श्रीकांत हे नुकतेच महाविद्यालयीन शिक्षण संपवून नोकरीला लागलेले तरुण आहेत. परंतु आपल्याला मिळणा-या पैशांचा थोडाफार तरी समाजातील लहान मुलांना उपयोग व्हावा यासाठी ते हे कार्य सदैव चालू ठेवणार असे सांगतात.
कलेचा वापर रुग्णांसाठी
आईला झालेल्या कॅन्सरवर उपचार करण्यासाठी सौरभ निंबकर के. ई. एम. रुग्णालयात गेला. त्याला तेथे गेल्यावर ब्लड कॅन्सर म्हणजे रक्ताच्या कर्करोगाशी सामना करणारी अनेक लहान मुले दिसली. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी अनेक संस्था असल्या तरी त्यांचे पैसे थेट रुग्णालयात जाऊन मग त्यानंतर त्यांच्यावर उपचार होत राहतात. परंतु रुग्णांसोबतच त्यांचे नातेवाईकही रुग्णालयात आलेले असतात. कधी अधिक पैशांची गरज भासल्यास त्यांना इतरांकडे पैसे मागावे लागतात. त्यांची हीच समस्या सौरभला समजली आणि त्याने यांना मदत म्हणून आपल्या कलेचा वापर करून घेतला.
सौरभ हा उत्तम गिटार वादक आहे. आपली कला सादर करून त्यातून मिळणा-या पैशांतून तो या गरीब रुग्णांना मदत करत असतो. सौरभ महाविद्यालयाच्या दुस-या वर्षात असल्यापासून लोकल ट्रेनमध्ये गिटार वाजवतो; परंतु तेव्हा तो फक्त करमणुकीसाठी वाजवत असे. आपल्या कलेचा वापर करून आपण कर्करोग पीडितांना मदत केली पाहिजे असा विचार त्याने त्याच्या आईसमोर मांडला आणि त्याच्या आईला ही कल्पना फार आवडली.
परंतु दुर्दैवाने सप्टेंबर २०१४ ला त्याची आई अनंतात विलीन झाली. त्यानंतर मात्र त्याने कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी काम करण्याचे निश्चित केले. म्हणून मे २०१५ पासून त्याने हा उपक्रम चालू केला. आता तो अंबरनाथ येथे एका फार्मास्युटिकल कंपनीत कामाला आहे. तो सध्या डोंबिवलीत राहतो. दादर ते अंबरनाथ असा रोज प्रवास करत तो गिटार वाजवताना दिसतो. मुंबईकरांना लोकल ट्रेन फार जवळची असल्याने त्यानेही लोकल ट्रेनचाच मार्ग स्वीकारला असं तो सांगतो.
त्याला प्रत्येक प्रवासात १००० रुपयांपर्यंत पैसे मिळतात. काही प्रवासी त्याचं हे गाणे अंतिम स्थानक येईपर्यंत ऐकत राहतात. त्यानंतरच प्रवासी त्याला पैसे देतात. तो कष्टाळू आणि सच्चा आहे हे समजल्यावरच प्रवासी त्याला पैसे देत असल्याने तोही प्रवाशांच्या सूचनेप्रमाणे त्यांचे ऐकतो. ही सगळी रक्कम तो ब्राईट फ्युचर असोसिएशन नावाच्या एका लहान संस्थेला देतो. ही संस्था ठाणे येथे असून या संस्थेमार्फत थेट रुग्णांच्या खात्यामध्ये पैसे जातात.
सध्या या संस्थेमार्फत एका लहान कर्करोग पीडित मुलीला मदत केली जात आहे. त्याच्या गिटार वादनाकडे आकर्षित होऊन अनेक प्रवासी त्याला पैसे देतात. त्या सर्व पैशांचा उपयोग तो या गरजू रुग्णांसाठी करतो.
पीडित शेतक-यांसाठी बनलं गाणं
असाच एक ग्रुप आहे रुपारेल कॉलेजच्या प्रणव हरिदासचा. प्रणव गायक तर आहेच, शिवाय तो संगीत दिग्दर्शनही करतो. स्वच्छता अभियानासाठी केंद्र सरकार व आकाशवाणीतर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेत त्याचं गाणं देशभरातून व मुंबई विभागातून प्रथम आलं. विशेष म्हणजे ते आपल्या मराठी भाषेतलं होतं. त्याच्या टीमने नुकतंच अजून एक गाणं आर्थिक संकटात सापडून आत्महत्या करणा-या शेतक-यांसाठी बनवलं आहे.
पाच मिनिटांचं हे गाणं सध्या नाईन एक्स झकास वाहिनीवर गाजतं आहे. या गाण्याचं संगीत संयोजन अनिकेत दामले यानं केलंय तर गीत लेखक चंद्रशेखर तेली आहे. मंदार आपटे याने ते गायलं आहे व संगीत दिग्दर्शन प्रणवनेच केलंय. आपण सर्व जण दिवाळी नेहमीच मोठय़ा आनंदात साजरी करतो, मात्र आत्महत्या केलेल्या शेतक-याच्या घरात अंधकार पसरलेला असतो.
अशा कुटुंबांना व शेतक-यांना समाजाने मदत केली पाहिजे असं आवाहन या गाण्यातून करण्यात आलंय. दिलासा फाऊंडेशन आणि नाईन एक्स झकास वाहिनीच्या सहयोगाने ते गाणं बनवण्यात आलं. शेतक-यांना या गाण्यातून प्रेरणा मिळेल असा विश्वास प्रणव व त्याच्या साथीदारांना वाटतोय. म्हणूनच त्यांनी स्वत:च्या खर्चाने हे गाणं तयार केलंय. शेतकरी आत्महत्यांचं सत्र थांबलं पाहिजे हीच भावना आजच्या या युवा पिढीची आहे हे त्यांच्या अशा प्रकारच्या प्रयत्नांतून दिसून येतं. प्रणवखेरीज ओंकार पाटील व राहुल खडे या तरुणांच्या ‘समीयन’ या बँडने अशाच प्रकारचं गाणं शेतक-यांना अर्पण केलं आहे.
महर्षी दयानंद महाविद्यालय
एमडी कॉलेजमधील एनएनएस युनिटमधील विद्यार्थीही अशा सेवाव्रती मुलांपैकीच एक. स्वप्नपूर्ती या ५ वर्षापूर्वी हाती घेतलेल्या प्रकल्पाअंतर्गत मूळ प्रवाहापासून दूर गेलेल्या पाच विद्यार्थ्यांना त्यांनी दत्तक घेतले आहे. शिवाय नुकतेच त्यांनी दिवाळीनिमित्त आदिवासी पाडय़ात जाऊन तेथील लहान मुलांसोबत दिवाळी साजरी केली. एनएनएस युनिटचे समन्वयक डॉ. अविनाश कारंडे यांनी सांगितले की, या आदिवासी पाडय़ात पूर्वी शिक्षणाचे प्रमाण फक्त ४० टक्के होते; परंतु आता मात्र युनिटच्या विद्यार्थ्यांच्यामार्फत तेथील मुलांना शिक्षणाची गोडी लावून ती संख्या ७० टक्क्यांवर गेली आहे.
एवढेच नाही तर नुकत्याच झालेल्या बालदिनानिमित्त या विद्यार्थ्यांनी सेंट ज्यूट या संस्थेबरोबर मिळून कार्यक्रम केलाय. ही ब्लड कॅन्सर पीडित रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मदत करणारी संस्था आहे. त्यांच्यासोबत या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एक प्रकल्प राबविला आहे. त्याअंतर्गत एनएनएस युनिटचे विद्यार्थी सोमवार ते गुरुवार सेंट ज्यूट या संस्थेला भेट देतात. तेथील मुलांना शिकवणी देतात. ही १ ते १० वर्षापर्यंतची मुले असून त्यांना उपचारासाठी घरापासून लांब राहावे लागते. विविध खेळ, गाणी, गोष्टी यात मुलांना रमवले जाते.

Comments

Popular Posts