पहिलेपणाची अपूर्वाई

पहिलेपणाची अपूर्वाई

आपल्या आयुष्यात अशा खूप गोष्टी असतात, ज्या नेहमीच लक्षात राहणा-या व कधीच न विसरणा-या असतात. त्या चांगल्या की वाईट कशाही असल्या तरीही आठवणींमध्ये मात्र अगदी नव्यासारख्या तरळत असतात. तारुण्याच्या काळात तर अशा अनेक स्मृती मनात जमा होत असतात. त्यातदेखील एखादी गोष्ट पहिल्यांदाच आयुष्यात घडत असेल तर त्याची अपूर्वाई वेगळीच असते.
universityआपलं आयुष्य अनेक गोष्टींच्या तुकडय़ा तुकडय़ांनी बनलेलं असतं. काहींना आयुष्यात कमी महत्त्व असतं किंवा त्या गोष्टी पुन्हा पुन्हा घडतातही; परंतु कोणत्याही बाबतीत पहिल्यांदाच घडलेल्या गोष्टीची मज्जाच वेगळी असते. आपल्याबाबत जीवनात प्रथमच एखादी गोष्ट घडत असेल तर त्याचा आनंदही वेगळा असतो, ना शब्दात मांडता येणारा ना मनमोकळेपणाने व्यक्त करता येणारा असा काहीसा.
शाळेत असताना खासकरून दहावीत असताना कित्येक विद्यार्थ्यांना घाई असते ती परीक्षा संपून कधी एकदाचं कॉलेज लाईफ सुरू होतंय. कारण आपल्या भावंडांकडून ऐकलेल्या गमती-जमती आपल्यालाही करायची इच्छा असते. त्यामुळे एकदा का महाविद्यालय सुरू झाले की आपण आकाशात उडणा-या पक्ष्याप्रमाणे स्वतंत्र असतो. कॉलेजमध्ये जाण्यासाठी विद्यार्थी उत्सुक असतो; पण कधी कधी कॉलेजच्या पहिल्याच दिवशी घडणारा प्रसंग हा इतका वेगळा असतो की त्याची आपण याआधी कधी कल्पनाही केलेली नसेल.
मला आठवतंय, माझं कॉलेज सुरू झाल्याच्या तिस-या दिवशी मी प्रथम कॉलेजमध्ये गेले, त्यामुळे साहजिकच वर्ग कोणता, कुठे बसायचं, कोणाशी बोलायचं काहीच माहीत नव्हतं. घरातून बाहेर पडताना ‘आई, मी कॉलेजला चालले गं!’असं जे मी आईला अभिमानाने सांगून निघाले होते, त्याचा सगळा चक्काचूर झाला असं मला वाटलं. कारण सोबत कोणी नव्हतं आणि कशाचीच माहिती नव्हती, त्यामुळे सारीच तारांबळ उडाली.
त्या भीतीमुळे मी माझ्या दादाला फोन केला आणि दादाला विचारणार तेवढय़ातच एका शिपाई मामाने पटकन माझा मोबाईल काढून घेतला, त्यामुळे मी दचकलेच! काय झाले मला कळलंच नाही, त्यामुळे मी त्यांना काही विचारणार याआधीच ते मला ओरडले ‘बाहेरची पाटी वाचता येत नाही का? भ्रमणध्वनीचा वापर करू नका.’ मी शिपाई मामांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला की माझा हा पहिलाच दिवस आहे.
मला नियम माहीत नव्हता, तरीही ते काही ऐकायला तयार नव्हते. तेव्हा मात्र माझे फुकटचे शंभर रुपये फाईन भरण्यात गेले. असा हा महाविद्यालयातला माझा पहिलाच दिवस! त्यामुळे आजही कधी कॉलेजमध्ये शिरताना प्रथम मोबाईल बॅगेत ठेवते, मग आत प्रवेश घेते.
काही गोष्टी कल्पनेच्या बाहेर असतात, म्हणूनच त्या अनपेक्षितपणे आयुष्यात घडल्या की कायमच्या लक्षात राहतात. परंतु काही गोष्टी अशा असतात की ज्या प्रत्यक्षात घडाव्यात याकरिता आपण अतोनात प्रयत्न करतो आणि त्या आपल्या डोळ्यांदेखत साध्य होतात. या गोष्टीचा जो आनंद असतो तो काही निराळाच! स्वप्न सत्यात उतरणं यापेक्षा अजून दुसरं काय हवं असतं? त्यातही ते स्वप्न आपण अगदी लहान वयापासून पाहत असू तर त्याचं फारच नवल वाटतं.
इयत्ता आठवीत असताना अथक प्रयत्नाने जेव्हा माझा परीक्षेत प्रथम क्रमांक आला होता तेव्हा मात्र मला आकाश ठेंगणं वाटू लागलेलं. कारण या क्षणाची वाट मी अगदी कळायला लागल्यापासून पाहत होते; पण अफाट स्पर्धेमुळे नेहमी मागे पडले.
पण जेव्हा आठवीत शाळेत प्रथम क्रमांक मिळवला तेव्हा मात्र माझा आत्मविश्वास वाढला आणि त्यानंतर तो पहिला क्रमांक मी दहावीपर्यंत टिकवला. पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर तर इतरांप्रमाणेच मित्र-मैत्रिणींचा ग्रुप, पहिलं लेक्चर, पहिलं बंक, पहिलं बक्षीस अशा अनेक आठवणींचा खजिना जमा होत गेला.
स्पर्धेच्या युगात जगताना अनेक वेळा पर्याय नेहमीच उपलब्ध असतातच असे नाही, हरलात की हरलात, मग पुन्हा प्रयत्नासाठी मार्ग नसतो. त्यामुळे जे कराल ते पहिल्याच फटक्यात साध्य झालं पाहिजे. असाही काही जण विचार करतात. अशा वेळी स्पर्धेमध्ये पहिल्याच बाजीत जिंकणं म्हणजे खूप काही कमवल्याचा आनंद व मेहनतीचं सार्थक असतं. त्यावेळचा आनंद जास्त असतो, कारण ते जिंकणं एका डावात जिंकलेलं असते. या स्पर्धा म्हणजे ‘नो चान्स अगेन’ या प्रकारातल्या असल्याने त्या पहिल्याच बाजीत जिंकाव्या लागतात.
आजकालची तरुणाई नेहमीच अशा प्रकारच्या स्पर्धेला सामोरी जात असते. त्यामुळे कॉलेजातली स्पर्धा असो वा नोकरीतली स्पर्धा, यातील पहिलेवहिले अनुभव नेहमीच लक्षात राहणारे असतात. नोकरीसाठीची मुलाखत हा प्रत्येकाच्या आयुष्यातला भीतीचा टप्पा. अगदी चांगल्या गुणांनी पास होणारे तरुणही या मुलाखतीच्या टप्प्याला घाबरताना दिसतात. त्यातल्या त्यात तो इंटरव्ह्यू आपल्या आयुष्यातला पहिला इंटरव्ह्यू असला की चांगलीच भंबेरी उडते.
अनेकांकडून मार्गदर्शन घेतल्यावरही आपल्या मनात भीती कायम असते आणि आयत्या वेळी झालेला गोंधळ म्हणजे विचारूच नका. काही वेळा आपण अगदी तयारीत जातो; पण नेमका मुलाखतीवेळी आपण सगळं विसरतो.
कॉलेजनंतर लागते ती नोकरी व साहजिकच नव्या नोकरीचा पहिला पगार हा सगळ्यांच्याच चर्चेचा विषय असतो. कारण इतके दिवस आई-बाबांच्या जीवावर उदार होऊन जगलेलो असतो. अचानक आपल्या मेहनतीची कमाई आपल्या हाती येते आणि उत्साह आणखी वाढतो. त्यातही पहिल्या कमाईतून घेतलेली पहिली वस्तू म्हणजे आपला ठेवणीतला खजिना असतो.
मग ती वस्तू कोणतीही असू द्या, आईला घेतलेली साडी, बहिणीसाठी घेतलेला ड्रेस, स्वत:साठी घेतलेलं फाऊंटन पेन असेल किंवा अजून आणखी काही, त्या गोष्टी जपण्याची मजा काही औरच असते. तरुण वयातल्या आठवणींना अधिक सुंदर बनवणारे पहिलेपणाचे काही अनुभव असे असतात की ते आयुष्यभरासाठी आपल्याला प्रसन्नता व ऊर्जा देत राहतात.
पहिली नोकरी सुखाची !
पहिल्या नोकरीचा प्रत्येकाचाच अनुभव वेगळा असतो, त्यामुळे मला सुरुवातीला भीतीच वाटलेली. त्यातही ती नोकरी म्हणजे माझ्या शिक्षणाशी संबंध नसणारी होती. सेल्स आणि मार्केटिंग मी याआधी कधीही केलं नव्हतं; शिवाय लोकांशी फार बोलायला आवडत नसल्याने ही नोकरी स्वीकारणं म्हणजे वाघाच्या जबडय़ात हात घालण्यासारखं होतं.
पण माझ्या सुदैवाने मला मिळालेले सीनिअर फार चांगले व समंजस होते, त्यामुळे त्यांनी मला वेळोवेळी सांभाळून घेतलं. त्यामुळे त्या चांगल्या माणसांमुळे मला ती पहिली नोकरी नेहमीच लक्षात राहिली आहे.
- निकिता मुरकर
नाटयस्पर्धा प्रथमच जिंकली..
गेल्या पाच वर्षापासून मी महाविद्यालयाच्या नाटय विभागात आहे. अकरावीत असताना स्टेजवर जाण्याचा माझा पहिलाच अनुभव होता. व्यासपीठावर कसं वावरायचं याचं काहीच ज्ञान नव्हतं, तरीदेखील माझ्या सहका-यांच्या सहकार्याने मी व्यासपीठावर सादरीकरण करत होते. ते सादरीकरण माझ्या आयुष्यातील पहिलंच होतं.
त्यात प्रथम येणं हे सगळ्यांचेच मुख्य उद्दिष्ट होते; पण कदाचित मेहनत कमी पडली असावी, कारण आम्ही अंतिम सामन्यात सादरीकरण केलं तरी आमचा पहिला क्रमांक येऊ शकला नाही. दिवसरात्र मेहनत करून पुढील स्पर्धा जिंकायचीच असा निश्चय केला आणि त्यापुढील स्पर्धा आम्ही पहिल्या क्रमांकाने जिंकलो. खरं तर त्या दिवसानंतर आम्ही कधीच हरलो नाही; परंतु ते प्रथम जिंकणं कायम लक्षात राहिलं.
- प्राजक्ता कणसे
आठवणीतला कॉलेजचा पहिला दिवस
माझे ज्युनिअरचे शिक्षण गोखले कॉलेजमध्ये झाले आणि तेरावीच्या शिक्षणाकरिता मी मालाडमधील सराफ महाविद्यालयामध्ये सायन्स या शाखेमध्ये प्रवेश घेतला. ज्युनिअर कॉलेजमध्ये म्हणावी तशी मी मज्जा-मस्ती केली नाही; परंतु डहाणूकर महाविद्यालयामध्ये माझा महाविद्यालयातील पहिलाच दिवस अप्रतिम गेला. तो माझ्यासाठी अविस्मरणीय दिवस होता आणि त्या पहिल्याच दिवशी आम्ही केलेली धमाल माझ्या वहीच्या एका पानावर मी लिहून ठेवली आहे.
मी थोडा संकोची वृत्तीचा असल्यामुळे आणि नवीन कॉलेजमध्ये पहिलाच दिवस होता त्यामुळे मला फार भीती वाटत होती की, कॉलेजचा पहिला दिवस कसा असेल? कोणी नवीन फ्रेण्ड्स बनतील का? मला एकटे एकटे नाही ना वाटणार? अशा नानाप्रकारच्या विचारांमुळे मी फार भांबावून वर्गामध्ये प्रवेश केला.
पहिलाच दिवस असल्यामुळे लेक्चर्स झाले नाहीत. पण आजूबाजूला बसलेल्या सगळ्या मित्रांशी माझी मैत्री झाली. हे एवढय़ावरच न थांबता फर्स्ट डे सेलिब्रेशन करण्यासाठी आम्ही सगळे फ्रेण्ड्स मस्त गिरगाव चौपाटीवर फिरायला देखील गेलो. पहिल्या दिवशी असं काही घडेल याची मी स्वप्नात देखील कल्पना केली नव्हती.
- ईश्वर राणे
माझ्या चित्रांचं पुस्तक
मला चित्रकलेची फार आवड. त्यामुळे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी वहीत चित्र काढण्याचा प्रयत्न करत असते. वहीच्या पाठच्या पानावर अशी चित्रं काढून काढून सगळ्या वह्यांमध्ये मी रंगवलेली अनेक चित्रं तुम्हाला दिसतील. परंतु मी आता मात्र त्या सगळ्या चित्रांचा एक संच तयार करून त्यांची एक स्वतंत्र वही केली आहे. त्यामुळे मी रंगवलेल्या चित्रांची ती पहिली वही माझ्या आयुष्यातील पहिलं पुस्तक असं मी समजते. पुढच्या आयुष्यात मी चित्रांचे स्वत:चं पुस्तकही काढेन; पण ही बनवलेली पहिली वही मात्र माझ्या कायमस्वरूपात लक्षात राहील.
- पूजा पाटील

Comments

Popular Posts