गणपती बाप्पा मोरया

गणपती बाप्पा मोरया

गणपती बाप्पा आता थोडयाच दिवसांत विराजमान होणार आहेत. बाप्पाच्या स्वागतासाठी प्रत्येक ठिकाणी जोरात तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. बाप्पा येणार म्हटल्यावर लहानांपासून मोठय़ांपर्यंत सारेच जण तयारी करत असतात.
ganpati bappaबाप्पावर निघतायेत शॉर्टफिल्म्स!
शिकण्यासाठी तरुणाईचा ट्रेंड बदलतोय. तरुणाई एका विशिष्ट साच्यातून बाहेर येताना दिसते. एखाद्या सणामागचा हेतू किंवा त्या सणाचा इतिहास माहीत नसला तरी त्या सणाचा आपल्याला कसा फायदा होईल याचा निश्चितच तरुणाई विचार करताना दिसते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे बाप्पांवर होत चाललेले डॉक्युमेंट्स आणि शॉर्ट फिल्म्स.
सध्या व्हीडिओ इफेक्ट्स, एडिटिंग, फोटोग्राफी, व्हीडिओग्राफी अशा सृजनशील करिअरचा तरुणाई प्रामुख्याने विचार करतेय. मग शिकाऊ तरुण या संस्कृतीचा योग्य वापर करतात. आता योग्य वापर म्हणजे काय? तर, दिवसेंदिवस मुंबईत, उपनगरात मंडळं वाढत जात आहेत. आपलं मंडळ कसं श्रेष्ठ आहे हे सांगण्यासाठी प्रत्येक मंडळांची धडपड दिसून येते. त्यासाठी पाटपूजन सोहळे, पाद्यपूजन सोहळे, आगमन सोहळे आयोजित केले जातात. १० दिवस चालणारा उत्सव महिनाभर दिसतो.
मग या सा-या सोहळ्याचं चित्रीकरण करायचं, त्याचं उत्तम संकलन करायचं आणि सोशल मीडियावर अपलोड करायचं. याने मंडळांची प्रसिद्धीही होते आणि हा सारा खटाटोप करणा-या तरुणांना अनुभवही मिळतो. सध्या असे अनेक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आपण पाहिले आहेत.
एकंदरीतच तरुणाई मिळालेल्या संधीचा उत्तम फायदा घेतेय, यातून हे निष्पन्न होतंय. असं चित्रीकरण करणारे काही तरुण प्रोफेशनल फोटोग्राफर-व्हीडिओग्राफर असतात तर काही जण अनुभव घेत घेत शिकणारे शिकाऊ विद्यार्थी असतात. सध्या डॉक्युमेंटेशनचा जमाना आहे. प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी सामान्यांना पोहोचणं शक्य नसल्याने अशा सृजनशील तरुणांचा उपयोग होतो. त्यांनी केलेलं डॉक्युमेंट पाहूनच इतर नागरिक सुखावतात.
‘याचि देही याचि डोळा’ एखादा उत्सव पाहता आला नाही तरी अशा शॉर्टफिल्म्सच्या माध्यमातून प्रत्येक सोहळे लोकांना अनुभवता येत आहेत. नुकताच चिंचपोकळी येथील चिंतामणीचा आगमन सोहळा पार पडला. चिंतामणीवर पराग सावंतने चित्रित केलेली मोशन डॉक्युमेंटरी प्रचंड प्रसिद्ध झाली आहे.
सोशल मीडियावर प्रत्येकाने या मोशन डॉक्युमेंटरीचं कौतुक केलं. त्याचप्रमाणे विविध मंडळाचे बाप्पाचा इतिहास सांगणारे, आगमन सोहळे चित्रित केलेले अनेक डॉक्युमेंटरी सोशल मीडियावर सहज पाहायला मिळतात. बाप्पासाठी अनेक शॉर्टफिल्म आणि डॉक्युमेंटरी तयार होत आहेत. तरुणांच्या सृजनतेचा वापर करत मंडळंही इच्छुक तरुणांना पाठिंबा देत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
सोशल मीडियावरही बाप्पा आजकाल जास्त सक्रिय झालेला आपण पाहतोय. प्रत्येक मंडळाने स्वत:चे असे पेज तयार केले आहे. सोशल मीडियावारील बाप्पाचं विराजमान नवं नसलं तरी प्रत्येक नेटिझन्सकडून अशा सोशल मीडिया साईटवर आजही भटकंती सुरू असलेली आपण पाहू शकतो. त्यामुळे प्रत्येक मंडळ त्यांचे प्रत्येक कार्यक्रम, उपक्रम अशा माध्यमात अपलोड करत असल्याने अनेक नागरिकांपर्यंत मंडळाला पोहोचण्यात यश आलं आहे.
आपल्या कलेचा उपयोग करून परंपरा जपण्यासाठी मिळालेल्या व्यासपीठाचा तरुणांकडून मोठया प्रमाणात होत चाललेला वापर नक्कीच कौतुकास्पद आहे.

limka bookबाप्पाची नोंद लिमका बुकमध्ये
तरुणाई फक्त नेटवर सक्रिय असते. त्यांना समाजाचं काही घेणं-देणं नाही ही केवळ अर्थहिन चर्चा झाली. मात्र समाजप्रबोधन व्हावं यासाठीही काही तरुण सक्रिय असतात. त्यातला एक तरुण म्हणजे सुमित पाटील. आपल्या सांस्कृतिक सणांचा आधार घेत सुमित पाटीलने एक उपक्रम राबविला आणि चक्क त्याची नोंद झाली लिमका बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये.
समाजातील सर्व स्थरातील लोकांनी एकत्र यावं, सामाजिक विषयांवर चर्चा करावी यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. हाच खरा उद्देश समाजमनात रुजवण्यासाठी डिलाईल रोड येथील पंचगंगा सार्वजानिक गणेशोत्सव मंडळ सातत्य प्रयत्नशील आहे.
यंदा त्यांनी समाजातील विशेष मुलांना हाताशी घेऊन त्यांच्या कलेने घेत गणेशोत्सव साजरा करायचं ठरवलं. २६ ऑगस्ट रोजी जवळपास २५ कर्णबधिर आणि मूकबधिर विद्यार्थ्यांनी एकत्र येत केवळ ३ तासांत १०८ शाडूंच्या मातीपासून इको फ्रेंडली गणेशमूर्ती बनवल्या. पर्यावरण वाचवा, पाणी वाचवा, शिक्षण, कला आदी विविध विषय घेऊन या विशेष मुलांनी या गणेश मूर्ती बनवल्या आहेत.
सध्या पर्यावरणात सतत बदल होत आहेत. त्याचा परिणाम सामान्य जीवनमानात होताना दिसतो. दुष्काळ, अवकाळी पाऊस, भूकंप हे या सा-याचे द्योतक आहेत. या गोष्टी थांबल्या पाहिजेत, असं साऱ्यांनाच वाटतं. मात्र कोणीही त्यासाठी उपाययोजना करत नाही. मात्र या चिमुकल्या दोस्तांनी सुमित पाटीलच्या मार्गदर्शनाने १०८ मूर्त्यां बनवण्याचा विक्रम केला आहे. शिवाय त्यांची दखल खुद्द लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्सने घेतली.
सुमित पाटीलच्या संकल्पनेतून साकारलेल्या या मूर्त्यां सामाजिक प्रबोधनाचं कार्य करणा-या आहेत. मोठ-मोठी आश्वासनं देण्यापेक्षा सामाजिक कार्य करणे हे आपल्या निसर्गासाठी हिताचं आहे, असं सुमित पाटील सांगतो. सुमित पाटील स्वत: आर्ट डायरेक्टर आहे, शिवाय त्याला राष्ट्रपती पुरस्कारही मिळाला आहे.
कर्णबधिर आणि मूकबधिर मुलांना हाताशी घेऊन पंचगंगा सार्वजानिक मंडळाने साकारलेला हा समाजप्रबोधन गणपती उल्लेखनीय आहे. या सर्व गणपतींचे प्रदर्शन ५ ते १५ सप्टेंबपर्यंत पंचगंगा सार्वजानिक उत्सव मंडळ, ना. म. जोशी मार्ग, डिलाईल रोड, लोअर परेल येथे होणार आहे.

Comments

Popular Posts