अनुभूतीची ‘हम संविधानवादी’ चळवळ

अनुभूतीची ‘हम संविधानवादी’ चळवळ

आपण अनेक चळवळी पाहिल्या आहेत. अनेक वादांमुळे आपण ओळखले जातो. मात्र काही तरुणांनी ‘हम संविधानवादी’ ही संकल्पना रुजवली. आपण सारे जण संविधानाने बांधले आहोत, हेच आपण विसरत जातोय, नेमकं याच गोष्टींवर तरुणांनी प्रकाश टाकला आहे.
savidhanvadiआपण अनेक गोष्टींनी बांधून आहोत. मात्र त्यातही अनेक वाद आहेत. जातीय वाद, प्रांत वाद, राजकीय वाद, भाषिक वाद, धार्मिक वाद, वर्ण वाद अशा अनेक गोष्टींनी माणसाला पछाडून ठेवलंय. किंबहुना याच गोष्टींमुळे माणसाला ओळख निर्माण झाली आहे.
राजकारणी लोक या गोष्टींचा बागुलबुवा दाखवत सामान्य माणसांना विलग करताना दिसतात. त्यामुळे हे वाद सामान्य माणसांच्या आत कुठेतरी रुजले गेले आहेत. मात्र हे वाद, भेद कुठेतरी थांबले पाहिजेत असं ‘अनुभूती’च्या नवतरुणांना वाटत होतं. त्यातून त्यांनी निर्माण केली ‘हम संविधानवादी’ संकल्पना.
गेल्या वर्षभराचा आढावा घेतला तरी आपल्या राज्यात या भेदांमुळे वा वादांमुळे अनेक दंगली उसळलेल्या आपण पाहिल्या. मात्र आपण एकाच संविधानाखाली मोडतो हे सारे विसरून गेले आहेत. हे संविधानच लोकांना माहीत नाही.
शिवाय संविधानाची मूल्ये आपल्या शाळेच्या पुस्तकातील पहिल्या पानावर असली तरी त्याचा अर्थ कोणत्याच शाळेत शिकवला जात नाही. त्यामुळे ‘अनुभूती’ या संस्थेने एक आगळा विचार केला. माणसाला माणूस म्हणून जगता यायला हवं यासाठी त्यांनी ‘हम संविधानवादी’ संकल्पना जनमाणसांत रुजवण्याचा प्रयत्न केला.
अनुभूती या संस्थेच्या अध्यक्षा दीपा पवार यांना ही संकल्पना सुचली. १४ ऑगस्ट रोजी त्यांनी ही संकल्पना सत्यात आणण्यासाठी प्रयत्न केला. त्या प्रयत्नाला भरभरून प्रतिसादही मिळाला. त्यांनी लोकलमध्ये पथनाटय़, गाणी यांच्यामार्फत आपल्या संविधानात असलेली मूल्य लोकांपर्यंत पोहोचवली. या सा-यातून त्यांना अनेक लोकांनी आम्हाला हे असं काही असतं हेच माहीत नव्हतं, अशीही प्रतिक्रिया दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं. मात्र त्याचा योग्य उपयोग आता होताना दिसत नाही.
अनेक वादांमुळे माणसामाणसांमधील दुरावा वाढत जात आहे. त्यामुळे हम संविधानवाद ही संकल्पना माणसातील माणूसपण जागं करण्यासाठी दुवा ठरला आहे.
लोकलमधील प्रतिसादानंतर त्यांनी हा प्रयोग स्वातंत्र्यदिनादिवशी करायचं ठरवलं. गोरेगाव, जोगेश्वरी अशा लोकवस्तीत जाऊन त्यांनी पथनाटय़, गाणी सादर करत संविधानाचं महत्त्व समजावून सांगितलं. त्याचबरोबर संविधानाचं वाचनही या तरुणांनी केलं.
यावेळेस ते जवळपास १ हजार नागरिकांपर्यंत पोहोचू शकले. त्यांचे विचार ऐकण्यासाठी अनेकांनी गर्दी केली. शिवाय सुट्टीचा दिवस असूनही आणि त्यातही कोणतीही पूर्व कल्पना नसतानाही रहिवाशांनी पूर्ण प्रतिसाद दिल्याचं दीपा पवार सांगतात. त्याचबरोबर ज्यांना ज्यांना ही संकल्पना पटत गेली ते सारे जण हळूहळू आमच्या कार्यात सहभागी होत गेले, असंही त्या सांगत होत्या.
आपण गेली कितीतरी र्वष अनेक वादांमध्ये, भेदांमध्ये अडकत जात आहोत. राजकारणी लोकं याच गोष्टीचा वापर करत सामान्यांना वेगळं पाडण्याचा प्रयत्न करत असतात. जातीय भेद, वर्ण भेद, भाषिक भेद, धार्मिक भेद या गोष्टी म्हणजे माणसांची ओळख बनली आहे. मी अमूक एका जातीचा, मी तमूक एका धर्माचा, मी स्त्री, मी पुरुष, गोरा-सावळा असे अनेक भेद होत जातात, मात्र मी संविधान जपणारा, मानणारा आणि त्याची अंमलबजावणी करणारा असं कोणीच या देशात आढळत नाही.
नेमकी हीच गोष्ट या तरुणांच्या मनात आली आणि त्यांनी हम संविधनवादी ही संकल्पना रुजवण्यासाठी प्रयत्न केला. येत्या वर्षात देशात कोणताच भेद न ठेवता केवळ आपण संविधान जपणारे आहोत, अशी भावना प्रत्येकाच्या मनात रुजली पाहिजे, असं या ‘अनुभूती’मधील तरुणांना वाटतं.
आणखी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा त्यांच्या मानस आहे. त्याचबरोबर संविधान वाचन करून, संविधानाची माहिती प्राप्त करून गप्प न बसता, संविधानातील मूल्य जपली पाहिजेत. संविधानाचे नियम आत्मसात केले पाहिजेत. एकूणच संविधानातील मूल्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे, असं या चळवळीतील तरुणांना वाटतं

Comments

Popular Posts