कट्टयावर होतायत फोटोशूट

कट्टयावर होतायत फोटोशूट

सोशल मीडियावर आपली सुंदर ‘इमेज’ तयार करण्यासाठी विद्यार्थी धडपडताना दिसतात. त्यामुळे फोटोशूटला आजकाल जरा जास्त डिमांड आलाय. फोटोशूटची क्रेझ वाढल्याने अनेक विद्यार्थी मॉडेल म्हणूनही हे फोटोशूट करतात. त्यातही आजकाल प्रत्येक ग्रुपमध्ये एखाद्याकडे तरी कॅमेरा असतोच, त्यामुळे फोटोशूटला अधिक मजा येते.
photographyपूर्वी लोक फिरायला जायचे म्हणून फोटो काढायचे, मात्र आजकाल फोटो काढण्यासाठी तरुण फिरायला जातात, अशी स्थिती निर्माण झाली आहे. परवाच सोशल मीडियावर एक विनोद वाचणात आला, ‘लोक देवदर्शनाला जातात तसे आजकाल तरुण-तरुणी फोटोशूटला जातायत.’
एकंदरीत सांगण्याचा उद्देश असा की, आपण सहज म्हणून जरी सोशल मीडिया सुरू केलं तरी सा-यांचे फोटोशूट केलेले फोटो सहज दृष्टिपथात पडतात. पूर्वी एखाद्याकडेच कोणता तरी साधा कॅमेरा असायचा किंवा त्यानंतर स्मार्ट फोन्सचा अधिक वापर सुरू झाल्यावर सेल्फीची क्रेझ निर्माण झाली.
त्यानंतर सेल्फी अधिक सक्रिय करण्यासाठी सेल्फीस्टिकही बाजारात उपलब्ध होऊ लागली. मात्र आता कॅण्डी कॅम, सायबर शॉट, डीएसएलआर आदी कॅमेरे सहज कोणाकडेही उपलब्ध होऊ लागले आहेत. मोबाईल, कॅमेरा आणि लॅपटॉप तरुणांच्या या मूलभूत गरजा बनल्या आहेत.
प्रत्येक ग्रुपमधल्या कोणा एकाकडे तरी कॅमेरा असतोच. त्यामुळे कोणत्याही प्रोग्रामला किंवा कोठेही फिरायला जायचं असेल तर फोटोग्राफरचा भाव नक्कीच वधारलेला असतो. त्यातल्या त्यात आता पावसाळा सुरू आहे. त्यामुळे पावसाळी फोटोशूटला काही वेगळाच डिमांड आलाय.
कॉलेज बंक करून, क्लासला बुट्टी मारून हे विद्यार्थी बिनधास्त फोटोशूटला निघालेत. मग अशा वेळेस कॉलेजच्या कॅन्टीनपासून ते नरिमन पॉइंट, मरिन ड्राईव्ह इथपर्यंत तर अधिक लांबचा प्रवास असेल तर धबधबे, रिसॉर्ट, गड-किल्ले अशा जागांना पसंती दिली जातेय.
पूर्वी फोटोशूट फक्त एखादी मॉडेल किंवा अभिनेता-अभिनेत्री करत असत. मात्र सोशल मीडियावर मिळणा-या प्रसिद्धीसाठी आजकाल विद्यार्थी-तरुणदेखील फोटोशूटला पसंती देतायत. त्यामुळे यातूनच अनेक फोटोग्राफर्सही जन्माला आले आहेत. फेसबुकवर तर अनेक फोटोग्राफर्सचे पेज उपलब्ध झाले आहेत.
फोटो, लोकेशन्स, एडिटिंग या सा-या माध्यमातून जाणारा एखादा उत्तम फोटो सोशल मीडियावर काही वेगळाच भाव खाऊन जातो. त्यातल्या त्यात आता फोटोग्राफीची आवड असणारे तरुण आता एक छंद म्हणूनही असे कॉलेजव्यतिरिक्त उद्योग करताना दिसत आहेत. साहजिकच त्यांच्या कल्पकतेला यातून प्रेरणा मिळते.
सध्या या व्यवसायालाही जरा जास्त डिमांड आलाय. त्यातच आता गणपती बाप्पाच्या आगमनाचे पडघम वाजायला सुरुवात झाल्याने फोटोग्राफर्सना त्यांच्या कलेसाठी अधिक वाव मिळतो.
प्रत्येक मंडळाची वेगळी खासियत ते त्यांच्या फोटोग्राफीच्या माध्यमातून सादर करताना दिसतात. साहजिकच यातून त्यांना थोडाफार आर्थिक मदतही मिळत असेल. वाढती फोटोग्राफीची आवड लक्षात घेता अनेक संस्थांकडून फोटोग्राफीसाठी अनेक कार्यशाळा, शिबिर, स्पर्धा भरवल्या जातात. अशा उपक्रमांनाही फोटोग्राफर्सची मोठी पसंती पाहायला मिळते.
याकरता कोणत्याही थेअरीची गरज नसल्याने प्रॅक्टिकल गोष्टींवर भर दिला जातो. त्यातही हे क्षेत्र असं आहे की, जिथे प्रत्येक क्षणाक्षणाला काहीतरी नवं कॅप्चर करायला मिळतं. केवळ मॉडेल फोटोग्राफी न राहता आता अनेक प्रकारचे फोटोग्राफीही तयार झाली आहेत. वाईल्ड लाईफ फोटोग्राफर्सनाही जास्त प्रमाणात मागणी असलेली आपण पाहू शकतो.
सिनेमॅटोग्राफीही बहरते आहे. एकंदरीतच अभ्यासाव्यतिरिक्तही विद्यार्थी काहीतरी नवं करू पाहत आहेत. कॉलेज कट्टयावर केवळ टवाळक्या करत टाईमपास करत बसण्यापेक्षा विद्यार्थी कोणत्या तरी कल्पकतेला, सृजनतेला हाताशी धरून करिअरला वेगळंपण देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

Comments

Popular Posts