बाप्पाच्या स्वागतासाठी ‘आगमनाधिश’



बाप्पाचं आगमन अगदी काहीच दिवसांवर येऊन ठेपलंय. काही प्रतिष्ठित आणि प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळांचे पाद्यपूजन सोहळे झाल्याने मंडळांमध्ये आता मंडप सजावटीसाठी सुरुवात झाली आहे. त्याचप्रमाणे तरुणाईही त्यांच्या हटके पद्धतीने बाप्पाचं आगमन करायला सज्ज झाली आहेत.
गेल्यावर्षी गणेशोत्सवाच्या काळात काढलेले तब्बल 4 हजार व्हिडीओ शॉट्स केवळ 5 मिनीटांत दाखवण्याचा प्रयत्न सर्वेश शिर्के या तरुणाने केला आहे. सर्वेश शिर्के या तरुणाच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या डॉक्यूमेंटरीचं नाव ‘आगमनाधिश’ असे असून असा अनोखा प्रयोग पहिल्यादांच करण्यात आला असल्याचं त्याचं म्हणणं आहे. ‘आगमनाधिश’चं पहिलं सादरीकरण चिंचपोकळी चिंतामनीच्या पाद्यपूजन सोहळ्यात करण्यात आलं. त्यानंतर हा व्हिडीओ युट्यूबवर अपलोड करण्यात आला. अल्पावधितच तो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 25 हजाराहून अधिक व्ह्युज आणि लाईक्स मिळाले आहेत. यामध्ये गणेशमुर्तीच्या सजावटीपासून ते बाप्पाच्या विसर्जनापर्यंतचं सारंकाही अवघ्या 5 मिनीटांमध्ये पाहता येईल.
 या संकल्पने विषयी सर्वेशला विचारलं असता तो म्हणाला,‘या व्हिडीओचा विचार माझ्या मनात खूप वर्षांपासून होता. 2016 ला आगमनच्या दिवशी ते फुटेज शुट झाले पण ते एडिट होत नव्हते. 4000 हून जास्त शॉटस् कमी वेळात असल्यामुळे बर्‍याच तांत्रिक अडचणी येत होत्या. गेल्या वर्षभरात हा व्हिडीओ 7 वेळा एडिट करण्यात आला पण तो पूर्ण होतच नव्हता. शेवटी त्या बाप्पाची ईच्छा असावी, त्याच्या पाटपूजनालाच हा व्हिडीओ रिलिज करण्यात आला,’
 व्हिडीओशी सुसंगत असलेलं गाणं निवडण्यापासून ते घेतलेले सर्व शॉट्स योग्यरितीने मांडण्यापर्यंत सारं काही अवघड आहे. त्यामुळे साहजिकच यासाठी एडीटींगचाही चांगलाच कस लागणार असणार. शिवाय या व्हीडीओसाठी केलेली कॅलिग्राफीही बघण्यासारखी आहे. व्हीडीओ पाहताना मधूनच संतोष जुवेकरच्या ‘मोरया’ चित्रपटातील एखादा डायलॉग मध्येच एकू येतो आणि खरंच या बाप्पाच्या सेवेसाठी तरुणाई किती झटते याची जाणीव होते. कलेचा अधिपती असलेल्या बाप्पासाठी कलेच्या मार्फतच केलेली पूजा खरेच उल्लेखनीय म्हणावी लागेल.  
चिचंपोकळीच्या चिंतामणीच्या विसर्जनात आपल्या आरतीच्या तालावर सर्व भाविकांना थिरकायला लावणारे संजय नलावडे यांचा आवाज ऑडिओ-व्हिडीओ स्वरुपात सर्वेशने गेल्यावर्षी बंदिस्त केला होता. त्या व्हिडीओलाही मुंबईकरांचा चांगलाच प्रतिसाद लाभला होता. त्यामुळे यंदाची त्याची संकल्पनाही युट्यूबवर चांगलीच गाजते आहे.

Comments

Popular Posts