बाप्पा, बाजारीकरण अाणि मार्केटींग


आई बाबांनंतर कोणावर माझी फार श्रद्धा असेल तर ती विठ्ठलावर आणि गणपती बाप्पावर. पण त्यांच्यासाठी मी कधी मुद्दामहून वेळ काढलाय हे आठवत नाही. तरीही माझं कधीच, काहीच वाईट झालं नाही. त्यांचे अशिर्वाद सतत पाठीशी  आहेत. विठ्ठलाची वारी आणि गणेशोत्सव हे आवडीचे सण. वारकरी १८-१९ दिवस पायी चालत पांडुरंगाच्या दारी जातो तर बाप्पा ७-१० दिवसांसाठी भक्तांच्या घरी येतो. या दोनही सणात केव्हढा उत्साह असतो नै! अगदी या दिवसांएवढंच आयुष्य हवं. वारीविषयी म्हणाल तर मी कधीच गेली नाही. पण वारीविषयी फार कुतूहल आहे. आयुष्यात एकदातरी वारी करायची. राहता राहिला प्रश्न गणेशोत्सवाचा. पक्की मुंबईकर (आता ठाणेकर असले म्हणून काय झालं?)असल्याने हा सण फार जवळून पाहिलाय. अनुभवलाय. बाप्पाच्या स्वागतासाठी आतूर असलेलेही भक्तगण पाहिलेत. १० दिवसासाठी ते मंडपच आमचं घर असायचं. बाप्पा येणार त्याच्या आदल्यादिवशी आम्ही दिवसभर मंडपात असायचो. आदल्यादिवशीच बाप्पाचं आगमन व्हायचं. अगदी थाटामाटात. फरक एवढाच या थाटमाटात कुठेच बडेजाव किंवा मंडळाचं शक्तीप्रर्दशन नसायचं. त्यावेळी पाद्यपूजन, आगमन सोहळे याचे वेगळे घाट नव्हते. जो काही उत्सव असेल तो त्या १० दिवसात. जी काही मजा असायची ती त्या १० दिवसातच. त्यामुळे त्या १० दिवसांची आतुरतेनं वाट पाहणं आलंच. तेव्हाही बाप्पांची चिकार मंडळं होती. पण या मंडळांमध्ये कधीच हेवेदावे नव्हते. मला तर २ मंडळांनी एकत्र आगमन आणि विसर्जन केल्याचंही आठवतंय. वर्ष लोटत गेली तशी उत्सवाचं बाजारीकरण होतेय असं वाटू लागलं. कदाचित ही गोष्ट तुम्हाला खटकेलही. तुम्ही यावर वाईट प्रतिक्रीयाही द्याल. पण खरंच एकदा विचार करा, आता साजरे केले जाणारे सार्वजानिक सण पूर्वीसारखे होतात का?समाजाने एकत्र यावं, समाजात एकोपा वाढावा याकरता लोकमान्य टिळकांनी सार्वजानिक गणेशोत्सवाची स्थापना केली. पण आता साजऱ्या केल्या जाणाऱ्या गणेश उत्सवात वितभर तरी एकोपा दिसतो का? आमचं मंडळ कसं मोठं? आमचं मंडळ कसं प्रतिष्ठीत? आमचं मंडळ किती जूनं? या मुद्द्यांना धरून वर्गणी गोळा केली जाते. त्यातून एखादा सामाजिक कार्याचा कार्यक्रम आयोजित केला की आमचं मंडळ कसं सामाजिक विषय हाताळतं? गोरगरिबांना मदत करतं यासाठी जाहिरातबाजी सुरू होते. (या जाहिरातबाजीसाठी किती पैसा खर्च होतो हे न सांगणंच योग्य.)
दहा दिवस रंगणाऱ्या सोहळ्याचं रुपांतर महिनाभर रंगणाऱ्या सोहळ्यात झालं. पाद्यपूजन सोहळे, आगमन सोहळे यामुळे गणेशोत्सव आता तब्बल १-२ महिने तरी साजरा केला जातो. या गोष्टीलाही माझी ना नाही. पण या कार्यक्रमांमधून किती पैसा खर्च होतो याचा हिशेब कोणंतच मंडळ जाहिर करत नाही. खर्चाचं जाऊ द्या अशा सोहळ्यांना उपस्थित राहणाऱ्या किती तरुण मंडळीच्या मनात बाप्पाविषयी धार्मिक आस्था असेल? "अरे ती आयटम येणारे, आपण जाऊ तिकडे आणि तिकडेच प्रपोज मारू"....."अरे कार्यक्रम आटोपला की लगेच बाहेर ये, एक एक पँक मारुया"..."अरे त्या कोपऱ्यात काय झक्काय आयटम उभीए, चल ना भिडूया यार"..असे एक ना अनेक शब्द कानावर पडतात. शिवाय अशा गर्दीमध्ये आंबट शौकिन काय कमी असतात? मंडपाच्या बाहेर असलेल्या पानटपरीवर सिगरेटी ओढल्या जातात.नशेत असणारे तर भांडणं करा़यला उत्सुकच असतात..असो. सण—समारंभाचा उत्सव करायचा असतो हो, बाजारीकरण नाही. गेल्या काही वर्षात बाप्पाच्या सोहळ्याच्या उत्सवाचं बदलेलं रुप पाहवत नाही. पूर्वी त्या दिवसात आलेली मजा या महिन्याभराच्या उत्सवात नाही हो. ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचं नक्कीच स्वागत करा. पण आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याचीही पर्वा आपणच करायला हवी ना. माझ्या मिरवणूकीत अमूकच आणा किंवा माझी मिरवणूक तमुकच काढा असं बाप्पाने कोण्या पोथी पुराणात सांगितल्याचं एेकिवात नाही. मोठ मोठाले मंडप बांधून, कानठळ्या बसवणारी गाणी लावून, वाहतूक जाम करुन, वेळप्रसंगी सरकारी वस्तूंची तोडफोड करून सण साजरे होतात का हो? यामध्ये भरडला जातो तो पोलीस. उन असो वा पाऊस, या उत्सवाला गालबोट लागू नये म्हणून घरातला सण विसरुन पोलीस ड्यूटीवर असतात. तुमच्या हातून चुका झाल्यावर त्यांनी कारवाई केली तर अख्ख्या पोलीस जातीला शिव्याही द्यायला कमी करत नाही.
मुळात गणेशोत्सवाच्या दरम्यानची दुसरी बाजू जाणून घ्यायची असेल तर पोलिसांना विचारा..मग लक्षात येईल आपण कुठे आणि किती चुकतोय ते.


प्रत्येक सणांचं पावित्र्य आपणंच जपायला हवं ना. दर्शनाच्या रांगा वाढवण्यासाठी मंडळाने आखलेल्या उपाययोजना या एक प्रकरे गणेश मंडळांचं आणि पर्यायाने बाप्पाचं केलेलं मार्केटींग नाही का? अगदी साध्या सोप्या पद्धतीने सण साजरे नाही केले तर बाप्पा रागवणार आहे का? असो, यावर तूमच्या प्रतिक्रीया वाचायला आवडतील. या प्रतिक्रीयाचं चांगले-वाईट असं वर्गीकरण करता येणार नाही, कारण प्रत्येकाची श्रद्धा वेगवेगळी आहे. ते व्यक्त करण्याचीही पद्धत वेगळी असेल पण आपल्या पद्धतीमुळे कोणत्याही सणाचं आणि पर्यायाने देवाचं मार्केटींग होणार नाही याची काळजी आपणच घ्यायला हवी ना!

Comments

Popular Posts