विस्मृतीत गेलेल्या चाळी




टोलेजंग इमारतींच्या आडून एखादी बैठी चाळ दिसली की आजही दहा बारा वर्षांआधीची मुंबई आठवते. बैठ्या चाळी किंवा दोन मजल्यांची इमारत म्हणजे त्याकाळची एक संस्कृती मानली जायची. चाळ म्हणजे काय तर एकमेंकाना जोडलेली घरे आणि या घरांसाठी एखादी कॉमन असलेली गॅलरी. म्हणा आता अशा चाळी फारशा अस्तित्वात नाहीत. मात्र मुंबईच्या अनेक कानाकोपर्‍यात अशा चाळींचा वास आहे. 
उच्चभ्रु संस्कृतीतून नामशेष होत असलेली चाळ कोणे एकेकाळी लोकांचा श्वास होती. कारण येथे शेकडो कुटुंब एका कुटुंबासारखी गुण्यागोविंदाने नांदायची. अर्थात गुण्यागोविंदानी या शब्दाचा शब्दशः अर्थ न घेतला तरी चालेल. कारण भांडणतंटे करूनच चाळीतला संसार फुलल्याचं अनेकजण सांगतात. पूर्वी गिरणी कामगारांची वस्ती मोठ्या प्रमाणात मुंबईत होती. गिरणीच्या आवाजाने संपूर्ण मुंबई जागी व्हायची. भल्या पहाटे उठायची सवय खरंतर या गिरणीच्या भोंग्यामुळेच लागलेली. भोंंग्याच्या आवाजाने आम्ही उठलो नाही की आईचा धपाटा असायचाच. उठल्यानंतर अंंघोळ झाल्यावर ठरलेला नाष्टा. एखाद वेळी घरातला नाष्टा नाही आवडला तरी कधी उपाशी राहिलो नाही. शेजारी पाजारी त्यासाठीच असायचे. तसंच सुट्टीच्या काळात आम्ही कोणाच्याही घरात खेळत असायचो. जेवणाच्या वेळेत ज्यांच्या घरी असायचो त्यांच्याच घरी जेवणाचा बेत हा अलिखित नियम होता. त्यामुळे चाळीतली प्रत्येक आई निश्चिंत असायची, आपला पोरगा उपाशी राहणार नाही याची तिला खात्री असायची. एवढंच कशाला चाळीतल्या गृहीणींना शेजारी पाजारी असलेल्या जवळपास 7 8 घरांतलं स्वयंपाकघर अगदी तोंडपाठ झालेलं असायचं. चाळ हे एक संपूर्ण कुटुंब असायचं. मुंबईतल्या अस्तित्वात असलेल्या अनेक चाळींमध्ये ही संस्कृती आजही रुजलेली दिसते. प्रत्येकाच्या घरात नळ आल्याने आता नळावरची भांडणं संपली असली तरी इथे भांडणाची काही कमी कारणं नाहीत. त्यामुळेच मी वर म्हटलं गुण्यागोविंदाने या शब्दाचा शब्दशः अर्थ घेऊ नये. त्याचप्रमाणे गणेर्शोत्सव, नवरात्र, दिवाळी हे सणवार अगदी एकत्रच येऊन केले जातात. अशा कार्यक्रमांमुळे भांडणतंटे मिटतात आणि एकोपा वाढत जातो. म्हणूनच म्हटलं, चाळ म्हणजे सदेह स्वर्गसुखच अाहे. 

चाळ नावाच्या या संस्कृतीत राहणं म्हणजे एक प्रकारची अ‍ॅडजस्टमेंट असायची. दहा बाय दहाच्या खोलीत कसाबसा संसाराचा गाडा ओढणं सोपं नाही. त्यातही एखाद्या नव्या जोडप्याला एकांत मिळणं त्याहून कठीण. त्यामुळे अ‍ॅडजस्टमेंटचं बाळकडूंच आपल्याला लहानपणापासून पाजलं जातं. कामाच्या शोधात भरकटलेली तरुण पिढी मुंबईत दाखल होते, काहीकाळ नातेवाईंकडे राहते, पण तिथेही राहणं जेव्हा मुश्किल होतं तेव्हा ही बेरोजगार मंडळी एकत्र येऊन चाळीत एखादं घर भाड्याने घेत. चाळीतले इतर सदस्य अशा बेरोजगारांना आपलंसं करते आणि आपल्या सुखदुखःत त्यांनाही सामिल करून घेते. काही चाळींमध्ये कोणाचं लग्न ठरलं असेल  तर एकत्र केळवण करण्याची पद्धत आहे. तर काही ठिकाणी महिन्यातून एकदा तरी काहीतरी कार्यक्रम आयोजित करून एकत्र येण्याचा घाट घातला जातो.

चाळीतल्या गृहीणींची प्रकर्षाने जाणवलेली एक गोष्ट म्हणजे त्यांचं आर्थिक समिकरण. भिशी लावण्यापासून ते हळदीकुंकवासाठी वर्षभर साठवण्यात येणारी लहानच पण ठराविक रक्कम. दर महिन्याला एखादी ठराविक रक्कम साठवून दणक्यात हळदीकुंकू साजरा केला जातो. एकदाच भरपूर रक्कम काढण्यापेक्षा वर्षभर थोडी थोडी रक्कम बाजूला ठेवून त्यातून उत्साह साजरा करण्यात काही औरच मज्जा आहे. भिशी प्रकाराचीही तिच गोष्ट. वर्षातून दर महिन्याला एखादी ठराविक रक्कम आपण भरायची आणि ठराविक कालावधीने मोठी रक्कम पदरात पाडून घ्यायची. या रक्कमेतून किती जणांची स्वप्नांची साकार झाली आहेत हे चाळीत राहणार्‍यांना नव्याने सांगण्याती गरज नाही. भिशीची ही रक्कम कोणाच्यातरी शिक्षणासाठी, कोणाच्यातरी नोकरीसाठी वापरली जायची. त्यामुळे वर्षभर थोडी थोडी रक्कम का होईना पण साठवून ठेवल्याचा आनंद फार मोठा असतो. चाळीतलं हे आर्थिक समिकरण कोणत्याच बँकेत पाहायल मिळणार नाही. 
या चाळीतून मोठ मोठ्या व्यक्तीमत्वाचांही जन्म झाला आहे. लेखक, दिग्दर्शक, नाटककार यांनी त्यांच्या कलेतून चाळ संस्कृती साहित्यात आणली, लोकांपर्यंत पोहोचवली. बटाट्याची चाळ हे पुस्तक त्याचंच एक  द्योतक. पु. ल. देशपांडे यांनी विनोदाच्या माध्यमातून चाळीची संस्कृती अगदी कल्पकतेने यात रंगवली आहे.

 डेव्हलोपमेंटच्या नावाखाली आता चाळी जमिनदोस्त होताएत. त्याजागी टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या. माणसांची घरे मोठी होत गेली पण त्यांची मने तितकीच लहान होत गेली हेही तितकंच खरं. मुंबईत अस्तित्वात असलेल्या अनेक चाळींमध्ये मात्र अाता असा जिव्हाळा पाहयाला मिळत नाही. कोणेएकेकाळी डेव्हलोपमेंटला विरोध करणारी मंडळी अाता अापल्या चाळीचीही डेव्हलोपमेंट कधी होतेय याकडेच लक्ष देऊन अाहेत.

Comments

Post a Comment

Popular Posts