बहरलेली मराठी रंगभूमी

५ नोव्हेंबर १८४३ साली विष्णुदास भावे यांनी सीता स्वयंवर हे पहिले नाटक रंगभूमीवर आणले आणि मराठी रंगभूमीचा पाया रचला. मराठीतील हे पहिले गद्य पद्यमिश्रित नाटक जन्मास आले. त्याकाळी मनोरंजनाची साधने फार कमी होती. त्यामुळे नाटकांना रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. वर्षांनुवर्षे हे क्षेत्र विविध विषयां
नी बहरत राहिले. १९४३ साली या नाटकाचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यात आले. सांगलीतील अखिल भारतीय नाट्यविद्या मंडळाने हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा करण्याचा ठराव समंत केला आणि तेव्हापासून हा दिवस साजरा करण्यात येतो. मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून नाट्यक्षेत्रात प्रदिर्घ काळ सेवा बजावणाऱ्या कलाकाराला विष्णुदास भावे गौरवपदक देऊन गौरवण्यात येते. खरंतर संस्कृत नाटकांची परंपरा इ.स. दुसऱ्या शतकापासून भारतात अस्तित्वात होती असं नाट्यशास्त्र या ग्रंथात सांगण्यात आलं आहे. लोककला हे मराठी नाटकाचे मूळ आहे. भारूड, लळित, दशावतारी खेळ, किर्तन यासारखे लोकप्रकारांमधून नाटकातील सादरीकरणाची बीजरुपे आढळतात. तामाशाने मराठी रंगभूमी अधिक रुढ केली असंही काहीजण सांगतात. लक्ष्मी नारायणकल्याण हे एक लिखित नाटक प्राचीन काळी उपलब्ध होते. याच नाटकाच्या प्रभावातून विष्णुदास भावे यांनी सीतास्वयंवर हे नाटक मराठी रंगभूमीवर आणलं. सुरुवातीला केवळ पौराणिक नाटकांचाच आस्वाद नाट्यारसिकांना घेता येत होता. पौराणिक कथाभागाची आणि दैवी विभूतिंची ओळख प्रेक्षकांना करून देणे आणि मनोरंजन करणे असं या पौराणिक नाटकामागची प्रमुख कारणे होती. १८४३ पासून ते १८९५-१८९६ पर्यंत महाराष्ट्रात विविध नाटक मंडळ्या अस्तित्वात होत्या. पौराणिक नाटकांनंतर इंग्रज आणि संस्कृत नाटकांच्या भाषांतरित नाटकांमुळे रंगभूमीला विविध नाट्यसंहिता उपलब्ध झाल्या. तसेच याकाळात नाटकातील नेपथ्य, अभिनयाला महत्त्व आले.
१८०० ते १९७४ हा कालखंड भाषांतरयुग म्हणून ओळखला जातो. कारण या काळातले वाड्मय हे भाषांतरित वा आधारित स्वरुपाचे होते. संस्कृत नाटकांची सर्वाधिक भाषांतरे परशुरामतात्या गोडबोले यांनी केली आहे. तसेच,  मुंबई विद्यापीठातील इंग्रजी शिक्षणाच्या प्रभावातून आणि नाटकांचा भारतीय प्रेक्षकांना परिचय करून देण्याच्या गरजेतून इंग्रजी नाटकांचे मराठीत भाषांतर घडले. म्हणूनच संस्कृत आणि इंग्रजी नाटकांच्या भाषांतरांनी भारतीय प्रेक्षकांच्या अभिरुचीला वळण लागले. मराठी नाटक व्यवसाय म्हणून या काळात उत्कर्षाच्या अवस्थेला पोहोचला होता. या कालखंडाच्या उत्तरार्धातील लक्षणीय घटना म्हणजे अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या नाट्य कारकिर्दीचा उदय. सौभद्र हे किर्लोस्करांचे नाटक वाड्मयीन आणि प्रयोगदृष्ट्या क्रांतिकारक ठरले. त्याचबरोबर त्या काळात गोविंद बल्लाळ  किर्लोस्कर, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, राम गणेश गडकरी आदींच्या नाटरचनेने प्रेक्षकांना मोहिनी घातली होती.
१९२० ते १९६० हा कालखंड नव्या नाटकाचा कालखंड म्हणून ओळखलं जातं. या कालखंडात नव्या जाणिवा घेऊन  नाटक या साहित्यप्रकाराकडे नाटककारांनी पाहिलेले दिसते. या काळात राजकीय, सामाजिक, आर्थिक, वैचारिक, वाड्मयीन परिवर्तन घडत होते, त्यामुळे नाटकांचा आकार कमी होत गेला. १९२० ते १९६० या काळात अनेक राजकिय आणि सामाजिक स्थित्यंतरे घडत गेली. लोकमान्य युगाचा अस्त होऊन गांधीचे युग सुरू झाले. दुसरे महायुद्ध घडले, मीठाचा सत्याग्रह झाला आणि मग भारत स्वातंत्र्य झाला. अशा विविध घटनांमुळे मनोरंजन क्षेत्राला प्रेक्षकांनी थोडीशी पाठ फिरवली. त्यामुळे याचा परिणाम नाट्यकलाकारंच्या आर्थिक स्थितीवर होऊ लागला. या काळात जी नाटके रंगभूमीवर आली त्यामध्ये मुख्यत्वे सामाजिक आणि राजकीय विषय हाताळलेले दिसते.
१९३३ साली नाट्यमन्वंर या नाट्यसंस्थेची स्थापना झाली. या संस्थेच्या स्थापनेमागे इब्सेनच्या नाट्यतंत्राची प्रेरणा होती. त्यानंतर प्रल्हाद केशव अत्रे, अनंत काणेकर, भा.विं. वरेरकर, मो.ग. रांगणेकर, मा.ना.जोशी, वि.स. खांडेकर, ना.सी.फडके. वि.वा. शिरवाडकर, पु.ल.देशपांडे यांच्या नाटकांनी नाट्यरसिक अधिक चोखाळला. याच काळात अनेक स्त्री नाटककारांनीही पुढाकार घेतलेला दिसतो. यामध्ये त्याकाळातील स्त्रियांच्या समस्या, त्यांच्या अडचणी लोकांसमोर आणण्यासाठी स्त्री नाटककारांनी नाटक या माध्यमाचा उत्तम उपयोग करून घेतला. प्रल्हाद केशव अत्रे, मामा वरेरकर, मो.ग.रांगणेकर या तीन नाटककारांनी नाटक  या साहित्यप्रकाराकडे सकारात्मक दृष्टीने पाहिलेले दिसते. त्यांनीच मराठी रंगभूमीचा हा पडता काळ सावरण्याचा प्रयत्न केला आहे.
विसाव्या शतकात आणि आता एकविसाव्या शतकातही अनेक अभिरुची संपन्न नाटकं येत गेली आणि पुढे येत राहतील. सध्या मनोरंजानाची अनेक माध्यमे आहेत. मात्र  तरीही नाटक या माध्यमाची रुची अजिबातही कमी झालेली नाही. नाटक हे माध्यम जिवंत राहावं याकरता अनेक संस्था आजही कार्यरत आहेत. या माध्यमात तरुणांचा ओघ वाढावा याकरता आंतरमहाविद्यालयीन एकांककिा स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्यामुळे स्पर्धेच्या या युगातही नाटक हे माध्यम आपले पाय घट्ट रोवून उभे आहे.
आपल्या अभिनयाने, दिग्दर्शनाने, निर्मितीने, प्रकाशयोजनेने, नेपथ्याने नाट्यरसिकांचे मनोरंजन करणाऱ्या नाट्यकलाकारांना मराठी रंगभूमीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

------
संदर्भ – मराठी वाड्मय इतिहास (एम.ए-भाग १)

Comments

Popular Posts