कोकणाच्या कुशीतले तीन दिवस


लोकलच्या गर्दीत धक्के खाऊन आणि कधीही वेळेवर न सुटणार्‍या लोकलचा प्रवास करून क्षीण झालेल्या मंडळींना कोकणात जाताना एक वेगळाच उत्साह संचारलेला असतो. कोकणता जाणार्‍या ट्रेन बारमाही फुल्ल असतात त्यामुळे आधी रिझर्व्हेशन करणं मस्ट आहे. दोन महिन्यांपासून सुरू असलेली तयारी अखेर संपली आणि तो दिवस अर्थात रात्र उजाडली. 12.05 ला दादरहून तुतारी सुटणार होती. आणि अगदी वेळेत ही ट्रेन सुटली आणि आम्ही गणपती बाप्पाच्या गजरात आमचा प्रवास सुरू केला. थोडेसे स्थिर स्थावर झाल्यावर सगळ्यांनी सोबत आणलेली टाईमपासची सगळी साधनं बाहेर काढली आणि नेमका काय टाईमपास करावा हेच सुचेना. थोडावेळ अंताक्षरी रंगली. मात्र ट्रेनमधील इतर प्रवाशांनी आमच्या गोंधळावर नाराजी व्यक्त केल्यानंतर आम्हाला अंताक्षरी तिथंच थांबवावी लागली. मग पत्ते, हौजी असे खेळ होतेच. शांततेत जे खेळ खेळता येत होते तेव्हढे खेळून झाल्यावर प्रत्येकजण पेंगू लागला आणि थेट सावर्डे आल्यावरच उठला. ज्या स्थानकाची आम्ही वाट पाहत होतो, त्या स्थानकावर सकाळी 5.45 च्या दरम्यान आम्ही पोहोचलो. आमची ठरलेली दुसरी चारचाकी येईपर्यंत स्थानकावरचा चहा पिऊन आम्ही आमची झोप उडवली. थोड्या वेळाने आम्ही सावर्ड्यातल्या डेरवण येथील एका मैत्रिणीच्या घरी पोहोचलो. तेव्हा थोडंफार उजाडलं होतं. कोकणातंल पहाटेचं सौंदर्य डोळ्यात भरवून घेताना एक वेगळाच अनुभव प्रत्येकाला आला. आमच्या ग्रुपमध्ये काहीजण कोकणात प्रथमच आले होते. त्यामुळे त्यांना कोकणातील घरं, घरांची रचना, आजूबाजूचा परिसर पाहून निसर्गाचं एक वेगळंच सौंदर्य पाहिल्याचा अनुभव आला. मागच्या पडवीतून आत गेल्यावर चिर्‍यांनी बांधलेल्या घरात आम्ही स्थिरस्थावर झालो. तेवढ्यात मैत्रिणीनं सांगितलं की समोरून वर जाणार्‍या या पायवाटेत अनेक प्राणी आहेत. मग, काय? आम्ही लागलीच घरात बॅग टाकून या पायवाटेवरून चालायला सुरुवात केली. गर्द झाडांच्या आडून सूर्याची किरणं आमच्यावर पडत होती. या निसर्गाच्या कुशीतलं अचंबित करणारं सौंदर्य पाहून फोटो काढण्याचा मोह कोणाला आवरेल? निसर्गाने बहाल केलेल्या या प्रकाशात आम्ही यथेच्छ बुरश्या तोडांनेच फोटो काढून घेतले.
त्या पायवाटेवर एकही प्राणी दिसला नाही, मग आम्ही पुन्हा घरी परतलो. फ्रेश झाल्यावर पुढच्या प्रवासाची आखणी केली. कसं, कधी, कुठे-कुठे जायचं हे मुंबईत असतानाच ठरवलेलं, पण तरीही एकदा या आखणीची उजळणी केली आणि ठरवलेल्या गाडीने आमचा पुढचा प्रवास सुरू केला. डेरवणमध्ये एक शिवाजी महाजारांवर आधारित वास्तुसंग्रहालय आहे. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट इथं मूर्तीरुपात पाहायला मिळतात. तिथे एक फेरफटका मारला आणि मार्लेश्वराच्या दिशेने गाडी सुरू केली. सावर्डे ते मार्लेश्वर 67 किमीचं अंतर आहे. संगमेश्वर, देवरूख, साखरपा करत मार्लेश्वरला पोहोचता येतं. तासा-दिड तासात आम्ही मार्लेश्वर मंदिरात पोहोचलो. सुदैवाने आमचा चालक अनुभवी आणि गावातलाच असल्याने या प्रवासात आजूबाजूच्या अनेक स्थळांविषयीही माहिती मिळाली. आमच्यापैकी बरेचजण मार्लेश्वरला पहिल्यांदाच जाणारे होते. या मंदिरात जाण्यासाठी 500 पायर्‍या चढून जावे लागते हे मला तिकडे गेल्यावरच कळलं. पण सगळ्यांनीच या 500 पायर्‍या हाहा म्हणता सर केल्या. एका छोट्याशा गुहेत वाकून जात आम्ही आतमध्ये प्रवेश केला. नैसर्गिक प्रकाशाच्या कितीतरी लांब असलेली ही गुहा पूर्णपणे दिव्यांनी आणि समईने उजळलेली होती. दर्शन घेऊन बाहेर आलो तेव्हा समजलं की लगेच दुसर्‍या दिवशी इथं उत्सव आहे. त्याच उत्सवाची जय्यद तयारी इथं सुरू होती. उत्सवादिवशी जरी दर्शन घेता आलं नाही तरी आम्हाला आदल्यादिवशी अगदी व्यवस्थित दर्शन झालं होतं. मंदिराच्या उजव्या बाजूला खाली धबधबा आणि नदी होती. पावसाळ्यात तिथं भरपूर पाणी असतं. हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात नदीला केवळ थोडंफार पाणी असतं. त्या पाण्यातही आम्ही यथेच्छ आनंद उपभोगला आणि पुढच्या प्रवासाला निघालो. 500 पायर्‍या गप्पा मारत मारत कधी खाली उतरत आलो आम्हाला कळलंच नाही. आता पुढचा प्रवास होता गणपतीपुळ्याच्या. पुन्हा जवळपास 2 तासाचा प्रवास. मार्लेश्वर ते गणपतीपुळे जवळपास 77 किमी लांब. हा प्रवास सूर्य मावळतीला निघालेल्या त्या काळात म्हणजेच सायंकाळच्या वेळी सुरू झाला, त्यामुळे गाडीतूनच आम्ही सूर्य मावळतीला जातानाचं अगदी सुंदर चित्र पाहिलं. प्रवासात आमच्या ड्रायव्हरदादाने त्याचे अनुभव सांगण्यास सुरुवात केली. गावातच बालपण गेल्याने त्याच्याकडे सांगण्यासारखे अनेक किस्से होते. त्याच्या या गप्पाटप्पा ऐकत आम्ही गणपतीपुळ्याला केव्हा पोहोचलो कळलंच नाही. गर्दी अजिबात नव्हती. त्यामुळे पुढच्या पाचच मिनिटात बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो. बाहेर अथांग पसरलेला समुद्र होता. त्या समुद्र देवेतेचं दर्शन लांबूनच घेतलं. कारण सूर्य मावळल्यानंतर कोणालाच समुद्रात उतरण्याची मुभा नसते. यानंतर सुरू झालेला प्रवास फार महत्त्वाचा होता. गणपतीपुळ्याहून आम्ही आता गुहागरला जाणार होतो. गणपतीपुळ्यापासून गुहागर 50 किमी असेल. दिवसभर प्रवास करून आम्ही बरेच दमलो होतो. त्यामुळे सगळ्यानांच घरी जाण्याची ओढ लागली होती. पण त्याआधी काहीतरी पोटभरून खायचं होतं. कोकणाता आम्ही जवळपास 3 दिवस होतो. तिन्ही दिवस आम्ही मासांहारी पदार्थांवर तुटून पडलो होतो. सगळे नवनवे डिशेस ट्राय करत होतो. कोकणात गेल्यावर शाकाहारी खाणं म्हणजे गुन्हाच आहे. त्यामुळे कोकणातल्या विविध मासांहारी पदार्थांवर आम्ही ताव मारला होता.

 तर, गणपतीपुळ्यापासून गुहागरला जाताना संपूर्ण काळोख पडला होता. फक्त चांदण्यांचा प्रकाश. कोकणातल्या वाकड्या तिकड्या रस्त्यांवर फार कमी वर्दळ असते. त्यामुळे त्या सामसूम रस्त्यांवर फक्त आमचीच गाडी होती. समोर पाहिलं की काळाकुट्ट अंधार, मागे पाहिलं तरी तीच परिस्थिती. कोकणात गाव असणार्‍यांना हे सारं काही नवीन नव्हतं. पण आमच्यातले काहीजण प्रथमच कोकणात आलेले. त्यामुळे त्यांना या काळ्याकुट्ट अंधारात प्रवास करणं म्हणजे एकप्रकारचं थ्रीलंच वाटलं. त्यात आमचा ड्रायव्हर दादा आम्हाला एक एक किस्से सांगत होता. त्याचे आजवरचे प्रवासातल्या गमती जमती सांगण्यात तो रमला. वाघ, डुक्कर, ससे, भेकरं असे प्राणी गाडी चालवताना भररस्त्यात आल्यावर काय होतं, मग त्यावेळेस काय करावं, असा प्रसंग उद्भवल्यावर त्याने काय काय शक्कल लढवली हे सारं काही त्याने सांगितलं.
योगायोग म्हणजे ड्रायव्हर दादा हे सगळं सांगत असतानाच आमच्या गाडीसमोरून एक प्राणी गेला. आणि आमची सगळ्यांंचीच बोबडी बंद झाली. तो प्राणी होता जातवं. आम्हा मुंबईकरांनी हे प्राणी केवळ राणीबागेतल्या बंद पिंजर्‍यात पाहिले असल्याने आम्हाला त्याच्या गोष्टी फार आश्चर्यकारक वाटत होत्या. गावातलं जीवन कितीही साधं-सरळ, हळू आणि शांत असलं तरी तेवढंच भयावहही आहे. त्यामुळे अशा हिंस्त्र प्राण्यांविषयी गोष्टी ऐकताना फार गंमत वाटते पण प्रत्यक्षात जेव्हा असं काही आपल्यासोबत घडतं तेव्हा प्रत्येकाचाच थरकाप उडतो. गप्पा मारत मारत आम्ही एका बीचवर येऊन पोहोचलो. सुुरुवातीला गाडी इथं का थांबिवली हे आम्हाला कळलंच नाही. पण ड्रायव्हर दादाने अचानक बॉम्ब फोडला की आता पुढचा काही प्रवास आपल्याला जेट्टीने करायचा आहे. हे ऐकलं आणि आम्ही एकच जल्लोष केला. याआधी मुंबईत अनेकवेळा बोटीवर बसलो असलो तरी काळ्याकुट्ट अंधारात हा अथांग सागर पार करायचा म्हणजे सगळ्यांसाठी नवीन होतं. मुख्य म्हणजे या जेट्टीत अजिबात गर्दी नव्हती. केवळ आमचाच ग्रुप होता. जेट्टीच्या अगदी वरच्या मजल्यावर जाऊन आम्ही काळजी घेत फोटो काढले. आम्हाला फक्त आमची बोट दिसत होती. आजूबाजूला घट्ट अंधार होता. चांदण्याच्या प्रकाशामुळे आम्हाला समुद्रातलं पाणी थोडं थोडं दिसत होतं. एवढ्या अंधारातून समुद्र पार करण्याची प्रत्येकाची पहिलीच वेळ होती, त्यामुळे सगळ्यांनाच फार वेगळं वाटत होती. पुढच्या पंधराच मिनिटात आम्ही एका किनार्‍यावर येऊन थांबलो. ड्रायव्हर दादाकडून कळलं की रस्त्याने एवढा प्रवास केला असता अजून एक तास लागला असता. पण जेट्टीमुळे एक तासाचा प्रवास पंधरा मिनिटात संपला. पुढच्या अर्ध्या तासातच आम्ही गुहागरमधल्या गिमवी गावात येऊन पोहोचलो. एका मैत्रिणीचं घर इथं होतो. रात्री पोहोचल्या पोहोचल्या आम्ही अंथरुणावर अंग टाकलं. दिवसभर एवढा लांबचा प्रवास केल्याने सगळेच प्रचंड दमले होते.



दुसरा दिवस आमचा जरा उशीरानेच उजाडला. बाहेर जाऊन नाष्ता करण्यापेक्षा आम्ही घरीच मस्तपैकी अंडाबुर्जीचा बेत आखला. प्राजक्ता आणि प्रणालीने चविष्ट अंडाबुर्जी बनवली होती. अंडाबुर्जी पावावर आम्हा ताव मारला आणि मस्तपैकी गप्पांचा फड रंगवला. थोडीशी दुपार सरल्यावर आम्ही गुहागर बीचवर जाणार होतो. त्यामुळे तिथं गेल्यावर काय काय करायचं याचे बेत आखले गेले. सायंकाळी 4 च्या दरम्यान थेट आम्ही बीच गाठलं. बीचवरच थोडंसं जेवून घेतलं आणि आणि आम्ही आमची पुढची धम्माल सुरू केली. सगळ्यांच्याच घरातून पाण्यात उतरण्याच्या आधीच्या सुचना आल्या होत्या. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःची काळजी घेत पाण्यात उतरण्यास सुरुवात केली. सूर्य मावळतीला आला होता. त्यामुळे त्याची मस्त सूर्यकिरणं पाण्यावर पडत होती. मुंबईच्या समुद्रकिनार्‍यापेक्षा हा समुद्र कितीतरी पटीने स्वच्छ होता. पायाखालची वाळू अगदी स्पष्ट दिसत होती. एवढंच नव्हे तर आजूबाजूचा किनाराही अगदी स्वच्छ ठेवण्यात आला होता. कोकण आणि मालवणातले सगळेच समुद्रकिनारे असे स्वच्छ आहेत. म्हणूनच पर्यटकांचा इथं जास्त ओढा असतो. पाण्यात मजा करून झाल्यावर आम्ही बाहेर आलो. आम्ही अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्सच्या शोधात होतो. गुहागरच्या अनेक बीचवर अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्स आहेत म्हणे. पण आम्ही ज्या बीचवर उतरलो होतो तिथं केवळ पॅरासेलिंगच होतं. त्याव्यतिरिक्त कॅमल आणि हॉर्स राईड होतं. आम्ही सगळ्यांनीच कॅमल आणि हॉर्स राईड केलं. याच बीचवर आम्ही अक्षयचा वाढदिवसही साजरा केला. वाळूवर मस्तपैकी मेणबत्त्या लावून त्यामध्ये केक ठेवला होता. मेणबत्त्यांच्या बाजूने हार्टशेप काढला होता. हे सरप्राईज पाहून तो अचंबितच झाला. फॉर्मालिटी म्हणून आम्ही केक कापला आणि केक कापल्या कापल्या तो संपूर्ण केक त्याच्या तोंडावरच फासला. यामध्ये त्याचा चेहरा पूर्णपणे झाकून गेला होता. हळूहळू थंडी वाढत होती. एवढी मजा मस्ती करून सगळेच दमले होते, प्रत्येकाच्या पोटात कावळे ओरडू लागले. आता आम्ही मस्तपैकी जेवणावर ताव मारण्यासाठी एक छानसं हॉटेल शोधत होतो. बीचवरून बाहेर आल्यावर अगदी काहीच पावलांवर एक हॉटेल होतं. तिथंही आम्ही नॉनवेजवर ताव मारला आणि पुन्हा गिमवी गाव गाठलं. तोवर वाजले होते रात्रीचे बारा. पुन्हा तेच. चहूबाजूंनी काळाकुट्ट अंधार. दुतर्फा पसरलेली झाडं आणि मागे-पुढे काळोख. गप्पा-टप्पा करत आम्ही घरी पोहोचलो. घरी पोहोचून फ्रेश झाल्यावर आम्ही मस्तपैकी दमशेराक सुरू केलं. रात्रभर आमचा असाच गोंधळ सुरू होता. आम्ही सारेच बाहेरच्या पडवीत बसलो होतो. आमच्या पडवीतच काय तो प्रकाश होता, बाकी बाहेर चहूबाजूने अंधार. अशातच रात्री तीन वाजता आम्ही हॉरर स्टोरीज सांगायला सुरुवात केली. प्रत्येकजण काही ना काही सांगत होतं. खरंतर या गोष्टी सांगताना आणि ऐकताना सगळ्यांना मजा येत असली तरीही बाहेर झाडाचं पान हललं तरी प्रत्येकाचा थरकाप उडत होता हे नक्की. या गप्पा पहाटे 6 वाजेपर्यंत सुरू होत्या. आम्हाला कधी झोप लागली कळलंच नाही. फक्त 4 तास झोपलो. लगचे 10 च्या दरम्यान उठलो. बॅगा आवरल्या आणि परतीच्या प्रवासाला निघालो. मध्येच पुन्हा प्लॅन वाढला. आता संगमेश्वरला जायचं होतं. मुंबईला येण्यासाठी केलेलं रजिस्ट्रेशन कॅन्सल केलं आणि चिपळून स्थानकावरून थेट संगमेश्वर गाठलं. संमगेश्वरवरून दहाच मिनिटांवर मैत्रिणीचं गाव होतं. तिथं आम्ही उतरलो आणि यथेच्छ भोजन केलं. मस्त नृत्याची हौस भागवून घेतली. जेवढं जमेल तेवढं गावही फिरून घेतलं. पूर्वीपेक्षा आता गावच्या घरात फार बदल झालेत. चिर्‍यांची जागा आता सिमेंट काँक्रीटने घेतली असल्याने आता गावाचं रुपच पालटलं आहे. घराघरातून निघणारे चुलीचे धूरही दिसत नाही. शेणाच्या गौर्‍याही आजकाल दिसत नाही. गाई-गोठेही दिसेनासे झालेत. एकंदरीत प्रत्येक गावाला आता शहरी रुप आल्यानं अस्सल गावरान जीवन अगदीच पालटलं आहे. पण शहरातील धकाधकीचं जीवन अद्यापही गावात पोहोचलं नसल्याने गावाने ते वेगळेपण जपलं आहे. संगमेश्वरवरून ट्रॅव्हल्स पकडली आणि थेट मुंबई गाठली.
मुंबईच्या धकाधकीच्या जीवनातून थोडासा वेळ काढून बाहेर जायचं असेल आणि लो बजेट असेल तर कोकण बेस्ट आहे. फरक एवढाच कोकण ट्रेनच्या गर्दीतून प्रवास करण्यासाठी तयारी असावी आणि कोणा ओळखीच्यांचं कोकणात घर असावं. मग अगदी कमी बजेटमध्ये तुम्ही कोकणात मस्त विकेंड साजरा करू शकता. 

Comments

Popular Posts