बदलत गेलेला 'स्टेशन रोड’


16 एप्रिल 1853 रोजी बोरीबंदर (सीएसटी) ते ठाणे ही पहिली लोकल धावली. त्यावेळेस बांधलेले हे ठाणे स्थानक आजही तितकेच अवाढव्य आहे. तसंच, पश्चिमेला गेलेला स्टेशन रोडही तेव्हापासूनच प्रसिद्ध आहे. स्टेशन रोड म्हणजे ठाण्याचा पहिला रस्ता. कायमच गजबजलेला असलेल्या या रोडने गेल्या काही दिवसात मोकळा श्वास घेतला आहे.
ठाणे स्थानक ते कोर्टनाका हा परिसर स्टेशन रोड म्हणून ओळखला जातो. डोंबिवलीला जाणार्या दिशेने ठाण्यातील फलाट क्रमांक 2 वर उतरून पश्चिमेला बाहेर आलात की तुम्हाला हा रोड दिसेल. पुढे आल्यावर एसटीचा डेपो, अशोक टॉकिज, कलेक्टर कचेरी, मराठी ग्रंथसंग्रहालय, कपड्यांची-भांड्याची दुकाने दिसतील. गेल्या काही दिवसात इथं कपड्यांची मोठी-मोठी दुुकानं, मॉल उभी राहिल्याने गर्दी वाढत गेली. या गर्दीला खेचण्यासाठी अनेक अनधिकृत स्टॉल्सही उभे राहिले.
कोर्टनाक्यापर्यंतचा हा स्टेशन रोड कधीच कंटाळवाणा वाटत नाही. आजूबाजूला असलेल्या शॉपिंग मॉलमुळे या रस्त्यावरून जाताना नेहमीच विंडो शॉपिंग होते. तसंच, त्यापुढे गेल्यास कोर्टाच्या गल्लीत खडखड करत टायपिंग करणारी छोटी-मोठी दुकानं दृष्टीस पडतील. समोरच कोर्ट असल्याने अनेक सामान्य नागरिकांचा येथे विविध कामांसाठी हेलपाटा सुरू असतो.
पूर्वी स्टेशन रोड परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांचाही राबता अधिक होता. या फेरीवाल्यांमुळे  15 मीटर रुंद असलेला हा रस्ता केवळ 5 ते 6 मीटर रुंद झाला. नागरिकांना इथून चालणं असह्य झाल्याने अखेर पालिकेने या अनधिकृत स्टॉल्सवर कारवाईचा बडगा उचलला. ठाणे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या धडक कारवाईमुळे या रस्त्याने आता मोकळा श्वास घेतला आहे. पालिकेच्या डोळ्यात धूळ फेकून पुन्हा स्टॉल्स उभारणार्यांनाही पालिका वेळोवेळी दणका देते आहे. त्यामुळे साहजिकच या रस्त्यावरून चालणं आता सुलभ झालंय.

अतिक्रमणं केलेली दुकाने पाडण्यात आली आणि या रस्त्याचा विस्तार झाला. ठाणे स्टेशन रोडचा चेहरा आता आकर्षक आणि सुंदर झाला असून आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केलेले काम ठाणेकरांच्या मनावर सदैव कायम राहिल.
स्टेशन रोड म्हणजे ठाण्यातील पहिला रस्ता. पहिली लोकलसेवा सुरू झाली तेव्हा हा रस्ता सुरू झाला. कलेक्टर कचेरी ते ठाणे रेल्वे स्थानक यासाठी हा एकमेव रस्ता होता. ठाणे पालिकेच्या दप्तरी या रस्त्याची नोंद सुभाष पथ म्हणून असली तरीही या रस्त्याला ठाणेकरांनी स्टेशन रोड असं खूप आधीच नामकरण केलंय. ठाणे पालिकेची स्थापना 1863 मध्ये झाली, म्हणजे पालिकेच्या स्थापनेआधीपासूनच हा स्टेशन रोड अस्तित्वात आहे. पूर्वी हा रस्ता म्हणजे एक पायवाट होती. कालांतराने मातीने वेढलेल्या या रस्त्यावर खडीचा मुरमा चढवला गेला. आता सिमेंट काँक्रिटने हा रस्ता सुसज्ज झाला आहे.
या रस्त्याने अनेक ऐतिहासिक आंदोलनेही पाहिली असल्याची नोंद आहे. स्वातंत्र्यलढा, चलेजाव आंदोलन, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ या सर्वांचा साक्षीदार हा स्टेशन रोड राहिलेला आहे. पूर्वी मध्यवर्ती ठाणे म्हणजे उथळसर ते चेंदणी असा होता. याठिकाणांहून स्टेशनला येण्यासाठी स्टेशन रोड हा एकमेव मार्ग होता. 1959 पर्यंत स्टेशन रोड व्यतिरिक्त या रस्त्याला वेगळा पर्यायी मार्ग नव्हताच. कालांतराने ठाण्याची भौगोलिक रचना बदलत गेली आणि ठाण्यात अनेक पदपथ अस्तित्वात आले. मात्र तरीही या स्टेशन रोडवरची गर्दी काही कमी झालेली नाही.

Comments

Popular Posts