मराठी साहित्यातील महान साहित्यिक



महाराष्ट्र राज्यातच मराठी टिकावी याकरता प्रयत्न केले जात असतील तर या भाषेएवढे दुर्भाग्य कोणत्याच भाषेचे नसेल. ज्या राज्याची राज्यभाषाच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे त्या राज्यात सामाजिक, राजकीय क्षेत्रात हाहाकार माजला असणार हे नक्की. मराठी भाषा टिकावी याकरता सरकारी पातळीवर जो दिखाऊपणा केला जातो ते पाहून कुसुमामग्रजांच्या काळजाला किती पिळ पडत असेल याचा विचार न केलेलाच बरा. २१ फेब्रुवारी मातृभाषा दिन आणि २७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. एकाच आठवड्यात भाषेविषयीचे हे दोन दिन असले तरीही मराठी किती दीन झाली आहे हे या सप्ताहात प्रकर्षाने जाणवू लागतं. पण याच भाषेच्या जोरावर सामाजिक, राजकीय, कला क्षेत्रात क्रांती घडवून आपलं जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध करणाऱ्या कुसुमाग्रजांनी ज्ञानपीठपर्यंत मजल मारली होती. त्यांच्या जयंतीनिमित्तच मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. त्यांच्याविषयी आज थोडंसं पाहूया.
विष्णु वामन शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा करावा यासाठी जागतिक मराठी अकदामीने पुढाकार घेतला होता. विष्णु वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रजांनी ज्या काळात साहित्य निर्मिती केली तो काळा होता पारतंत्र्याचा. सगळीकडे अन्यायाचा हाहाकार माजला होता. सामाजिक, राजकीय वातावरण गढूळ झालं होतं. समाजाला या गढूळ वातावरणातून बाहेर काढायचं असेल तर विचारवंतांनी, क्रांतीकारांनी एकत्र येणं गरजेचं होतं. प्रत्येकजण आपआपल्या परीनं या अन्यायाविरोधात लढत होतं. तेव्हाच कुसुमाग्रजांची तळपती लेखणी बाहेर आली. वयाच्या १७ व्या वर्षांपासून त्यांनी सामाजिक चळवळीत अग्रणी सहभाग घेतला. चळवळीच्या अनुभवामुळे त्यांच्या लेखणीलाही तशीच तळपती धार मिळत गेली.
कुसुमाग्रजांचा जन्म पुण्यात झाला असला तरीही शिक्षण आणि पालनपोषण नाशिक येथं झालंय. त्यांचं खरं नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर. परंतु त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने ते विष्णु वामन शिरवाडकर झाले. कुसुमाग्रजांना एकूण सहा भाऊ आणि एक बहिण. कुसुमा ही त्यांची बहिण अत्यंत लाडाची. सहा भावंडांमध्ये एकुलती एक असल्याने तिच्यावर साऱ्यांचाच जीव. त्यामुळे तिच्या प्रेमापोटीच त्यांनी कुसुमाग्रज (कुसुमचा भाऊ) या नावाने लिहायला सुरुवात केली.
कुसुमाग्रजांनी त्यांच्या साहित्यलिखाणाला १९३० साली सुरुवात केली. निंबध, नाटक, कांदबरी, कविता अशा साऱ्याच साहित्यप्रकारात त्यांनी लिखाण केलंय. प्रथमत: रत्नाकर मासिकातून त्यांनी लेखनाला सुरुवात केली. अस्पृश्य  लोकांना नाशिकच्या काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा याकरता १९३२ साली सत्याग्रह करण्यात आला. त्यावेळी कुसुमाग्रजांनी त्यात सहभाग घेतला होता. ही चळवळ त्यांच्या आयुष्यातील पहिली चळवळ होती. त्यांच्या सामाजिक जीवनाला आणि लेखणाला इथून सुरुवात झाली. त्या काळात सर्वच साहित्यप्रकाराला एकप्रकारची अवकळा लागली होती. देश पारतंत्र्यात होता, त्यामुळे नाटकांचीही संख्या कमी झाली. अनेक नाट्यसंस्था बंद पडल्या. मात्र त्याच काळात त्यांनी नाट्यलेखनालाही सुरुवात केली. कथा, कांदबऱ्या, नाटके, ललित साहित्य याबरोबरच प्रभा साप्ताहिक, प्रभात वृत्तपत्र, सारथी, धनुर्धारी, नवयुग अशा माध्यमांमध्ये त्यांनी पत्रकारिताही केली.
१९४२ साली विशाखा हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. या काव्यसंग्रहाने मराठी साहित्यविश्वाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. आजही हा काव्यसंग्रह मराठी साहित्यिकांना भुरळ घालतं आहे. मराठी माती, स्वागत, हिमरेषा, ययाती आणि देवयानी, वीज म्हणाली धरतीला ही नाटकेही त्यांनी लिहिली.
नटसम्राट हे नाटक त्यांच्या लेखणीतून उतरलेले एक महान साहित्य. या नाटकाचे नाट्यप्रयोगही प्रचंड गाजले. या नाटकांमुळे म्हणे त्याकाळच्या तरुणांचा दृष्टीकोन बदलला. घरातील वृद्धांबाबतीत होणारी भांडण-तंटे कमी झाली. एखाद्या लेखकाला अजून दुसरं काय हवं असतं? या नाटकासाठी १९७४ साली ‘साहित्यसंघ’ पुरस्कार मिळाला.  तसंच, १९८५ साली अखिल भारतीय परिषदेचा राम गणेश गडकरी हा पुरस्कार मिळाला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अत्युच्च शिखरावरचा समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कारही आपल्या कुसुमाग्रजांना मिळाला आहे. कुसुमाग्रजांआधी हा पुरस्कार वि.स.खांडेकर यांना मिळाला होता. वि.स.खांडेकरांना हा पुरस्कार मिळाला तेव्हा त्यांना एका पत्रकाराने विचारले होते की, तुमच्यानंतर मराठी साहित्यविश्वात हा पुरस्कार मिळावा असं तुम्हाला वाटत असेल तर तो लेखक कोण असेल? तेव्हा त्यांनी क्षणार्धात कुसुमाग्रजांचं नाव घेतलं.
प्रा. देवानंद सोनटक्के यांच्या मतानुसार कुसुमाग्रजांचा साहित्यविचार पूर्णतः लौकिकतावादी आहे. एका समाजमनस्क कलावंताच्या सामाजिक चिंतनाचा आलेख त्यात उमटला आहे. कलावादाचा अतिरेक आणि सामाजिकतेचा तिरस्कार अशा द्वंद्वात अडकलेल्या मराठी साहित्यव्यवहारात त्यांनी समन्वय साधला आहे. कलाक्षेत्रात त्या त्या वेळी निर्माण झालेल्या संभ्रमावस्थेतेचे पितामहाच्या भूमिकेतून केलेले ते मार्गदर्शन आहे. कुसुमाग्रज हे अहंकार, अनुभव आणि आविर्भाव ही कलेची आधारभूत तत्त्वे मानतात, त्यांचा हा विचार लेखकसापेक्ष आहे. अहंकार लेखकाच्या लेखनप्रक्रियेला प्रेरणा आणि गती देतो, हे तत्त्व लेखकसापेक्ष आहे. आविर्भाव आशयाचा आकार म्हणजे घाट ठरवितो, म्हणजे हे तत्त्व कलाकृतिसापेक्ष आहे. वर्चस्व हे तत्त्व रसिकसापेक्ष आहे, तर लेखकाच्या अनुभवाची समृद्धी लेखकाच्या सामीलकीवर अवलंबून असते, हे तत्त्व समाजसापेक्ष आहे. कुसुमाग्रजांचा साहित्यविचार समाजसापेक्ष असून ते सामाजिकतेलाच परतत्त्व मानतात, विविध जातींतील लेखक लिहू लागणे यात त्यांना साहित्याची परपुष्टता, समृद्धी वाटते.
काव्यलेखन, कथा, कांदबरी, नाटक, संगीत, पत्रकारिता अशा विविध साहित्यमाध्यमात आपला ठसा उमटविणाऱ्या कुसुमाग्रजांनी मराठी साहित्यविश्वासाठी एक वेगळी दृष्टी निर्माण करून दिली होती. म्हणूनच त्यांना आधुनिक मराठी लेखक म्हणतात. त्यांच्यामते, साहित्याने प्रत्यक्ष क्रांती होत नसली तरी, क्रांती ही साहित्याची प्रेरणा होऊ शकते. कुसुमाग्रजांनी तत्कालीन नव लेखकांनाही लिहिण्यास उद्युक्त केलं होतं.  अशा सर्वच क्षेत्रात मोलाची कामगिरी केलेले, मराठीविषयी, समाजाविषयी प्रखर प्रेम, निष्ठा असेलेला तारा १० मार्च १९९९ साली निखळला आणि मराठी साहित्यविश्वाला पोरका करून गेला.
-संदर्भ- एम.ए मराठी भाग १, http://www.kusumagraj.org

Comments

Popular Posts