गृह‘अर्थ’दक्ष


एक काळ होता, नवर्‍यानं महिन्याला घरखर्च दिला की त्यातच संपूर्ण महिना घालवायचा. मग यातूनच वाणसामान आणायचं, मुलांच्या शाळेची फी भरायची. त्यातूनच उरलेली रक्कम पदराच्या गाठीशी घट्ट बांधून ठेवायची. मला आठवतंय, आमच्या बाजूला राहणार्‍या आजी सांगत होत्या, आमचे हे मला फक्त महिन्याला 10 रुपये देत असत. त्या 10 रुपयात मी महिना चालवायचे. पगार फक्त 100 रुपये. मग जसजसा पगार वाढत गेला तसतसा 10 रुपयाचे 20 झाले, मग 30. पण शेकड्यांपर्यंत कधी पोहोचले नाही. पण त्यांनी दिलेल्या रक्कमेतूनही साखरेच्या डब्यात मी पैसे साठवून ठेवत होते. त्या साठलेल्या पैशातूनच पोराच्या लग्नात सूनेला गांतण घातलंं.
पूर्वी बायका महिन्याला दोन ते तीन रुपये गाठीशी बांधून ठेवत. आताची गृहिणीही तेच करते. फक्त रक्कम वाढत गेली. तेच त्यांचं सेव्हिंग आणि करंट अकाऊंट. त्यातून त्यांना कोणतंही व्याज मिळत नाही. पण कित्येकींनी त्या पैशांतूनच मोठी रक्कम जमा केलीय. बायकांचं आर्थिक नियोजन एखाद्या बँक व्यवस्थापकापेक्षाही सरस असतं, असं उगाच म्हटलं जात नाही. नवर्‍यानं दिलेल्या पैशांतून घरखर्च भागवूनही ती लेकरांना थोडेफार पैसे मौजमजेसाठी देते, यातच तिच्या काटकसरीची कल्पना येते. बचतीसाठी आजकाल बँकेत अनेक योजना आल्यात. त्यातून थोडंफार व्याजही मिळतं. पण बायकांच्या आर्थिक नियोजनातून कोणतंही व्याज मिळत नसलं तरीही त्यांच्या त्यांनी त्यांच्यासाठीच आखलेल्या अनेक योजनांमुळे त्यांना बराच फायदा झाला आहे.
बायकांनीच स्वतःसाठी तयार केलेली योजना, जी आजही कित्येक मध्यम लोकवस्तीत प्रकर्षानं दिसून येते. ही योजना म्हणजे भीशी पद्धत. ही भीशी पद्धत आजकाल अनेक सराफांच्या दुकानातूनही दिसते. पण त्याकाळी आणि किंबहुना आजही कित्येक चाळीतल्या बायकांना या भीशीतून मिळालेल्या रकमेने सावरलं आहे. आमच्या इथल्या भीशी चालवणार्‍या बायका भीशीच्या निमित्ताने एकत्र आल्या आणि त्यातूनच त्यांनी त्यांची बचत सुरू केली. सुरुवातीला मिळालेला प्रतिसाद पाहता ही योजना वर्षभरात बारगळणार असं वाटलं होतं, पण उत्तरोत्तर या योजनेला प्रतिसाद मिळत गेला आणि त्यांच्या बचतीची रक्कम वाढत गेली.
यासाठी एक आठवण आवर्जून सांगाविशी वाटते ती शेजारी राहणार्‍या काकूंची. नवर्‍याचा पगार 10 हजार आणि काकुंना जेमतेम 5 ते 6 हजार. 15 हजारांची एकहाती रक्कम त्यांनी गेल्या कित्येक वर्षात पाहिलीच नव्हती. पण भीशीच्या रुपाने त्यांच्या हातात एकहाती 15 हजार रुपये आले आणि त्यांना रडूच कोसळलं. महिन्याकाठी 1 हजार रुपये नवर्‍याच्या नकळत बाजूला ठेवले आणि नशिबाने आपल्या हाती पंधरा हजार आले. त्या पैशांतून त्यांनी घरात थोडंफार फर्निचर घेतलं. आपल्यापेक्षा कमी कमवणार्‍या आपल्या बायकोनं महिन्याकाठी हजार रुपये कसे काय बाजूला सारून ठेवले असतील याचं तिच्या नवर्‍याला अपार कौतुक वाटलं. मध्यम कुटुंबात राहणार्‍या स्त्रियांचं आर्थिक नियोजन म्हणजे एक प्रकारची काटकसरच असते आणि या काटकसरीतूनच त्या घराचा डोराला सांभाळतात.
ही गोष्ट झाली भीशीची. पण हळदीकुंकुवाच्या कार्यक्रमातूनही बायका बचत करतात. महिन्याला ठराविक रक्कम एकीककडे जमा करायचे. वर्षभर हे पैसे साठवायचे. आणि जानेवारी महिन्यात एखाद्या दिवशी या साठलेल्या पैशातून हळदीकुंकू साजरा करायचा. श्रीमंत घराण्यात ज्याप्रमाणे किटी पार्टी असते तशीच या मध्यम कुटुंबातील स्त्रियांसाठी हळदीकुकूं म्हणजे किटी पार्टीच असते. फक्त या किटीपार्टीसाठी त्यांना वर्षभर नियोजन करावं लागतं. बरं वर्षभर साठवेलले हे पैसे हळदीकुंकुवाच्या मौजमजेसाठी अजिबात वापरले जात नाहीत. हे पैसे वापरले जातात वाणासाठी. वाण असं घ्यायचं ज्याचा घरातील संसारासाठी उपयोग होईल. मग सगळ्यांचे सल्ले विचारात घेऊन एक वस्तू ठरवली जाते. मग ही वस्तू अगदी मोठं घमेलं असू देत किंवा मोठे डबे असू देत किंवा तत्सम काहीही. पण जी गोष्ट संसाराला महत्त्वाची तीच वस्तू घेतली जाते.
खरं पाहिलं तर या गोष्टींकडे कौतुकाने आपण केव्हाच पाहत नाही. महिन्याकाठी 50 रुपये बाजूला ठेवणं कोणालाही सोपंय. पण वर्षातून एखादी हजार रुपयाची वस्तू घेणं म्हणजे थोडं कठीणंच. पण या महिन्याकाठी साठवलेल्या 50 रुपयातून वर्षात एखादं भाडं, वस्तू, फर्निचर आपण नक्कीच घेऊ शकू, हा विचार या महिलावर्ग मांडतात. चाळीत राहणार्‍या कुटुंबात एकवार कटाक्ष टाकलात आणि त्यांच्या घरात असलेल्या प्रत्येक वस्तूविषयी विचारलंत तर तुम्हाला त्या प्रत्येक वस्तू घेण्यासाठी केलेली काटकसर नक्कीच सांगतील. मग मांडणीत ठेवलेली एखादी छोटीशी स्टीलची वाटीही कोणत्या हळदीकुंकुवात मिळालेली तेही सांगतील.
बायकांना आपण नेहमी म्हणतो, की तुमच्या पार्टीची मजल फारफार तर हळदीकुंकुवापर्यंत. पण त्यांच्या याच हळदीकुंकवाच्या कार्यक्रमानं घरातील एकएक वस्तू भरत असते. घरात जी समृद्धी दिसत असते ते अशाच लहान मोठ्या कार्यक्रमांतून, योजनांतून साठवलेल्या पैशांमुळेच.
माझ्या मैत्रिणीच्या आईला फ्रिज वापरायची भारी हौस. आजूबाजूला सगळ्यांकडे फ्रीज आहे, मात्र माझ्याकडे नाही म्हणून त्या नेहमी मैत्रिणीच्या वडिलांकडे तक्रार करत. अखेर त्यांनी एक फ्रिज हप्त्यावर घेतला. महिन्याचा हप्ता होता 2 हजार. हे दोन हजारही त्यांनी घरबसल्या कमवून महिन्याच्या महिन्याला परतफेड केले. एका कंपनीतून पापड वळण्याचं काम त्यांनी घरी घेतलं. दोन किलोमागे 50 रुपये मिळतात. घरातील कामं आवरली की दिवसभर हे पापड लाटत बसायचे. दिवसाला 4 ते 5 किलो पापड सहज लाटून होतात. कधी वेळ मिळालाच तर जरा जास्त पापड लाटायचे. यातून त्यांना महिन्याला 2 हजार सहज सुटायचे. आणि हे 2 हजार त्या फ्रिजचा हप्ता भरण्यासाठी देत.
अशा छोट्या मोठ्या कामातून घरचा हातभार लावणार्‍या गृहीणींना आपण कितीही दुय्यम स्थान दिलं तरी आपल्या घरातलं चैतन्य, घरातला आर्थिक डोलारा तिच्या नियोजनामुळेच उभं आहे हे विसरून कदापि चालणार नाही.

Comments

Popular Posts